संधी- भाग ४

डॉ. स्वामीनाथन चा संशोधन प्रकल्प पुर्ण झाला, त्याचे बरेच कॊतुक ही झाले, खरेतर ह्या संपर्ण प्रकल्पात खडपेंचा सिंव्हाचा वाटा होता पण सर्व श्रेय डॉ. स्वामीनाथन नी च लाटले होते, नाही म्हणायला प्रकल्पाच्या श्रेयनामावलीत खडपेंचा अगदि ओझरता उल्लेख होता.


ह्याचा खडपें पेक्षा सिजीकें नाच जास्त राग आला त्यांनी खडपेंचे बौध्दीक घेतले. "बघा खडपे, हे हे अस्से होते, मेहनत करे मुर्गा अंडा खाय फकिर! फिटली ना तुमची संशोधनाची हौस, तरी मी तुम्हाला सांगत होतो, तो टिकोजीराव तुम्हाला वापरुन घेणार आहे, पण नाही ऐकलत.. ह्यापुढे तरी शहाणे व्हा.."


"डॉ. स्वामीनाथन नी मदत मागीतली , मी दिली , बस्स. प्रकल्पाच्या श्रेयनामावलीत माझा उल्लेख त्यांना करावासा वाटला ह्यातच मला सर्व पावले. माझ्या मेहनतीच्या प्रमाणात मला श्रेय मिळाले नाही हे काहीसे खरे आहे पण माझे नुकसान नक्कीच झालेले नाही.  ह्या सगळ्यातुन मला संशोधनाची रीत कळली, आपल्या ग्रामीण भागातल्या समस्यांवर वेगळ्या दिशेने विचार करता आला, ज्ञानात थोडी का होइना भर पडली , हे काय कमी आहे?" - खडपेंची संयमित प्रतिक्रिया आली.


विद्यापीठ अनुदान मंडळाने ही डॉ. स्वामीनाथन च्या ह्या प्रकल्पाची दखल घेतली. लौकरच  मंडळाच्या सुचने नुसार डॉ. स्वामीनाथन नी काही छोटे-मोठे संशोधन प्रकल्प सुरु केले आणि आता त्यांना ह्या कामीं खडपें शिवाय दुसरे कोणीच चालणार नव्हते. खडपेंनी ही समरसुन काम केले.


खडपेंचा अनुभव वाढत होता , त्यांचे एक दोन लहान शोधनिबंध ही प्रसिध्द झाले, हळुहळू खडपे त्या विषयातले तज्ञ मानले जाऊ लागले, आता त्यांना व्याख्याने, परिसंवादांची बोलावणी येवु लागली. 


सिजीकेंचा जळफळाट आणखी वाढला - " अरे, हा कसला तज्ञ, त्या डॉ. स्वामीनाथन पुढे गोंडा घोळतो आणि त्यांच्याच प्रबंधातले उतारे वाचुन दाखवतो. तज्ञाला स्वत:ची अक्कल लागते , ती कुठे आहे? व्यासंगाचा तर पत्ताही नाही , आता हा तज्ञ असलाच तर तो लाळघोटण्यातला "


एके दिवशी डॊ. स्वामीनाथन स्वत:च खडपेंना म्हणाले, " खडपे, तुम्ही केलेले काम एक नाही दोन पी.एच.डी. प्रबंधाच्या तोडिचे आहे, तेव्ह्ढी औपचारिकता पुर्ण करुन टाका आता,  मी तुम्हाला मार्गदर्शक मिळवुन देतो "


'प्रा. खडपे' आता 'डॉ. खडपे' झाले ह्यावर सिजीकेंचा विश्वासच बसला नाही! "डल्लामारु" अशा एका शब्दात सिजीकेंनी खडप्यांच्या पी.एच.डी. ची संभावना केली. "अरे, अशीच जर पी.एच.डी.  मिळवायची असती तर एक नाही दोन नाही दहा पी.एच.डी.  ची माळच लावली असती मी माझ्या नावापुढे.. पण काय करणार  असले चौर्यकर्म बसत नाही ना आमच्या तत्वात.."


असाच काही काळ गेला, विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. स्वामीनाथनना दोन वर्षासाठी प्रतिनियुक्ती वर बोलवुन घेतले, जाताना त्यांनी आपला कार्यभार डॉ.खडपें कडे सोपवावा असे विद्यापीठाच्या कार्यकारीणीला सुचवले आणि ते मान्य ही केले गेले, डॉ.ख़डप्यां बद्द्ल सर्वांचे मत अनुकुल असेच होते.


 डॉ. खडपे आता'प्रभारी अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग' झाले आणि सिजीकें वर बॊंबगोळाच पडला! 


"हा खडप्या आणि अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग? बघा बघा ही लाळघोट्याची कमाल, अरे याची लायकी काय, त्याला कुठे नेवुन बसवताय. दुसरे कोणी नव्हते काय ? आता हा वशिलेबाज , बं भोलेनाथ संशोधक अर्थशास्त्र विभागाचे वाटोळे करुन ठेवणार दुसरे काय!"


डॉ. खडपेंनी कार्यभार स्विकारला , जोमाने काम सुरु केले. डॉ. खडपे विद्वत्तेत कदाचित डॉ. स्वामीनाथन पेक्षा कमी असतील पण त्यांच्या कामाची पद्धत, शिस्त, झपाटा हे सारे नि:संशय उजवे होते. अल्पावधीतच त्यांनी जम बसवला.


इकडे दोन वर्षासाठी म्हणुन गेलेले डॉ. स्वामीनाथन परत आलेच नाहीत , त्यांनी एका परदेशी वित्तसंस्थेची नोकरी पत्करुन राजीनामा दिला आणि डॉ.खडपेंना 'प्रभारी अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग' वरुन 'अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग' अशी पदोन्नती मिळाली.


"झाले आता हा खडप्या बसला कायमचा उरावर! कालपर्यंत मला थोडीफार आशा होती की विद्यापीठाला आपली चुक उमजेल.. पण नाही .. आता बसा  ह्या वशिल्याच्या तट्टाचे आदेश पाळत.." - सिजीकें कडुन दुसरी कोणती प्रतिक्रिया येणार?


डॉ. खडपे अजुनही वेळात वेळ काढुन गावा कडे चक्कर मारतात, आपल्या महाविद्यालयाला आवर्जुन  भेट देतात, जुन्या मित्रांशी चार गप्पागोष्टी होतात, सिजीकें आता डॉ. खडपें शी फारसे बोलत नाहीत , फक्त मनातली जळफळ , च्रर्फडाट दाबायचा केवीलवाणा प्रयत्न करत कसेनुसे हसतात .. हा खडप्या बघताबघता इतक्या पुढे कसा काय गेला ह्याचेच त्यांना राहुन राहुन वैषम्य वाटते..


तासीकेची वेळ होते तसे ते सवयीने वॉशबेसीन पाशी जातात, तोंड धुतात, घसा साफ करतात आणि कपाळावर आणखी एक आठी वाढवत वर्गाकडे चालु लागतात, मान खाली घातल्या मुळे त्यांचा चेहरा जरी दिसत नसला तरी, त्यांच्या मनात काय चालु आहे ते मात्र लख्ख दिसत असते..  " अरे माझ्यात काय कमी आहे म्हणुन मी हा असा रखडतोय ...  छे , मला संधीच नाही मिळत  , नाहीतर मी कुठल्या कुठे पोचलो असतो.."


(समाप्त)