खासदार गोविंदा "शूटिंग'मध्ये मश्‍गुल (सकाळ मधील बातमी)

विरार, ता. १६ (बातमीदार) - मंगळवारी लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वसई तालुक्‍यातील जवळपास ६० जण मृत झाले. त्यामुळे संपूर्ण तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. एवढी मोठी दुर्घटना झाली असताना, मात्र या भागातील खासदार गोविंदा मृतांच्या नातेवाईकांच्या सांत्वनासाठी फिरकलेच नाहीत. खासदार गोविंदाच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. .......
........ प्रसिद्ध अभिनेते आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार गोविंदा यांनी वसई-विरारकडे सातत्याने पाठ फिरविल्याने या ठिकाणी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या पूरसदृश स्थितीची पाहणी तर सोडाच, परंतु मंगळवारी मुंबईसह भाईंदरमध्ये झालेल्या स्फोटात ठार झालेल्यांत वसई तालुक्‍यातील ६० जणांचा समावेश आहे. येथील स्थानिक खासदार असलेले गोविंदा यांनी या घटनेची साधी दखलही न घेतल्याने नागरिकामध्ये गोविंदाविषयी प्रचंड नाराजी आहे. ज्या गोविंदाला "विरार का छोरा' म्हणून लोकांनी निवडून दिले. तो गोविंदा आज आपल्या मतदारांना विसरला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. गोविंदा खासदार झाल्यानंतर त्याने वसई-विरारकरांना अनेक आश्‍वासने दिली होती. त्यापैकी किती आश्‍वासने त्यांनी पूर्ण केली. हा संशोधनाचा विषय आहे. तरी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपल्या मतदारसंघात त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. मात्र गेल्या आठ दिवसांत गोविंदा आपल्या मतदारसंघात आला नसल्याने त्यांच्याविरोधात येथील जनमत तयार होत आहे. गोविंदाशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते लंडनला गेल्याचे समजले. नागरिक मरत असताना खासदार मात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे चित्र येथे दिसत आहे.