वर्तमानकाळ हा 'भूत'काळ!

मंडळी,
सध्या 'भूत' हा विषय सगळीकडे इतका लोकप्रिय झाला आहे की वर्तमानकाळ हा 'भूतकाळ' झाला आहे! पूर्वी फक्त 'पंच महाभूते' व गोष्टीतली भुते होती तसेच  'शीते' असली तरच 'भुते' दिसत पण आता भुतेही निर्धन-सधन असा भेदभाव करत नाहीत.
हल्ली भुतांमध्येही विविध प्रकार आढळतात. उदाः फक्त अमावस्या/पौर्णिमेला भेटणारी भुते, हिमेश रेशमियाची गाणी म्हटल्यावर भेटणारी भुते! (त्यामुळे 'म्हटली त्याची 'गीते' तर दिसतील भुते' अशी नवी म्हण ऐकीवात आहे.)
या निमित्ताने आपण एकमेकांना 'भूत' या विषयावरचे विनोद तर ऐकवू शकतो.
अर्थात हे विनोद 'मनोगत'च्या सुसंस्कृतपणाला,भूतदयेला धरून असावेत.त्यात आक्षेपार्ह/बीभत्स विषय वा भाषा नको.(असे झाल्यास भुते जातीनी भेटून निषेध व्यक्त करतील व त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.)
वि‌‌.सूः 'आपल्याला 'भेटाविशी' वाटणारी भुते आपल्याला भेटली तर आपण काय करू त्या योजनांबद्दल माहिती येथे देऊ नये.

आरंभासाठी काही विनोद खाली देत आहे.

१) एकदा मी एका मित्राला विचारलं
    'तुझा भुतांवर विश्वास आहे?'
     तो म्हणाला 'अजिबात नाही! ' आणि अदृश्य झाला.

२) एका बंगल्यात 'भुते' आहेत असे कळल्यावर एक भुतांवर विश्वास नसणाऱ्या माणसाने त्या बंगल्याचा दरवाजा ठोठावला.दार उघडणाऱ्या नोकराला त्याने विचारले 'काय रे, इथं भुतं राहतात म्हणे'
नोकर म्हणाला ' काय माहीत! मी मरून दहाच वर्षे झाली आहेत'.

३) हैदराबादला भूतांचा वावर जास्त का?
    कारण श्री.रामगोपाल वर्मा हैदराबादला राहतात.


(जयन्ता५२)