थोडसं म्हणींविषयी

म्हणी व वाक्प्रचार यांचा प्रसार मुख्यत्वे कर्णोपकर्णी होतो. म्हणून बरेच वेळा श्रवणदोषाने किंवा उच्चारदोषाने म्हणींमधले किंवा वाक्प्रचारातले काही शब्द अपभ्रष्ट होतात आणि मग त्यांचा अर्थ बदलतो किंवा त्यांचा अर्थ लावणं कठिण होऊन बसतं. अशी काही उदाहरणं.
     ताकास तूर लागू न देणे--- याचा प्रचलित अर्थ थांगपत्ता न लागू देणे. ही शेतकऱ्यांची म्हण आहे. 'ताग' या शब्दाचे 'ताक' हे भ्रष्ट रूप आहे.तागाचे रोप आणि तुरीचे रूप ही लहान असताना अगदी सारखी दिसतात. परंतु त्यांचे गुणधर्म पूर्णपणे विरोधी असतात. तागाच्या पोटी फार उष्णता असते.ताग व तूर यांची लागवड एकत्र केल्यास तूर तागाच्या उष्णतेने मरून जाईल.म्हणून शेतकरी तागास तूर लागू देत नाहीत.
     रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी---याचा अर्थ असा की फुरसतीचा वेळ निरुपयोगी गोष्टी करण्यात घालवणे.मूळ म्हण अशी आहे 'रिकामा नावी कुडाला तुंबे लावी.' कोळी किंवा नाविक लोक मासेमारीसाठी भोपळे लावलेल्या सांगडी वापरतात. आपली मासेमारीची कामं उरकली की हे लोक सांगडीचे तुंबे म्हणजे भोपळे फुटू नयेत म्हणून कुडाला उंचावर व्यवस्थित अडकवून ठेवत.त्यावरून मुख्य काम संपल्यावर फुरसतीच्या वेळी करावयाचा किरकोळ उद्योग अशा अर्थाने ही म्हण निर्माण झाली. पुढे लोकबोलीत 'नावी'चे 'न्हावी' आणि 'तुंब्या'चे 'तुंबड्या' झाले.
     नाकी नऊ येणे--- याचा अर्थ एखादे काम करताना फार सायास होणे आपल्या शक्तीपेक्षा एखादं अवघड ओझं आपण उचलू लागलो तर आतडी गोळा झाल्यासारखी वाटतात. श्वास छाटून आतडी बाहेर येतील असे वाटते.
     घोडे पेंड खाते---या वाक्प्रचारातील 'पेंड' हा शब्द 'पेण' या शब्दाचा अपभ्रंश आहे.पेण म्हणजे टप्पा. लांबच्या प्रवासात मधून मधून विश्रांती घेण्याचे टप्पे ठरलेले असत. सरावाचे टप्पे आले की घोडे तिथे थांबते-अडते म्हणजे घोडे तिथे पेण खाते.
     साधली तर शिकार नाहीतर भिकार---मूळ म्हण आहे 'साधली तर शिकार नाहीतर भेकार.' भेकर ही छोटी भित्री अशी हरणाची जात. वाघासारखी मोठी शिकार नाही मिळाली तर निदान भेकर तरी मिळेल असा अर्थ. पुढे 'भेकार'चे 'भिकार' झाले.
     अडला नारायण गाढवाचे पाय धरी--- काही जणांचे असे मत आहे की या म्हणीमध्ये पूर्वी गाढव या शब्दाऐवजी गरूड हा शब्द असला पाहिजे.गरूड हे नारायणाचे वाहन. नारायणाचा आणि गाढवचा अर्थाअर्थी काय संबंध?
     उचलबांगडी करणे--- यातला 'बांगडी हा शब्द 'पांगडी' या शब्दाचा अपभ्रंश आहे.पांगडी म्हणजे कोळ्याचे मासे पकडायचे मोठे जाळे. कोळी जाळे पसरून ठेवतो आणि मासे त्यात आले की ते उचलतो.
     उपटसुंभ--- नेहमीच्या सर्वश्रुत शिवलिंगांव्यतिरिक्त आणखी एखादं स्वयंभू शिवलिंग निर्माण झालं की लोक 'नवीन शंभू उपटला' असे म्हणत. पुढे 'शंभू'चे झाले 'शुंभ' आणि 'शुंभ'चे झाले 'सुंभ'.
     कानामागून आली आणि तिखट झाली--- मूळ म्हण आहे पानामागून आली आणि तिखट झाली. मिरच्यांच्या रोपांना अगोदर पानं लागतात आणि नंतर मिरच्या लागतात. त्या वरून ही म्हण आली असावी.
     तुमच्याकडे आहेत का अशी काही उदाहरणं?
                                                                   वैशाली सामंत.