तू लिहिले कितीही भावुक, तरीही ते म्हणतील त्यावर
लिहिणारा छानच लिहितो, तांब्यांची पण ये ना सर
आनंद व्यक्त होण्याचा, लिहिताना घेतो आपण
का उदास होतो तरीही, कोणाला नावडले तर?
सगळ्यांना खुश करण्याचा, तू चंग बांधला तरीही
काहीजण म्हणतीलच रे, शब्दांची जत्रा आवर
लिहिताना लिही रे वेड्या, प्रामाणिक भाव मनाचे
लिहिण्यातुन उतर असा की, काटा यावा अंगावर
शब्दांचे घेऊन धागे, कवितेला वीण असेकी
अर्थांची ऊब मिळावी, कवितेला पांघरल्यावर
तुषार जोशी, नागपूर