वाचावे ते नवलच - ३ - एकलव्याचे वारसदार

आपण सर्वचजण रोज वर्तमानपत्र वाचतो, निदान मुख्य मथळे चाळतो तरी. कधी कधी आंतल्या पानांवरील कांही वेगळ्याच प्रकारच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. अशा कांही बातम्या व त्यावरील माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मी ही मालिका सुरू केली आहे. त्यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात म्हणजे असा प्रकारचे लेखन कुणाला आवडते की नाही ते समजेल व मालिका पुढे चालवण्याबद्दल ठरवता येईल.
शालांत परीक्षांचे निकाल लागतांच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी तसेच निरनिराळ्या प्रसिध्द शाळा व कोचिंग क्लासेस प्रकाशाच्या झोतांत येतात. या पार्श्वभूनीवर ठाण्याच्या समता विचार संस्थेने चालवलेला एक अत्यंत स्तुत्य उपक्रम नजरेत भरतो. स्वतःच्या प्रयत्नाने व कर्तृत्वाने उज्ज्वल यश मिळवणा-या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांचे जाहीर कौतुक करण्यात येते तसेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत दिली जाते. ही बातमी एकलव्याचे वारसदार या सथळ्याखाली आली आहे. फण माझ्या मते यांत वंशपरंपरा तर नाहीच, ते अनुकरण सुध्दा कदाचित म्हणता येणार नाही. ज्याने त्याने एकलव्याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधून काढला म्हणून त्यांना आजचे एकलव्य म्हणता येईल.
एकलव्याचे नांव घेतले की लगेच त्याचेवर झालेला घोर अन्याय आठवतो. पण मला असं वाटतं की अंगठा हे एक फक्त प्रतीक असावं. राजनीति, धर्मशास्त्र वगैरे शिकल्याशिवाय ब्रम्हास्त्रासारखी महाभयानक शस्त्रांचे ज्ञान घेणे धोकादायक ठरेल म्हणून त्याने शिकार करण्यासाठी आवश्यक इतपत साधीसोपी धनुर्विद्याच शिकावी असा उपदेश गुरु द्रोणाचार्य यांनी कदाचित केला असेल. बाये हाथका खेल, हातचा मळ याप्रमाणेच अंगठ्याविना शरसंधान असा एखादा वाक्प्रचार त्या काळी कदाचित प्रचलित असेल. घेणा-याने घेता घेता देणा-याचे हात घ्यावे असे जेंव्हा कविवर्य विंदा म्हणतात तेंव्हा त्यात हात तोडणे अभिप्रेत नसते.