पुस्तके - गुलज़ार - रात पश्मिने की


गुलज़ारच्या "रात पश्मिने की" या कविता संग्रहात एक "किताबें" नावाची सुंदर कविता आहे.  पुस्तकांशी माझे प्रेमाचे नाते असल्यामुळे ही कविता पण माझ्या आवडीची आहे.  त्या कवितेचा जमेल तसा अनुवाद करून आपल्यापुढे सादर करतो आहे.

कविताः किताबें
पुस्तकः रात पश्मिने की
कवीः गुलज़ार
मराठी स्वैर अनुवादः तुषार जोशी, नागपूर



पुस्तके...

पुस्तके डोकावतात
बंद आलमारिच्या काचेतून
आशेने बघतात
महिनोंमहिने आजकाल भेटी होत नाहीत
संध्याकाळ जी नेहमी यांच्या बरोबर जायची
आजकाल निघून जाते
कॉम्प्युटर च्या पडद्यावर

अस्वस्थ असतात पुस्तके
यांना आता झोपेत चालायची सवय लागलीय
खूपच आशेने बघत असतात माझ्याकडे

जे विचार ऐकवायचे ते
ज्या विचारांचे पडसाद घरभर राहत
आजकाल ते घरात दिसत नाहीत
जी नाती सांगायची ती
ती उसवून चालली आहेत

एखादे पान पलटावे तर
हुंदकाच निघतो
कितीतरी शब्दांचे अर्थ गळतात
बिन पानांची वाळकी काडी असावी
तसे झालेत शब्द
ज्यांना आता अर्थ उगवत नाहीत

कितीतरी वाक्प्रचार आहेत
मातीच्या भांड्याप्रमाणे
अडगळीत पडली आहेत
जसे कुणी त्यांचा त्याग करावा

जिभेवर जी पाने पलटवण्याची
चव यायची
आता बोटाने टिचकी लावण्यात
त्याची सर नाही
एका टिचकीनेच कितीतरी उघडत जाते
स्क्रीन वर आपोआप

पुस्तकांशी जे हळवं नात होत
तुटलंय आता
कधी हृदयापाशी ठेवून वाचायचो
तर कधी मांडीवर घेऊन
कधी गुडघ्यांना रिहाल* करून
भक्तिभावाने वाचायचो
ते ज्ञान तर अजूनही मिळत राहील
पण ती वाळलेली फुले मिळायची पुस्तकात
ती कशी मिळतील?
ती पुस्तके मागण्याच्या, पडण्याच्या, उचलण्याच्या
निमित्ताने नाती घडायची ती
कदाचित आता नाही मिळणार

- गुलज़ार

* रिहाल - पुस्तक ठेवण्याचा लाकडाचा स्टॅण्ड.  एक्स च्या आकाराचा.  हा अरबी शब्द असावा.  मुद्दाम तसाच ठेवलाय.