विंचवाची रात्र - निःसीम


"नाइट ऑफ दी स्कारपियन" ही निःसीम एझिकेल यांची कविता.  माझ्या मनात या कवितेचे पडसाद अजूनही वाचताना तसेच पडतात जसे प्रथम वाचताना पडले होते.  या कवितेचा स्वैर अनुवाद सादर करतो आहे.  मूळ कवितेत आलेले सगळेच या कवितेत येणे शक्य नाही हा माझा दोष समजावा.  मूळ कविता इथे वाचायला मिळेल.

कविताः  नाइट ऑफ दी स्कारपियन
कवीः निःसीम एझिकेल
मराठी स्वैर अनुवादः तुषार जोशी, नागपूर



विंचवाची रात्र

आठवते मज त्या रात्री, पाऊस कोपला होता
येऊन कुठुनसा विंचू, आईस चावला होता

पाऊस सतत पडणारा, विंचवास घेऊन आला
भाताच्या पोत्यामागे, तो दडुन बैसला होता

धावले सोयरे सारे, झुंडीच जणू माश्यांच्या
देवाचा धावा सगळ्या, खोलीत गाजला होता

कंदील मेणबत्त्यांनी, शोधले किती जरी त्याला
तो दुष्ट विषारी विंचू, आधीच निसटला होता

प्रत्येक क्षणाला आई, वेदनेत विव्हळत होती
अंगात विषाचा पारा, चढू लागला होता

बये तुझ्या दुःखाने, ढवळेल तोल जगताचा
कुणी दैव योगाचा, विषय काढला होता

जळतील विषाने साऱ्या, तुझ्या वासना, इच्छा
दैव स्वीकारून सगळे, घोळका बोलला होता

गतजन्माची करणी, सगळ्यांना समजुन गेले
शांततेत सगळ्यांनी, निःश्वास टाकला होता

पुन्हा नवे शेजारी, कंदील मेणबत्त्यापण
आईस पाहण्या गावच, जणु लोटला होता

जमले ते उपाय योजुन, धडपडून थकला बाबा
नाईलाज म्हणून तर त्याने,  पायही जाळला होता

आईस असे जळताना, मी दूरून पाहिले होते
अग्नीत तिच्या देहाने, पेट घेतला होता

पाला, झाडे, गंडे, आणले सर्व बाबाने
तांत्रीक मंत्र उदबत्ती, करण्यात गुंतला होता

वीस तास मग आई, अशी तडफडत होती
मरण यातना देऊन, तो डंख उतरला होता

इतकेच म्हणाली आई, धन्यवाद देवाला
मुले वाचली, विंचू तिला चावला होता

- निःसीम एझिकेल