निःफळ संत्र्याच्या झाडाचे गाणे - फेडरिको गार्सिया लोर्का

ओ वुडकटर
कट माय शाडो
फ्री मी फ्रॉम द टारमेन्ट ऑफ
सीईंग मी विदाऊट फ्रूट

या कवितेची पहिली ओळख ग्रेस ने करून दिली मितवा मध्ये उधृत करून.  हे शब्द मनामध्ये किती तरी वर्षांपासून घर करून बसलेत.  आता महाजालावर शोधल्यावर कळते की ही कविता फेडरिको गार्सिया लार्का या स्पॅनिश कवीची आहे.

महाजालावर या कवितेचे इंग्रजी अनुवाद इथे आणि इथे वाचायला मिळतील.  बऱ्याच लोकांनी आपापल्या पद्धतीने अनुवाद केलेत.  मला मूळ स्पॅनिश येत नसल्याने या इंग्रजी कवितांचा आधार घ्यावा लागलाय. 

या कवितेबद्दल अधिक माहिती वा अर्थ कुणाला ठाऊक असल्यास मला वाचायला आवडेल.

निःफळ  संत्र्याच्या झाडाचे गाणे
स्वैर मराठी अनुवादः तुषार जोशी, नागपूर

लाकूडतोड्या
माझी सावली माझ्यापासून काप
मुक्त कर मला
संपव हा फळहीन जगण्याचा शाप

आरशांच्या जगात का जन्मलोय मी?
दिवस भोवती घिरट्या घालतात
आणि
रात्र तारकांसकट चिडवते मला

नकोसे झालेय मला
स्वतःकडे पाहणे
मी स्वप्ने पाहीन की
किडे आणि मुंग्याच आहेत
माझे पक्षी आणि पाने

लाकूडतोड्या
माझी सावली माझ्यापासून काप
मुक्त कर मला
संपव हा फळहीन जगण्याचा शाप

- फेडरिको गार्सिया लोर्का