पावसाळा
एक आभाळ
चहूबाजूंनी दाटलेलं
काळे काळे मेघ
मनात साठवून दमलेलं
एक पाऊस
तुला-मला भिजवणारा
मनातले सारे दाह
थेंबाथेंबांनी विझवणारा
एक पवन
उन्मादात घोंगावणारा
पिंपळाच्या सतारीतून
प्रणयगीत छेडणारा
एक धरती
प्रेमवर्षावात भिजलेली
ओलं सृजनबीज
कुशीत घेऊन निजलेली
एक पावसाळा
आपल्या स्वप्नात रंगलेला
हृदयाच्या पाकळीत
खोल खोल जपलेला!
---मुक्ता