योग

साध्या प्रसंगांमध्येही आयुष्याचे सार गवसू शकते. बघण्याची दृष्टी मात्र हवी.....


योग


मित्रहो आयुष्य म्हणजे योगायोगांची एक अखंड मालीका आहे. कुठलीही गोष्ट आहे  तशीच का आहे कारण, ती तशीच असण्याचा योग आहे. नियतीचीच तशी इच्छा असते. आज आयुष्यात मी एक अतिशय गंभीर व्यक्ती म्हणून ओळखला जातो. पण हा गंभीर होण्याचा योग काही सहज आला नाही. लहानपणी मी नेहमी विचार करीत असे दोन म्हशी, दोन मांजरं वा दोन कुत्रे रस्त्याने जाताना कधीही एकामेकाकडे बघून हसत नाहीत. मग देवाने हसण्याची एव्हढी दुर्मिळ देणगी देऊनही माणसे एकामेकाकडे बघून नेहमी का हसत नाहीत? लहानपणापासून घरात माझे हसणे ही मोठी गंभीर समस्या होती. 'अरे आयुष्य जरा सिरियसली घे रे! असे माझ्या कानी-कपाळी ओरडून घरचे थकून जात. पण आयुष्याने तरी कधी मला सिरियसली घेतलेय, नेहमी त्याच्याच मनाप्रमाणे तर वागवत आलेय. घरीदारी,बालवाडीत , शाळेत, कॉलेजात, युनिव्हर्सिटीत, परदेशातील युनिव्हर्सिटीत साऱ्या ठीकाणी पोरकट-पोरकट  , बालिश-बालिश  म्हणून माझी उपेक्षाच झाली. बहुतेक थोर लोकांच्या आयुष्याचा पूर्वार्ध हा उपेक्षेनेच भरला असतो का ?? आता एखादा मनुष्य थोर निघावा अथवा चोर निघावा किंवा एखादा थोर प्रत्यक्षात चोर निघावा (हे राजकारणावरील भाष्य नाही!) हाही एक योगच नव्हे का? माणसे उगाच साधी गोष्टही गंभीरपणाचा आव आणून सांगतात. आता शेजारचे आजोबा ८५ व्या वर्षी मागे वळून बघताना मान दुखते हे सरळ न सांगता,' आयुष्याच्या या वळणावर (८५!) मागे वळून बघताना.... माझी मान दुखते ! ' असे सांगतात. आहे काय मागे वळून बघायला ? बायको, लग्न झालेला मुलगा , मुलगी , चार नातवंडे आणि पेन्शन! पण  तरीही हे 'मागे वळून' वैगरे बघतात ! पण आयुष्यातील त्या घटनांनी; नेमके सांगायचे तर त्या घटनांनी माझे आयुष्यच बदलून गेले.....


      घरातील शेंडेफळ म्हणून लाख लाड होत असतील पण एक खंत मनाला कायमच होती. माझ्या शब्दाला घरात किंमत नव्हती. तशी ती इतरत्रही फारशी नव्हतीच म्हणा!  म्हणजे बघा आमच्या घराच्या शेजारी एक गल्ली आहे. तिथे एक कुत्रं आहे. ते कुत्रं पूर्ण काळं आहे, ते सुध्दा मला विचारत नसे. रघू हा माझा फार आवडता मित्र. अतिशय निरागस आणि भोळा ! हाच एकमेव प्राणी ज्याच्यावर मी हुकुमत गाजवू शकत असे. जणू काही या दुनियेत वागावे कसे हे त्याला शिकवण्याची (कुणीही न दिलेली) जबाबदारी माझीच होती असे मला वाटत असे. त्यामुळे त्याला न मागता सल्ले मी द्यावेत आणि त्या बिच्याऱ्याने गरीब कोकरासारखे ते ऐकावेत असे चाले. बिचारा रघू,फारच चांगला ! दुसरा मित्र म्हणजे मिंटू.  याच्यासाठी एकच शब्द आणि तो म्हणजे 'अतिशय समजूतदार'! तर या घटना आम्ही दहावीची परीक्षा देण्याआधी घडल्या आणि मला गंभीर करून गेल्या. परिक्षेच्या आधी आम्ही बऱ्याच मित्रांच्या घरी जाऊन एकत्र भेटी घेऊन येत होतो. नंतर कोण कुठे, कोण कुठे ? परत भेटण्याचा योग कधी येईल सांगता येत नाही. आजही त्या घटना चित्राप्रमाणे डोळ्यासमोर येतात.


घटना क्रमांक-१


स्थळः पियुष लेलेचे घर


वेळः सांगुन आलेली ! (म्हणजे त्यानेच बोलावले होते आम्हाला. तुम्हाला काय वाटले आम्ही कुठे ही जातो की काय, असे न बोलावता ?)


डिंग डाँग ! बेल वाजली. पियुषने दार उघडले. हसणे झाले. जागेवर बसणे झाले.


'मग काय म्हणतोय अभ्यास ?' लेले काकूंनी विचारले


' चाललाय' मी;


'वा, मग यंदा बोर्डात का? '


आता यावर काय बोलणार. अहो, उगाच जाडी वाढल्यामुळे आई-बापांनी मारुन मुटकून पळायला पाठवलेल्या पोराला ' काय रे ऑलिंपिकची तयारी का ?' असे विचारले तर काय उत्तर देणार. आम्ही सारे गप्प.


' बरं बसा हं, मी आलेच !'


काकू बाऊलमध्ये मोतीचुराचे लाडु घेऊन आल्या व आम्हाला दिले. खरे त  मला मगापासूनच चिवड्याचा खमंग वास येत होता. पण म्हंटले देतील सावकाश काय घाई आहे ? आम्ही लाडु खाऊ लागलो.


' काय रे रघू कसे आहेत लाडु ? आवडले का? तुमच्या घरीही असेच करतात का ?'


'हो असेच करतात पण, याच्यापेक्षा आकाराने थोडे मोठे करतात' आमचा निरागस रघू !!


पुढच्याच क्षणी काकू १८० अंशातून गर्रकन वळल्या. स्वयंपाकघरातून करडा आवाज आला, ' पियुssष' . पियुष अमृततुल्य घेऊन आला. आम्ही चहा ढोसला. बाहेर पडलो.


' रघ्या लेका तुला काही अक्कल ? कुठे काय बोलावे ?'


'का ? काय झाले ?' रघू नेहमीप्रमाणेच.


' काय रे तुला बाहेर कुणी विचारणार आहे का रे मोतीचुराचे लाडु खाल्ले की मोतीचुराच्या गोळ्या खाल्ल्या म्हणून ? अरे जरा विचार करावा. एखाद्याच कौतुक करावे, म्हणे याच्यापेक्षा आकाराने थोडे मोठे करतात. रघू अरे कुठवर मी तुला सांभाळणार रे. आता जरा मोठा हो. आता मला जरा चेव आला होता. आता उद्या त्या कौस्तुभकडे तरी जरा भरभरुन कौतुक कर म्हणजे झालं, काssय ??बघ तुझ्यामुळे चिवडा गेला.'


'बरं!' रघू .


' ए अरे यार जाऊ द्या रे!' मिंटू. हा आधीपासूनच समजुतदार.


बघा, अगदी तोडाशी येऊनही शेवटी काय झाले ? खमंग वास आला पण चिवडा नाही आला. योग नव्हता !


घटना क्रमांक-२


स्थळः कौस्तुभ हर्डीकरचे घर


वेळः सांगुन आलेली ! (म्हणजे यानेही बोलावलेच होते आम्हाला. तुम्हाला काय वाटले आम्ही कुठे ही जातो की काय, असे न बोलावता ?)


डिंग डाँग ! बेल वाजली. कौस्तुभने दार उघडले. हसणे झाले. जागेवर बसणे झाले.


'मग काय म्हणतोय अभ्यास ?'  हर्डीकर  काकूंनी विचारले.


'चाललाय' रघू.


' बरं बसा हं, मी आलेच !'


काकू बाऊलमध्ये बेसनाचे लाडु घेऊन आल्या व आम्हाला दिले. खरे तर मला मगापासूनच  इथेही चिवड्याचा खमंग वास येत होता.  एकदा डोकावून खात्रीही करून घेतली पण म्हंटले देतील सावकाश काय घाई आहे ? आम्ही भरपूर काजू-बदाम घातलेले लाडु खाऊ लागलो.


' काय रे रघू कसे आहेत लाडु ? आवडले का? तुमच्या घरीही असेच करतात का ?'


' हो हो काकू. लाडू खूपच छान झालेत. आमच्याकडेही असेच करतात. तुम्ही जर आत्ता मला चार लाडू दिले ना तरी ते मी सहज संपवीन.' पोपटासारखा बोलणारा रघू राघूसारखा भासत होता.


' अरे, हे तुम्हाला दिलेले शेवटचेच लाडु होते. आता पुढच्यावेळी केले ना की बोलवीन हा परत.'  असे म्हणून काकू लगबगीने स्वयंपाक घरात गेल्या. पण जाताना आमच्याकडे अशा काही विचित्र नजरेने बघून गेल्या की, मोठ्याने ओरडून सांगावेसे वाटले ' तसे नाही काकू आम्हाला घरी पण खायला मिळते हो. पण लाडु खरच छान झालेत.


 स्वयंपाक घरातून आवाज आला. कौस्तुभ चहा घेऊन आला. आम्ही चहा ढोसला. बाहेर पडलो.


' रघ्या अरे काय बोलावे कळते का ? म्हणे चार लाडू दिले ना तरी ते मी सहज संपवीन! दुष्काळातून आलोय का रे आपण ? बरे दिसते  का असे बोलणे ?


 ' कधी म्हणतोस कौतुक कर आणि केल्यावर हे असे बोलतोस मग बोलू काय?' रघू जरा वैतागलाच.


'काहीच  बोलू नकोस. उद्या शंतनुकडे फक्त मान डोलाव तेव्हढे पुरे आहे. बघ तुझ्यामुळे चिवडा गेला.' मी


' ए अरे यार जाऊ द्या रे!' मिंटू. मी म्हंटले ना, हा आधीपासूनच समजुतदार!


बघा, अगदी तोडाशी येऊनही शेवटी काय झाले ? खमंग वास आला पण चिवडा नाही आला. योग नव्हता !


घटना क्रमांक-३


स्थळः शंतनु कुळकर्णीचे घर


वेळः सांगुन आलेली ! (आता यानेसुद्धा बोलावलेच होते आम्हाला. तुम्हाला काय वाटले आम्ही कुठे ही जातो की काय, असे न बोलावता ?)


डिंग डाँग ! बेल वाजली. शंतनुने दार उघडले. हसणे झाले. जागेवर बसणे झाले.


'मग काय म्हणतोय अभ्यास ?' कुळकर्णी काकूंनी विचारले


' चाललाय' मिंटू.


बरं बसा हं, मी आलेच !'


काकू बाऊलमध्ये मुगाचे लाडु घेऊन आल्या व आम्हाला दिले. खरे तर मला मगापासूनच  इथेही चिवड्याचा खमंग वास येत होता.  एकदा डोकावून खात्रीही करून घेतली पण म्हंटले देतील सावकाश काय घाई आहे ? आम्ही भरपूर काजू-बदाम घातलेले लाडु खाऊ लागलो.


' काय रे रघू कसे आहेत लाडु ? आवडले का? तुमच्या घरीही असेच करतात का ?' कुळकर्णी काकू.


 या प्रश्नावर रघूच्या रुपाने आलम दुनियेतील निरागसता डोलली.


' पण काय  रे लाडु आवडतात ना मुगाचे'. माझ्याकडे तिरप्या नजरने बघत रघू परत  डोलला. मीही मान डोलावली.


काकू उठून स्वयंपाक घरात गेल्या. आतून आवाज आला. शंतनु आत गेला. आणि माझ्या कानावर संवाद पडला,


' कसले रे मित्र तुझे . एका मेल्याचं तोंड उचकटत नाही कौतुकासाठी. जाs घेऊन हा चहा.


शंतनु चहा घेऊन आला. पण ' मुगाचे लाडु खाताना मुग गिळूनच बसले पाहीजे का रे ? हा त्याच्या डोळ्यातला प्रश्न मला स्पष्ट वाचता आला. आम्ही चहा ढोसून बाहेर पडलो.


'आता रे?' रघू . त्याच्या डोळ्यात वेगळाच आनंद दिसत होता.


' अरे चुकतो अंदाज कधी ,कधी !' मी खजीलपणे म्हणालो.


'कधी ,कधी , अरे पण तिन्हीवेळा!!!' रघू


' ए अरे यार जाऊ द्या रे!' मिंटू.


खरेच, खरेच हा मिंटूच खरा समजुतदार. मी नेहमीच म्हणतो असे.


बघा, अगदी तोडाशी येऊनही शेवटी काय झाले ? खमंग वास आला पण चिवडा नाही आला. योग नव्हता ! आयुष्यात कुठलीही गोष्ट गृहीत धरू नये गोष्टी येतील तशा स्विकाराव्यात हा मोठा संदेश मिळाला या साध्या घटनांतून! मला तर आयुष्याचे तत्वज्ञान मिळाले. ' लेसन वॉट यू गेट, व्हेन यू डोंट गेट वॉट यू वाँट !' (जेव्हा हवे ते मिळत नाही, तेव्हा मिळतो धडा! मी तो शिकलो. )


                                           -------- अभिजित पापळकर