दृष्टी

हे कुठून सांगा आले
मनात हिरवे गाणे
वैशाखाच्या हृदयी
मेघांची फुटली पाने।


ही नव्हेत माझी स्वप्ने
हे उंच नेटके सूर
ही आनंदाची गाणी
हा नवा निराळा नूर।


ही बाग न माझी हसते
हा झुला न तो तुटलेला
रिमझिमती कारंजी
वसंतगंध सुटलेला।


हे आसमंत झळाळे....
सांज कुठे ती करडी
इवल्या रानफुलांची
कोण विसरले परडी।


रमलेल्या पानांवर
चिमण्या गोजिरवाण्या
फुलपंखी बागडणाऱ्या
रसिका राजसराण्या।


माझ्या सवयीच्या वेळा
तो मंद खिन्नसा वारा
कुणी मांडला इथला
लोभसवाणा पसारा।


का अनोळखीशी वाटे
प्रतिमा माझी मला
मी अवसेचा काळिमा
ही पूर्णचंद्राची कला।


काय बदलले येथे
पालटली सारी सृष्टी
की कुणीतरी अचानक
बदलली माझी दृष्टी?


 --अदिती
(३१ जुलै २००६, श्रावण शु. ६ शके १९२८)