आमी जातो अमुच्या गांवा

सायबरखेड्याला योक लई जंगी जत्रा भरल्याली. खमंग काकडी, लवंगी मिरची, पुराणातली वांगी, भ्रमाचं भोपळं सगळं आलेलं. योक आकलेचं कांदंबी ततंच कडमडलं. त्येनं पायलं की समदी मंदी लई मज्जा करत्याती. कुनि गात्याय्, कुनि नाचत्याय्, कुनि कुनाला गुदगुद्या करत्योय्, कुनि चिमटं काडतुया, मंग कुनि खिदळतय् तर कुनि वराडतंय्.
त्येनं तर कसलंच गटुळं आनल्यालं न्हवतं. असंच कुटंतरी आयकल्यालं कायबाय सांगून पायलं. तेच्यावर कुनी खुदुखुदु हंसलं, कुनी फदाफदा, तर कुनाला कुबट वास आला, त्येनं नाकावर कापड धरलं. मग त्येनं डोंबा-याचा खेळ मांडला. पयल्यांदा येक दोन लोकांनी तेच्या कोलांट्या बगून टाळ्या वाजिवल्या, मंग त्ये बी कटाळले.
येका जागी अंगत पंगत चालल्याली व्हती. कुनी बदामाचा शिरा आनल्येला तर कुनी केशरी भात. आमचा गडी बी आपला फोडणीचा भात घ्येऊनशान ततं जाऊन बसला. श्यानी लोकं संवसकरूतमदी श्लोक म्हनत व्हती. त्येनं बी योक श्लोक बनवला.
"बापम् भातम् उन्नम् हायम्।  ल्योकम् फुंकम् फुंकम् खायम्।।"
तेच्यावर कुनी हा हा क्येलं तर कुनी योक योक शबुद चिरून फाडून टरकावला. आता काय करावं या विचारातच व्हता त्येवड्यात गावाकडनं सांगावा आला की ततं येक काम निगालं हाय अन् पाट्या टाकायला मानसं पायजेल्यात. त्यो लगेच जायाला निगाला. निगता निगता कुजबुजला, "आमी जातो अमुच्या गावा। अमुचा राम राम घ्यावा।।"