बायोडिझेल क्रांतीची कामधेनू -२

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार, आणि इथे नियमित येणे होत नसल्याने आपण प्रतिसादात वा व्यनिद्वारे विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरास थोडा विलंब झाला त्याबद्दल दिलगीर आहे.


१) करंज तेल ते बायोडिझेल या प्रक्रियेसाठी येणारा खर्च व लागणारी उर्जा.
साधारण प्रति लिटर दहा रुपये खर्च येतो, उर्जेचा खर्च धरून.


२)इथेनॉल
इथेनॉल हे बायोडिझेलपेक्षा वेगळे आहे. त्याला बायोपेट्रोल असे संबोधता येईल. पेट्रोलमध्ये मिसळून वापरता येते, पण १००% इथेनॉल वापरायचे असेल तर मात्र वेगळे इंजिन लागेल. त्याशिवाय भारताच्या दृष्टीने तोटा म्हणजे उसासारख्या प्रचंड पाणी पिणाऱ्या आणि सुपीक जमिनीवरचे पीक वापरणे हे आपल्या अन्नसुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे होउ शकते. शिवाय मका वगैरे पासून बनवणे अव्यवहार्य आहे असे चित्तसारखेच मीही ऐकले आहे.


३) कार्बन ट्रेडिंग
क्योटो करारानुसार प्रत्येक देशाने कार्बन डायऑक्साईडसारख्या वायूंचे उत्सर्जन कमी करायचे प्रमाण ठरले आहे. जे आवश्यकतेहून जास्त प्रमाणात कमी करतील ते व जिथे मुळातच कमी आहे असे अविकसित देश आपले अतिरिक्त 'वाचवलेले' उत्सर्जन चे क्रेडित हे विकसित देशांना विकू शकतात. म्हणजे मी वर्षाला एक टन कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब केला तर त्याचे मला  युनिट एवढे क्रेडिट मिळते ज्याचे सध्याच्या भावाप्रमाणे दहा डॉलर मिळू शकतात. करंज हे सदाहरित वृक्ष असल्याने त्याच्या लागवडीचे भरपूर क्रेडिट मिळू शकते.


४)विषारी बियांचे तोटे.
करंज हे मनुष्य व प्राण्यांसाठी 'हानिकारक टॉक्सिक' या प्रकारात येत नाही. (जत्रोपा आहे). पण करंजमधले करंजिन हे द्रव्य वेगळे केले तर काहीच टोक्सिसिटी शिल्लक रहात नाही. आणि शिवाय करंजिनला औषधी उपयोगाकरता मागणी आहे.


५)भारतात अशा प्रकारचे प्रकल्प कुठे आहेत का ? याआधी कोणी भारतात करंजेल तेलापासून डिझेल तयार करून पाहिले आहे का ? तुम्ही ही माहिती कशाच्या आधारे देत आहात ? तुम्ही या क्षेत्रात काम करता का? अशा बायोडिझेल ची विक्रीची किंमत लिटर मागे अंदाजे किती रुपये असेल ? तसेच रासायनिक प्रक्रिया आणखी स्वस्तात होणे शक्य आहे का ?


ट्री बेस्ड ऑईलपासून बायोडिझेल हे एक सुस्थापित तंत्रज्ञान आहे. कुठले बी याप्रमाणे थोडा फार फरक पडतो. करंजबाबत यातले मूलभूत संशोधन IISc बंगलोर च्या शास्त्रज्ञांनी केले आहे. 


अमेरिकेत, युरोपमध्ये अनेक वर्षे बायोडिझेलचा वापर चालू आहे. मोठ्या प्रमाणावर फक्त तेच वापरावे असे केले गेले नाही कारण किंमत डिझेलपेक्षा जास्त होती.  साधारण चाळीस -पंचेचाळीस रुपये तऱी खर्च येतो. पण आता डिझेलची किंमतही वाढत जाउन तेवढीच होउ लागली आहे, शिवाय पुढे अजून वाढेल आणि. बायोडिझेलची मात्र त्या तुलनेत वाढणार नाही त्यामुळे आता बायोडिझेलची वेळ आली आहे.


आम्ही गेली काही वर्षे यात काम करत आहोत. मी मागे उल्लेख केले त्या क्षमतेचे दोन प्रकल्प उभारत आहोत, एक खाजगी जमीन व मालकीचा तर दुसरा मेळघाटातल्या वनवासींसाठी. त्यासंबंधी पुर्वतयारी म्हणून त्याची पुर्वतयारी म्हणून १५० टन क्षमतेचा एक चाचणी प्रकल्प गेले वर्षभर चालवत आहोत, त्यातले डिझेल हे ASTM युरोपमधून automotive grade म्हणुन प्रमाणित करून आणले आहे आणि त्यावर आम्ही स्वत्: जनसेट्स, बसेसपासून ते अगदी एक स्कोडाही चालवत आहोतच, शिवाय नियमित विक्रीही करत आहोत.  (विक्रीची किंमत ही, ३५ रुपये आहे उर्वरीत उत्पन्न हे वीजनिर्मिती व खतापासून मिळते.)

६) भारतात अन्नधान्य महागेल ?
नाही. कारण एक म्हणजे केवळ अखाद्य तेलबियांपासूनच भारतात डिझेल बनवता येईल. खाद्य तेलांपासून नाही, तशी परवानगी मिळणार नाही आणि ते परवडणारही नाही.
दुसरे म्हणजे करंजासाठी जमीनही जिथे पिके घेता येत नाही अशीच वापरायची आहे.


पण या अखाद्य तेलबियांची चणचण मात्र नक्कीच जाणवेल.


७) गोबरगॅस चे काय झाले?
तंत्रज्ञानात काही चूक नाही यशस्वी आहे. पण तेवढे शेण, पाणी कुठुन आणायचे असा प्रश्न आहे. शिवाय टाकीसाठी जागा आणिहाही खर्च प्रश्न आला. भरपूर म्हशी असणाऱ्यांसाठी अजूनही उपयूक्त अशीच गोष्ट आहे ही.


७) सौरऊर्जा हा आपल्यासारख्या 'उष्ण कटिबंधीय' देशांना उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु तो अजूनही खूप महाग आहे. त्यावर संशोधन करून खर्च कमी करण्याचा वा काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण करीत नाही. गोरा साहेब संशोधन करेल व आपल्याला आयते मिळेल अशी आपली इच्छा असते. पण गोऱ्या साहेबाच्या देशात हा पर्याय फारसा उपयुक्त नसल्याने तेथे त्यावरील संशोधन प्राधान्यक्रमात खूपच खाली आहे. मग साहेब उदासीन तर आम्हीही उदासीन.


सहमत.


८)दुर्दैवाने या किंवा अशा काही समस्या या (बायोडिझेल) पर्यायातही उद्भवल्या तर त्यावर उपाययोजना शोधणारे चांगले संशोधकही इथेच तयार व्हायला हवेत. ही सुद्धा एक महत्वाची गरज आहे असे आवर्जून नमूद करावेसे वाटते.


यातल्या प्रत्येक पायरीसाठी लागणारे संशोधन करण्यासाठी. ( उदा करंजाची महाप्रचंड प्रमाणात झाडे लागतील त्यासाठी, अधिक तेल देणाऱ्या बियांसाठी, लौकर उत्पन्न मिळण्यासाठी टिश्यू कल्चर, कलमे याबाबत), खताची उपयुक्तता वाढवण्या,साठी यातून उपुत्पादन म्हणून मिळणारे ग्लिसेरॉल शुद्ध करून त्याच्या उपयोगासाठी, वीजनिर्मिती ही बायॉडिझेल व बायोगॅस या दोन्हीपासून एकाच जनरेटरद्वारे करता यावी यासाठी अशा प्रत्येक पातळीवर संशोधन करण्यासाठी आम्ही एक प्रयोगशाळाच उघडली आहे ज्यात या वेगवेगळया क्षेत्रातले संशोधक काम करत आहेत.


९) आम्ही सगळे काय करू शकतो ?


खर म्हणजे मला माहीत नाही. सध्या आम्हाला वनवासींना देण्यासाठी जी मदत पाहिजे आहे ती सरकार वा फार मोठ्या संस्थाच करू शकतील. त्यामुळे त्याबाबत आपण काही मदत करू शकत असाल तर उत्तम. वर मी म्हटल्याप्रमाणे एका प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये एवढ्या दहा वर्षासाठीच्या व्याजमुक्त कर्जाची गरज आहे.
दुसरे म्हणजे शक्य तिथे पडीक जमिनिवर करंज लावा, भविष्यात भरपूर उत्पन्न मिळणार आहे हे लक्षात ठेवा, हा संदेश सगळीकडे जाउ द्या जमेल तर स्वतः करा, तुमच्या गावाला प्रवृत्त करा. शंभर वा जास्त एकरावर करणार असाल तर आणि स्वतः येणे शक्य नसेल तर तुमच्या वतीने तसे करण्याची व्यवस्था करता येईल.


पुन्हा एकदा धन्यवाद.