तिला मला...

सगळे कळे तिला अन् सगळे कळे मला
शब्दात तीक्ष्ण काटे खुपले  तिला मला


संवाद पाकळ्यांचे खुडले कुठून गेले
मधुरात्र भंगताना दिसले तिला मला


या कोरड्या जगाला का वेदना कळाव्या
अश्रूंबरोबरी या टिपले तिला मला


वाट्यास ना मिळाव्या थोड्या निवांत घटिका
का व्याप वाटताना गुणले तिला मला


हे बंध रेशमाचे सुटणार ना कधीही
ना गाठ बांधली पण विणले तिला मला