सखाराम गटणे

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील पात्रांचा खऱ्या आयुष्यातील घटना अथवा पात्रांशी काहीही संबंध नाही.
ही कथा पूर्णपणे "ओरिजिनल" असून (लेखक इतरांचे लेखन वाचतच नाही हो) यापूर्वी इतर लेखकांनी लिहीलेल्या एखाद्या कथेशी याचे साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा).


"३४१ तुम्हीच का?" ३४१ हा विषय नंबर नसून कैदी नंबर आहे अशा अविर्भावात मला विचारत सखाराम गटणे माझ्या हपिसात आला.
"ये बस बाळ, बोल तुला काय शंका आहे?" ब्रह्मदेव असल्याच्या थाटात मी ज्याकिटाची वर केलेली कॉलर तशीच ताठ ठेवत भेदरलेल्या सखारामाला धीर दिला.
"परवा 'सबमिट' करायचाय आणि आज 'कंपाईल' होत नाहीये" रडवेला चेहरा करत सखारामाने आपली दिनवाणी कहाणी मला सांगितली.
"काही नाही होत हो, मी आहे ना" 'जी++ कंपाईलर' मीच लिहिला आहे अशा अविर्भावात मी उत्तर दिले.
(आता या कथेमध्ये जर मी एक पात्र म्हणून असलो तर तो मी वर दिलेल्या काल्पनिक पात्रांच्या नोटीशीचा भंग होईल आणि समीक्षक लगेच मला "कारणे दाखवा" म्हणून नोटीस बजावेल, त्यामुळे यापुढे मी माझा उल्लेख ब्रम्हदेव म्हणून करेन)


जाड भिंगाचा चष्मा, तोंडावरती केविलवाणे भाव, लॉगिन करताना थरथरणारे हात, आणि सी++ चे अगाध ज्ञान यावरून आपल्याकडे आलेला विद्यार्थी हा सखाराम असावा हा अंदाज कुठलाही ब्रम्हदेव लगेच बांधेल. त्या थरथरणाऱ्या हातांनीच त्याने लॉगिन केलं आणि ब्रम्हदेवाची ट्यूब पेटली. ब्रम्हदेवाने विचार केला, मागच्या वर्षी आपण हाच विषय शिकवत होतो तेंव्हा तपासायला सगळ्यात सोपा असणारा पेपर ज्या मुलाचा असायचा त्याचं नाव सुद्धा असंच काहीसं होतं ना! ४०-४० पेपर तपासता तपासता बिचाऱ्या ब्रम्ह्देवाच्या नाकी नऊ यायचे. पण मग सखारामच काय ती थोडी फ़ार दया दाखवायचा. आपल्या लाडक्या "शिक्षण सहायका"ला त्रास होऊ नये म्हणून सख्या काही लिहायचाच नाही. त्यामुळे सख्याच्या पेपरावर मोठा भोपळा काढून ब्रम्हदेवाला लगेच पुढचा पेपर बघता यायचा.


"इथे 'एरर' येतेय" सख्याच्या त्या साऊथ ईस्ट एशिअन बोलीमधल्या तोडक्या मोडक्या इंग्रजी मधल्या बोलांनी आदली रात्रं चॅटींग करत जागल्यामुळे बसल्याबसल्या पेंगणारा ब्रम्हदेव जागा झाला.
"कुठे म्हणालास?" ब्रम्हदेवाने झोप झटकत विचारलं.
"हे इथे, क्लास नॉट फ़ाऊण्ड म्हणतोय वेडा कुठला." "च्यांव च्यांव SS, प्यांव प्यांव SS, " सख्याच्या शुद्धं उच्चारांनी ब्रम्हदेवाच्या सदाशिव पेठी इंग्रजीची (खरं तर कृष्णाकाठी इंग्रजीची म्हणायला हवं, पण कृष्णाकाठी इंग्रजी हे थोडं छत्रपतींच्या राज्यातलं वाटतं, ब्रम्हदेवाचं इंग्रजी हे जास्ती पेशव्यांच्या राज्यातलं असल्यानं ते कृष्णाकाठी पेक्षा सदाशिवपेठी वाटतं, असो.) चांगलीच परीक्षा घेतली.
आता या सख्याला कसं समजावं की याने तो क्लास कुठे शोधायचा ते त्या वेड्याला सांगितलंच नाहीये, तर तो वेडा तरी काय करणार! हे समजवण्यसाठी सख्याला आधी class काय असतो ते समजावं लागेल. पण खाल्ल्या मिठाला जागून कर्तव्यभावनेने ब्रम्हदेव जीवाचा आटापीटा करू लागला. आजपर्यंत "चेहऱ्यावरची माशी सुद्धा नं हलणे" हा वाक्प्रचार फ़क्त 'स्लीप' मध्ये शांत उभा राहून 'कॅप्टनशिप' करणाऱ्या किंवा 'मॅच' मध्ये सपाटून मार खाल्ल्यावर 'प्रेझेंटेशन सेरेमनी' मध्ये काहीही उत्तरं देणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीनलाच लागू पडते असा ब्रम्हदेवाचा भ्रम होता. आपल्या 'एक्स्प्लनेशन' ला निर्विकारपणे प्रतिसाद देणाऱ्या (निर्विकारपणे प्रतिसाद देता येतो का? जाऊदे, लेखकाची मर्यादा म्हणून सोडून द्या.) सख्याच्या चेहऱ्यावर माशी येऊन बसली नसल्यामुळे सख्या सुद्धा अझरुद्दीनच्याच पंक्तीमध्ये येतो का ते काही ब्रम्हदेवाला पडताळून बघता आलं नाही. तास दीड तास गेला, ब्रम्हदेवाने सगळे मार्ग वापरून बघितले. आधीच रुंदावत चाललेला ब्रम्हदेवाचा भालप्रदेश या जोरदार लढाईत गळालेल्या २-३ केसांमुळे अजूनच निस्तेज दिसू लागला.


पण ब्रम्हदेव करणार तरी काय! ओरडावं म्हंटलं तर सख्याची सशासारखी भेदरट मूर्ती बघून ब्रम्हदेवाचा राग पाघळून जातो. शेवटी पाटा पिचवर टेस्ट मॅच चे सलग २ दिवस बोलिंग करायला लागल्यावर 'बोलिंग टीम' जी युक्ती वापरते ती युक्ती ब्रम्हदेवाला सुचली- वेळकाढूपणा. आपली स्वर्गातल्या नोकरीची शेवटची १० मिनिटं राहिली आहेत हे लक्षात येताच, सख्याच्या वडिलांचं खरंच आप्पा बळवंत चौकात 'साइनबोर्ड पेंटींग'चं दुकान आहे का बघूया म्हणून ब्रम्हदेवाने त्याची इकडची तिकडची चौकशी सुरू केली. पण कुठलं काय! आप्पा बळवंत चौकात तर सोडाच सख्याच्या खानदानातल्या कोणीही पुण्याला सुद्धा भेट दिलेली नाही हे त्यानेच ब्रम्हदेवाला सांगितलं. कसे देतील म्हणा, 'व्हिसा' कुठे आहे त्यांच्याकडे! अशा गप्पा मारता मारता सख्या आपले शंकांचे दु:ख विसरून गेला आणि ती १० मिनिटं संपली. आजकाल विषय नंबर ३४१ ला 'कॉल सेंटर' सारखं 24 X 7 'कव्हरेज' असतं. त्यामुळे ब्रम्हदेवाची नोकरी संपल्यावर लगेच विष्णू आला, आणि सख्याला त्याच्याकडे सुपूर्त करून ब्रम्हदेवाने काढता पाय घेतला.


ता. क. - माझ्यासह अनेक होतकरू लेखकांचे स्फ़ूर्तीस्थान असणाऱ्या एका महान लेखकाच्याच धोतराला (खरं म्हणजे लेंग्याला) हात घालून मी लहान तोंडी मोठा घास घेतला आहे खरा. पण सातासमुद्रापार जिथे मी राहतो, तिथे बरिटो नावाचा एक पदार्थं मिळतो, तो खाताना इतका मोठा आ वासावा लागतो की आजकाल असे मोठे घास घेण्याची सवयच लागून गेली आहे. तरी चूकभूल द्यावी घ्यावी.


संदर्भासह स्पष्टीकरण: सदर कथेतील ब्रम्हदेव हे पात्रं विलायतेतील कुठल्याही विद्यापीठात पोत्याने सापडणाऱ्या आणि पोटापाण्यासाठी 'शिक्षण सहायक' म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थी जमातीतील आहे. सखाराम हे पात्र ब्रम्हदेवाकडे तो शिकवत असलेल्या विषयातील शंका घेऊन आले आहे.