मंत्रालयात मराठी पाट्या!

म. टा. त ही बातमी आज वाचून बरे वाटले. ह्यावर मनोगतींना चर्चा करता यावी म्हणून येथे ती बातमी उतरवून ठेवत आहे.


म.टा. तील मूळ लेख : डी. के. नव्हे; दे. कृ. शंकरन!
शनिवार, २ सप्टेंबर २००६. 
म. टा. प्रतिनिधी, मुंबई


महाराष्ट्राच्या मंत्रालयातील पाट्या मराठीतच पायजेत... असा आवाज शिवसेनेने घुमवल्यानंतर अनेक अधिकारी तसेच मंत्र्यांच्या दालनांबाहेर मराठी पाट्या झळकू लागल्या असल्या तरी नोकरशाहीचे प्रमुख असलेले मुख्य सचिव डी. के, शंकरन यांनी मात्र तसा बदल केला नव्हता. तो बदल शनिवारी झाला... नव्हे शिवसेनेने केला... मात्र इंग्रजी पाटीला डांबर फासून नव्हे, तर 'डी. के. शंकरन'वर 'दे. कृ, शंकरन' असे स्टीकर लावून...!


मंत्रालयातील इंग्रजी आद्याक्षरांच्या पाट्या बदलण्यासाठीचा इशारा शिवसेनेने मध्यंतरी दिला होता. त्यानुसार काही बदल झाले देखील. मात्र नोकरशाहीचे प्रमुख असलेले मुख्य सचिव डी. के. शंकरन यांची पाचव्या मजल्यावरील दालनाबाहेरची इंग्रजी आद्याक्षरातील पाटी कायम होती. त्यामुळे शनिवारी दुपारी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी मंत्रालयात धडक मारली. दुपारी चारच्या सुमारास ते आपल्या पीएसोबत शंकरन यांना भेटण्यास गेले. त्यावेळी शंकरन कमिटी रुममध्ये मिटींगमध्ये होते. त्याचवेळी रावते यांनी 'दे. कृ. शंकरन' अशा मराठीतील स्टीकरची पट्टी मूळ इंग्रजी पट्टीवर लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिस शिपाई शांताराम चव्हाण व रावते यांच्यात खडाजंगी झाली. आपण येथे केवळ मराठी पाटी लावण्यासाठी आलो आहोत... त्यात कायद्याचा भंग करण्याचा प्रश्नच नाही. तरीही आपल्याला अटक करायची असेल तर करा, असे रावते यांनी पोलिसांना खडसावले!


हे नाट्य सुरू असतानाच शंकरन यांच्या सचिव आणि विशेष अधिकारी सुधीर ठाकरे तेथे धावत आले. तोपर्यंत वॉकीटॉकीवर सुरक्षारक्षकांनाही संदेश गेले... पोलिसांचा लवाजमाही तेथे दाखल झाला. पण इप्सित साध्य झाल्यावर रावते तेथून निघून गेले. रावते यांनी शंकरन यांच्या नावावर लावलेले मराठी स्टीकर संध्याकाळीही तसेच होते.


मंत्रालयातील इंग्रजी पाट्यांना डांबर फासण्याचा इशारा याआधी देण्यात आलेला असला तरी तसे करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभले नसते, म्हणून मग आपण त्याऐवजी स्टीकरच लावले, असे रावते म्हणाले. विदर्भातील 'सांत्वन दिंडी'ची समाप्ती झाल्यावर मंत्रालयातील फायलींवर मराठीतच शेरे असावेत, यासाठी देखील आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी जाहीर करून टाकले.


नामफलकाबाबत १० जानेवारी, १९६१ रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार अधिकाऱ्यांनी नामफलकात नावापुढे श्रीमती आणि कुमारी लिहू नये. नावाची आद्याक्षरे इंग्रजी वर्णमालेनुसार देवनागरी लिपीत रुपांतरित करू नयेत. नावाच्या आद्याक्षरानंतरच आडनाव लिहावे. महिला अधिकाऱ्यांना वाटल्यास त्यांना पती अथवा पित्याच्या नावाचे आद्याक्षर त्यांचे नाव आणि आडनाव यामध्ये वापरण्याची मुभा आहे., मात्र मंत्री, राज्यमंत्री, सचिव यांनी प्रचलित पद्धतीप्रमाणे अथवा या नव्या पद्धतीप्रमाणे नामफलक ठेवण्यासाठी संबंधित मंत्री व सचिव यांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.