घरचा गणपती १

घरचा गणपती १

या वर्षी मी म्हटल्याप्रमाणे (http://www.manogat.com/node/7276) ब-याच सार्वजनिक मंडळांनी आणि घरी गणपतीची स्थापना करणा-यांनी पुष्कळ 'इकोफ्रेंडली' पणा दाखवला. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ठाणे , पुणे यांसारख्या शहरांत गणेश विसर्जनाकरता काही ठिकाणी कॄत्रिम तलावही तयार करण्यात आले होते. गेले १० दिवस वर्तमान पत्रात येणा-या ठिकठिकाणच्या माहितीवरून एकूणच असे लक्षात आले की हळूहळू जनजागॄती होत आहे. काही सार्वजनिक मंडळे स्वतःहून मुर्तीच्या उंचीवर बंधने पाळत आहेत. गुलालाचा वापर टाळत आहेत. आलेला सगळाच पैसा उधळून न टाकता जमेल तशी समाजसेवा पण करत आहेत. ह्या सगळ्या मंडळांचे मिळून एकूण प्रमाण कमी असेल पण हे ही नसे थोडके. निदान सुरूवात तर झाली आहे.

घरी गणपती आणणा-या ब-याच लोकांमध्ये या वर्षी स्वतःच शाडूची माती आणून मुर्ती बनवण्याचा किंव्हा चांदीची मुर्ती आणून स्थापन करण्याचा एक ट्रेंड पाहायला मिळाला. जो अतिशय स्तुत्य आहे. उत्सवप्रिय समाजाच्या उत्साहाला कुठेही खीळ न बसता आणि पर्यावरणाला हानी न पोचवता जर उत्सव साजरा करता आला तर त्यात काही गैर नाही. अर्थात समाजात होत असलेल्या प्रत्येक छोट्या बदलाचा दूरगामी परीणाम होतच असतो. गेले दोन वर्ष महाराष्ट्र ज्या पुरावस्थेतून जातोय. ते याचे उत्तम उदाहरण म्हणून देता येईल.

मगाशी मी ज्याचा ट्रेंड म्हणून उल्लेख केला ती प्रथा आमच्या घरात मात्र गेले २६-२७ वर्ष चालू आहे. आमच्या घरी चांदीची मुर्ती स्थापन केली जाते. त्यामागचा इतिहास असा की...

माझे सासरे हे घरातले सगळ्यात मोठे भांवड. त्यांच्यामागे एक भाऊ आणि ३ बहिणी. भावाने आणि त्याच्या बायकोने घरातल्या कोणत्याही सणा-समारंभात कधीच भाग घेतला नाही. एकत्र कुटुंबात राहून सुध्दा ते फटकूनच राहात असत. माझे सासू-सासरे धार्मिक विचारांचे असल्याने  हळूहळू घरात कुरबुरी वाढू लागल्या , कुटंब वाढलं तेव्हा माझ्या सास-यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. प्रथेप्रमाणे सगळे कुळधर्म मुलांनी वाटून घ्यायला हवे होते. पण वर कारण लिहीले असल्याने , माझ्या सास-यांनी ते सगळे विनातक्रार स्वतःकडे घेतले.
वेगळं झाल्याने सासरी गेलेल्या बहिणींनी संबध तोडला. भाऊ तर कधीच ह्या भानगडीत पडला नव्हता. त्यामुळे घरी गणपती-गौरी, देवीचे नवरात्र, खंडोबाचे नवरात्र, होळी सारखे सगळे कुळधर्म होत असून सुध्दा घरचे कोणीही मदतीला येत नसत. माझ्या सास-यांना ब्लडप्रेशर, डायबेटीस सारखे रोग आधी होतेच त्यात आता हॄदयरोगाने पण साथ द्यायला सुरूवात केली. माझा नवरा त्यावेळी फक्त १०-११ वर्षांचा होता. शेवटी मनाशी धीर करून आमच्या कडे नेहमी पुजेला येणा-या,दशग्रंथी ब्राम्हणांना विचारून माझ्या सास-यांनी त्यांच्या लग्नाला २१ वर्षे पुर्ण झाल्यावर त्यावेळच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार एक बोट उंचीच्या गणपतीच्या चांदीच्या भरीव मुर्तीची रीतसर प्रतिष्ठापना केली.

तिथपासून आजतागायत आम्ही त्याच मुर्तीची प्रतिष्ठापना दरवर्षी करत आहोत. आम्ही ती मुर्ती दररोजच्या पुजेत ठेवत नाही. मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा मला स्वतःला हे थोडे चमत्कारीक वाटले होते. पण त्यानंतर अनेक प्रसंग आले की माझ्या सास-यांनी त्यावेळी चाकोरीबाहेर जाऊन घेतलेला निर्णय योग्यच होता हे पटले.

आज चांगली मोठी मुर्ती आणण्याची ऎपत असतानाही त्या छोटेखानी मुर्तीचे अनभिषिक्त साम्राज्या आमच्या मनावर आहे. आमचा मुलगा जेव्हा ४ - ५ वर्षाचा झाला तेव्हा त्यालाही घरातल्या आणि इतरांच्या गणपतीत फरक जाणवला. तो आमच्या मागे सारखा लागायचा की आपण पार्थिव (मातीचा) गणपती आणुया म्हणून. आम्हाला त्याचा बालहट्ट कसा मोडावा ते कळेना. पण एका वर्षी आम्ही तिघे संध्याकाळी आमच्या जवळ असणा-या गोराई खाडीवर पाय मोकळे करायला गेलो होतो. नुकतेच नवरात्र होऊन गेल्याने तिथे अनेक विसर्जित केलेल्या मुर्त्या भग्नावस्थेत पडल्या होत्या. काही गणपतीच्याही मुर्त्या होत्या. ते पाहून आम्ही मुलाला विचारले कि "बघ, आपला बाप्पा छोटा आहे, चांदीचा आहे म्हणून आपण त्याचे घरातच विसर्जन करतो. जर आपण सुध्दा मातीची मुर्ती आणली असती आणि तिची अशी अवस्था झाली असती तर ते तुला आवडले असते का ?" आमच्या या प्रश्नाचा त्याच्यावर बराच परिणाम झाला आणि त्यानंतर आजतागायत त्याने कधी पार्थिव(मातीच्या) मुर्तीकरता हट्ट केला नाही.

क्रमशः