निर्वांणीचा खेळ - पूर्वार्ध


निर्वाणीचा खेळ - Ultimatum Game


राम श्यामला म्हणाला "श्याम - मी तुला दोन पर्याय देतो आहे - पहिला पर्याय स्वीकारलास तर तुला १० रुपयांची बक्षिसी! दुसरा पर्याय निवडला की मात्र काहीच मिळणार नाही. अर्थात कोणता पर्याय निवडायचा ते मात्र तूच ठरव..."


१०० तील ९९ श्याम डोळे झाकून १० रुपये खिशात टाकतील याची आपल्यालाच काय पण अगदी "भल्याभल्यां"नाही खात्री आहे. पण खरच का असे घडेल?


पाहू या तर मग! ...


राम, श्याम आणि एकलव्य अगदी योगायोगाने एकमेकांना भेटले. ओळखीपाळखी झाल्या... गप्पा रंगल्या... विषयातून विषय रंगत गेले.


त्याच ओघात एकलव्याने रामश्याम या जोडगोळीला सांगितले - "मला तुम्हा दोघांत मिळून १०० रुपये द्यायचे आहेत. अगदी सहजच! पण कोणाला किती द्यायचे हे मात्र मी सांगणार नाही. तुमचे तुम्हीच हे वाटून घ्यायचे आहेत ... फक्त पहिल्यांदा रामाने हे ठरवायचे की त्याला स्वत:ला किती रुपये हवेत आणि श्यामला किती मिळावेत! त्यानंतर श्यामने हे ठरवायचे की रामची ही वाटणी मान्य करायची किंवा नाही. रामाने सुचविलेली वाटणी श्यामला पटली तर माझे १०० रुपये तुम्ही दोघांनी तसे खुशाल वाटून घ्यावेत. पण श्यामला जर ती रुचली नाही तर मात्र मी माझे १०० रुपये माझ्याकडेच ठेवणार!"


ह्म्म्म....


थोडा वेळ विचार करून राम श्यामला म्हणाला - "तुला हवे तर १०० तील १० रुपये घे.... नाहीतर तुला काहीच मिळणार नाही हे लक्षात घे."
======================================


झाले! गोष्ट संपली...


श्यामने काय केले हे मी सांगत नाही... पण काय केले असेल ह्याबद्दल तुम्ही मात्र जरूर विचार करा.


हा श्यामवर अन्याय आहे ... त्याला संधीच नाही अशी बोंबाबोंब करून काहीही फायदा नाही. अहो त्याला काहीतरी मिळेल याची व्यवस्था केलीय ना एकलव्याने? तरीही आरडाओरडा म्हणजे कमालच झाली म्हणायची. पटलं तर घ्या नाहीतर **! अहो फासे हे नेहमीच उलटे पडणाऱ्या तुम्हाआम्हाला हे काही नवीन नाही.


बरं ते जाऊ दे. पण रामच्या जागी तुम्ही असाल तर किती रुपये स्वतःकडे ठेवाल? तुम्ही श्यामच्या जागी असता तर ५० रुपये मिळाल्यावर तरी वाटणी मान्य केली असती काय? उगाच भावनांत गुंतून उत्तर देऊ नका. हा पैशाचा मामला आहे... हावरटपणा वगैरे काहीही नाही. निव्वळ व्यवहार आहे. (मराठी माणसाला तसा व्यवहार कळतच नाही असेही म्हणतात.)


अर्थशास्त्राच्या सूत्रानुसार वरील व्यवहारामध्ये रामाने १० रुपये श्यामला देणे हाच "सुज्ञ" निर्णय आहे. तसेच हे १० रुपये स्वीकारणे हाच श्यामसमोरील उत्तम (किंबहुना एकमेव फायदेशीर) पर्याय आहे. असे निर्णय घेणारे "राम" आणि "श्याम" स्वत:चे भले करून घेतील; त्यांना उत्तम नोकऱ्या मिळतील; त्यांना भरभराटीचे उद्योग उभे करता येतील.


हे खरे असले तरीही अनुभव मात्र असा नाही...


जागोजागच्या एकलव्यांनी जगातील अनेक रामश्यामच्या जोडीसमोर हा असा प्रस्ताव मांडून पाहिलेला आहे. बहुतेक "श्याम" हे १० रुपये ठोकरून देतात.
इतकेच नव्हे तर जर रामाने २० रुपये दिले असते तर कदाचित श्यामने ते स्वीकारले असते असेही दिसते... पण तरीही बहुतेक "राम" स्वतःला ५० रुपये ठेवून उरलेले ५० रुपये श्यामला देऊ करतात असे लक्षात आले. कदाचित बरोबरीचा वाटा केला नाही तर बरेच गमवावे लागेल की काय अशी भीती "राम"च्या मनात असावी असे वाटते.


======================================


तळटीप -
या जगतातील व्यवहार कसे आणि का चालतात याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न नेहमीच चालू असतो. अर्थ/समाज/मानस... या शास्त्रांमध्येही अनेक सुंदर आणि सहज प्रयोग/सूत्रे/विचारधारा यातून हीच धडपड चाललेली असते. या विश्वाची जशी जमेल तशी तोंडओळख येथे करून देण्याचा मानस आहे.


जगाकडे आणि स्वतःकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मला त्यांतून लाभली... तसेच मनसोक्त आनंदही मिळाला.