रंगले मन तुझ्या रंगी बावरीचे
सूर झाले कृष्णवेड्या बासरीचे
कैकदा डोळ्यांस माझ्या भार होते
काय करू या आठवांच्या सावरीचे ?
तू जिथे वेढून येशी हरदिशेने
पाय जाती गोठूनी या नाचरीचे
चिंब करण्याला पुन्हा आली कुठे ?
दूर आता घर असावे त्या सरीचे
कोणत्या शब्दांत बांधू वादळे ही ?
समजूनी घे अधोमुख हे लाजरीचे
वेगळी जडले धरेला हरघडी मी
भेटले आभाळही नाना परीचे
तुडवूनी जी चालले कळसास सारे
नाव त्या 'आनंद' आहे पायरीचे