भामा उवाच

चाल: रात्रीस खेळ चाले या गुढ चांदण्यांचा
       
किंवा
       ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
       
(टेक युअर पिक) 


चल दूर हो मुकुंदा, कळली तुझी लबाडी
रात्री तुझ्या महाली जागून कोण गेले
करशी कशास लाडीगोडी, हरी, सकाळी
विरहात सांजवेळी लोटून कोण गेले
पाव्यासवे तुझ्या ही, लाली तिचीच ओठी
हे सूर मीलनाचे लावून कोण गेले
का गंध रुक्मिणीचा श्वासातुनी उमाळे
वेणीतल्या फुलांना हुंगून कोण गेले
सवतीस कल्पिता मी, बाहूत केशवाच्या
अंगार अंगपांगी फुलवून कोण गेले
झुरले तुझ्याविना मी, तू रंगलास रासी
जीवास डागण्या ह्या देऊन कोण गेले
का पारिजात माझा फसवा तुझ्याप्रमाणे
बघ अंगणा तियेच्या शिंपून कोण गेले
रुसवा ठरे क्षणाचा, येता समीप कान्हा
हलकेच रंग गाली चढवून कोण गेले