महादजी शिन्दे यांची छत्री

 

वानवडी व तेथील महादजी शिंदे यांची छत्री याबद्दल माझे फर्स्ट इंप्रेशन्स मी मुक्काम वानवडी या लेखांत मी दिले होते. दुवाबाजी टाळण्यासाठी त्यातील थोडा भाग उद्ध्रुत करून पुढील वर्णन देत आहे.


पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिन्दे यांची छत्री आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या?) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत ते ती इथे विसरून गेले की कुणाला तरी त्यांनी आपली आठवण म्हणून ठेवायला दिली होती अशी पृच्छा सुद्धा केली होती. ती एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत  आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.


वानवडीमधील एका छोट्या रस्त्याच्या टोकाला महादजी शिंदे यांची सुप्रसिद्ध छत्री उभी आहे. ते जरी सन १७९४ मध्ये स्वर्गवासी झाले तरी त्यांच्या वंशजांनी सन १९१३ मध्ये हे स्मारक बांधले अशी नोंद केलेली संगमरवरी शिला तिथे बसवली आहे. नक्शीदार खांब व शिखर असलेले हे एक महादेवाचे प्रेक्षणीय असे मंदिर आहे. त्याची व्यवस्थित निगा राखलेली असल्याने चांगल्या सुस्थितीत आहे. शिंदे घराण्याचे आद्य संस्थापक सरदार राणोजी शिंदे यांच्यापासून अलीकडेच वारलेल्या माधवराव यांच्यापर्यंत सर्वांच्या तसबिरी भिंतीवर टांगल्या आहेत. त्यातच एक श्रीमती विजयाराजे यांचा फ्रेम न केलेला फोटो आहे.


येथील एका शिलेवरील लिखाण थोडे संस्कृतमध्ये व  त्याहूनही थोडक्यात मराठीमध्ये केले असून हिंदीमध्ये लिहिलेली एक स्वतंत्र शिला आहे. त्यावर सुद्धा तत्कालीन संस्थानिकाचे नांव शिंदे न लिहिता सिंधिया असे लिहिलेले आहे. हा बदल कधी झाला हा आणखी एक संशोधनाचा विषय होईल.


संस्कृत लेखावर श्रीनाथ असे लिहिलेले पाहून ते एखादे स्तोत्र असावे असे वाटले. पण खालील मजकूर वाचल्यावर ते महादजी शिन्दे यांनी रचलेले नसून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या छत्रीबद्दल असल्याचे समजते. शिन्देकुलरत्न महादजी हे संवत १८५० माघ शुद्ध १३ बुधवारी वैकुन्ठवसी झाले. त्यांचे प्रप्रपौत्र महाराज माधवराव शिन्दे यांनीसंवत १९८१ ज्येष्ठ शुद्ध ५ शनिवारी या छत्रीची प्रतिष्ठापना केली असे त्यात लिहिले आहे.


या आवारात छत्रीची एक छोटीशी चौकोनी इमारत असून त्यावर एक घुमट आहे. ही इमारत बंदच ठेवलेली दिसली. तिच्या खिडकीमधून आतील समाधीचे दर्शन होते. तेथे त्यांचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. महादजींनी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे सेनापतीपद भूषवले होते व वडगांवच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला होता. ग्वाल्हेर येथे त्यांची राजधानी असली तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ही छत्री बांधण्यात आली.


त्याशिवाय एका दुमजली सुंदर इमारतीत महादेवाचे मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. चुनागच्चीच्या सुबक कोरीव काम केलेल्या भिंतीवर स्टेन ग्लासच्या खिडक्या आहेत. आंत गेल्यावर मधोमध उंच सीलिंग असलेला दिवाणखाना असून बाजूने सज्जे आहेत. त्याच्या कडेने शिन्देकुलातील महारथींच्या तसबिरी मांडून ठेवल्या आहेत. गाभाऱ्याची वेगळी इमारत आहे त्यावर अत्यंत सुन्दर रेखीव काम केलेला उंच घुमट आहे.


एकंदरीत हे एक ऐतिहासिक आठवणी जाग्या करणारे प्रेक्षणीय ठिकाण आहे.