राणी व सोनी

डग्लस ऍडम, ह्या अलीकडच्या काळातील सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाच्या 'मॅगी व ट्रुडी' ह्या कथेचा हा भावानुवाद! मूळ कथा ऍनिमल पॅशन (सप्टे. १९९४) ह्या संग्रहात प्रसिद्ध झाली, परंतु माझ्या वाचनांत ह्या लेखकाच्या मरणोत्तर - प्रकाशित वा अप्रकाशित लिखाणाच्या -  'सॉलमन ऑफ डाऊटस' या संग्रहात आली. मनोगत वाचकांना हा प्रयत्न आवडेल ही अपेक्षा, प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.


ना कुठल्या श्वानास मी खायला घालतो वा त्याची झोपण्याची व्यवस्था करतो, त्याची देखभाल करतो वा बाहेरगावी जाण्यापूर्वी श्वानमित्र व्यवस्था मला करावी लागते. किंवा परिणामी मला त्रास न व्हावा म्हणून अचानकपणे त्याची 'आंतरिक' इंद्रिये काढण्याची व्यवस्था करतो. थोडक्यांत, मी कोणत्याही श्वानाचा मालक नाही. म्हणूनच कुठल्याही कुत्र्याशी माझे औपचारिक वा शिष्टसंमत संबंध नाहीत, असेच मी पटकन म्हटले पाहिजे.


परंतु माझे एकाच नाही तर दोन श्वानांशी तसे चोरटे वा बेकायदेशीर संबंध आले कारण मी त्यांचा मालक नव्हतो. पण परिणामी एखाद्या अंगवस्त्राच्या भावनांची मला थोडीफार कल्पना आली. येथे 'अंगवस्त्र' हा जुन्या वळणाचा शब्द वापरण्याचे कारण, तसा मी काही संस्कृतप्रेमी वा एखाद्या 'बोधिनी'चा सक्रिय अनुयायीही नाही. परंतु 'रखेल' हा उच्चार होताच तो स्त्रीवाचक वाटतो तरी. आणि आजकाल म्हणे 'तो'ही ठेवलेला असतो. दोन्ही लिंगांना समान संबोधीत करणारा एखादा शब्द असेलही. परंतु तो सर्वांनाच समजेल असे नाही. आहे की नाही याबाबत जिज्ञासूंनी कृपया सामंतताईंना फोन करून विचारावे. त्यांचा फोन नंबर 'मटा' वा 'लोस'च्या कार्यालयांत सहज मिळेल. याशिवाय 'रखेल' या शब्द वापराने मी समस्त स्त्रीवर्गाचा अवमान केला आहे वगैरे ताशेरे वाचकांच्या पत्रव्यवहारात एखाद्या स्त्रीमुक्ती वा मुक्त स्त्री चळवळ यासाठी खास राखून ठेवलेल्या जागांमधून येतील.... असो, तर गेलो भरकटत...


तर ही कुत्री शेजारील नाहीत. ह्याच घरांतली अर्थातच नाहीत. तर आता सरळ वस्तुस्थितीकडे वळतो. ती राहतात सतोली नांवाच्या - नैनिताल व अल्मोडा यामधील रांगांमध्ये, मुक्तेश्वरच्या जवळ, हिमालयाच्या कुशीतील एका गांवांत. या देशांत वा संस्कृतीत जन्माला येण्याने आपणांस काही जन्मसिद्ध हक्क व कवच-कुंडले प्राप्त होतात. समज आल्यापासून व जरा काही कळायला लागल्यापासून आपण हिमालयाची महती गातच असतो, त्याच्या आसपासही न फिरकता. हा आपला जन्मसिद्ध हक्कच. मीही काही काळापूर्वी हा हक्क अबाधित ठेवून होतो. तर योगायोगाने सतोली ह्या ठिकाणी एका स्नेह्याच्या अभ्यागत निवासांत, एक पटकथा लिहिण्याच्या निवांतपणासाठी माझी सोय झाली.


हिमालयाच्या या परिसराचे वर्णन खूपच करता येईल. तेथील क्षितिजाजवळ दिसणारी पांचोली पर्वत रांग, मागील नंदादेवीचे शिखर, सूर्यास्ताचे रोजचे बदलते रंग वगैरे... पण हिमालयाचे सान्निध्य खरं तर अनुभवण्यासाठी आहे वर्णनासाठी नाही. शिवाय त्याच्या सान्निध्यांत आपली जन्मसिद्ध कवचकुंडले अगदी गळून पडली नाहीत तरी त्यांचे कंगोरे मात्र नक्कीच बोथट होतात.


तेथील माझ्या शेजाऱ्यांना मी कधीच भेटलेलो नाही, ते या अतिथिगृहापासून साधारणपणे अर्ध्या, पाऊण मैलांवर राहत असावेत. परंतु दुसऱ्याच दिवशी सकाळी मी भटकण्या, फिरण्यासाठी बाहेर पडलो तेंव्हा त्या शेजाऱ्यांच्या श्वानद्वयींशी माझी ओळख झाली. मला पाहतांच ती दोन कुत्री जणू काही आमचे पूर्वजन्माचे ऋणानुबंध असल्यासारखी अत्यंत उल्हसित होऊन आनंदाने उड्या मारू लागली. या परिसरांत वास्तव्य असल्याने कदाचित त्यांना पूर्वजन्मसंबंध वगैरे या विषयांचे ज्ञान असावे.


त्यांची नांवे राणी व सोनी. दुपारी साफसफाईसाठी येणाऱ्या सेविकेकडून मला समजले. सोनी अत्यंत गलेलठ्ठ पण गबाळी मूर्ख दिसणारी, काळी कुळकुळीत कुत्री होती. परंतु तिच्या अंगावर एखाद्या मेंढीलाही लाज वाटेल अशी लोकर होती. सोनी जशी काही वॉल्ट डिस्नेच्या कार्टून सिनेमांत बरोबर शोभली असती. दररोज सकाळी मी दिसतांच तिला एवढा आनंद होई की ती आपल्या चारही पायांनी उंच उड्या मारू लागे.


राणीची मात्र आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगळीच होती. मी दिसतांच ती सोनीच्या गळ्याचा चावा घेऊ लागे. परंतु हीच पद्धत आमच्या फिरायला जाण्याचा आनंद व्यक्त करणे... तर दार उघडून त्यांना घरांत घ्यावे वा घराबाहेर सोडावे त्यासाठीही तेच. थोडक्यांत खेळकर व लाडीकपणे सोनीच्या गळ्याचा चावा घेणे हा तिचा एक जीवनक्रमच असावा. राणी दिसायला छान व उमदी होती, तगडी, लांब कान व तोंड. तिच्या जातीचे मूळ या भागातले नसावे. परंतु तिचे देखणेपणच तिचे उत्तम कूळ वा जात व्यक्त करे. या बाबत माझे ज्ञान अगाध असल्याने, मला काम देणाऱ्या मित्राला आपले अज्ञान उघड करिता येईल इतकी जवळीक झाल्यावर या बाबत विचारले, तर त्याने शांतपणे व त्याहीपेक्षा गंभीरपणे मला सांगितले "राणी गाढव आहे!"


तर दररोज सकाळी मी एक लेखक, गुबगुबीत सोनी व गाढव राणी यांचा फिरायला जाण्याचा एक दिनक्रमच आखला गेला. मी कधी थोडाफार पळत, तर कधी चालत, सोनी चारी पायाने हलक्याशा उड्या मारत माझ्या पुढे... तर राणी कधी डावी कधी उजवीकडून सोनीच्या गळ्याचा चावा घ्यायचा प्रयत्न करीत तिच्या पाठोपाठ. सोनी सर्वसाधारणपणे ज्येष्ठतेच्या समजूतदारपणे हे बहुदा सहन करे. परंतु याचा तिला मध्येच कंटाळा आला की अचानकपणे उलटी उडी मारून, चारी पाय ताठून, गुरगुरत राणीकडे पाहत असा पवित्रा घ्यायची की लगेच राणी तिची नजर चुकवून, आपल्या मागील पायांवर बसून गुपचुपपणे स्वतःच्याच उजव्या किंवा डाव्या पंज्याचा चावा घेऊ लागे. तिचा यावेळी आविर्भाव असा असायचा की तिला सोनीच्या सहवासाचा नाहीतरी कंटाळाच आला आहे. क्षणार्धातच. पुन्हा चालायला लागून, उड्या मारण्याचा, लोळण्याचा त्यांचा खेळ नेहमीप्रमाणेच सुरू होई. मध्येच अचानकपणे दोघी थांबून कान टवकारून, नाकपुड्या फिस्कारून हुंगत, कुठेतरी शून्यांत एकाग्र नजरेने पाहत व पुन्हा आपला खेळ चालू करीत.


तर या सगळ्यांत माझा सहभाग काय होता? काहीही नाही. या सर्व तीस-चाळीस मिनिटांच्या कालावधीत त्या दोघी माझ्याकडे हेतुपुरस्सरं दुर्लक्ष करीत. माझी त्याला काहीच हरकत नव्हती. परंतु या प्रकाराचे मला एक कोडे पडे. कारण रोज सकाळी त्या धावत ओरडत नेमस्तपणे येत. माझ्या दारांवर-खिडक्यांवर ओरखडे काढीत - धडका मारीत की मी दार उघडेपर्यंत त्या अत्यंत अधीर असत.


मला काही निमित्ताने जवळच्या शहरांत जायचे  असेल तरच या दिनक्रमात खंड पडे... त्या वेळेस मात्र त्या दोघी बेचैन होत. परंतु याबाबत आपली नाराजी कशी व्यक्त करावी हे त्यांना समजत नसे. असे जरी असले तरीही आम्ही फिरायला बाहेर जाऊ, तेंव्हा मात्र त्या माझ्या अस्तित्वाकडे कटाक्षाने दुर्लक्ष करीत. या प्रकाराने माझे स्वामित्व नसलेल्या त्या कुत्र्यांची बहुधा आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल असावी असेच मला वाटू लागले. कारण माझ्या आसपासच्या अस्तित्वाची खात्री करूनच त्याकडे त्या दोघी हेतुपुरस्सरं दुर्लक्ष करीत. दुर्लक्षण्याकरिता एखादी व्यक्ती आसपास हवीच. त्याखेरीज तिच्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? त्यांच्या ह्या उन्नतीच्या मार्गावर असण्याला, माझ्या मित्राची बायको मला भेटायला आली असतां पुष्टीच मिळाली. त्या दोघी दिसतांच तिने एक चेंडू  त्या दोघींसाठी भिरकावला. त्या वेळेस ह्या श्वानद्वयीने शांत व निर्विकारपणे तो चेंडू हवेत उंच जाताना व त्यानंतर खाली पडून गडगडत जाऊन जमीनीवर कुठेतरी स्थिर होताना पाहिला व आपली नजर पुन्हा तो फेकणारी 'आता काय करते?' याकडे वळविली. कदाचित आम्ही असले 'पोरखेळ' करीत नाही... आम्ही लेखकांच्या सहवासात असतो, असेही त्यांना व्यक्त करायचे असेल.


हे मात्र खरे होते, की त्या पूर्ण दिवसभर माझ्याच सहवासात असायच्या. आणि लेखकांच्याप्रमाणेच त्यांच्या सहवासातील कुत्र्यांनाही प्रत्यक्ष लिखाणाबाबत फारशी पसंती नसावी. म्हणूनच मी लिहायला बसलो, की माझ्या मांडीवर लोळत, मध्ये येणाऱ्या माझ्या हाताच्या कोपऱ्याला हलकेच बाजूला सारीत, केविलवाणे गुरगुरत, घायाळ नजरेने त्या माझ्याकडे पाहत. जणू काही त्यांची अवस्था मी समजून घ्यावी व त्यांना फिरायला बाहेर न्यावे, म्हणजे त्यांना पुन्हा माझ्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करता यावे.


रोज संध्याकाळ होताच त्या आपल्या हक्काच्या घराकडे परतत, जिथे त्यांची खायची, झोपण्याची व इतर संगोपनाची व्यवस्था होई. हे सर्वच माझ्या छान सोयीचे होते. कारण त्यांच्या संगोपनाची कोणतीही जबाबदारी न घेतां त्यांचा सहवास मला छान दिवसभर मिळे.


एक दिवशी सकाळी मात्र उजाडताच नेहमीप्रमाणे राणी आली पण सोनीचा आज मागमूस नव्हता. आज राणी एकटीच कशी? सोनी कुठे गेली? मी बाहेर येऊन सोsनी...सोsनी अशा हाकाही मारल्या. परंतु सोनीची चाहूल कुठेच लागेना. मी थोडा चमकलो. त्या दोघींची मला आता इतकी सवय झाली होती की मी कुठेतरी अस्वस्थ झालो. सोनी कुठे असावी वा तिला काही झाले असेल का? मला काहीच समजेना. त्यांचे स्वामित्वही माझे नसल्याने आता मात्र माझ्या मनांत काही भलत्याच शंका येऊ लागल्या. ती रस्त्यावरच्या कोठल्या वाहनाखाली आली का? की रक्तबंबाळ होऊन ती कुठे रस्त्यावर पडली आहे का? राणीकडे पाहिल्यावर ती मला थोडी अस्वस्थ व काळजीत असावी असे वाटले. तिला सोनी कुठे आहे व तिथे मला नेण्यासाठी ती अधीर असावी असेच मला वाटले. तेंव्हा अधिक वेळ वाया न घालविता मी पटकन् फिरायचे बूट घालून लगोलग राणीच्या मागे निघालो.


डोंगरातील खाचखळगे - आडवाटा घेत राणी पुढे व मी मागे असे मैलोनमैल आम्ही भटकलो. तरी सोनीचा कुठे पत्ताच नाही. पर्यायाने माझ्या लक्षांत आले की राणी 'सोनीच्या' शोधांत नव्हतीच. ती नेहमीप्रमाणे माझ्या अस्तित्वाची खात्री करून त्याकडे हेतुपुरस्सरं दुर्लक्ष करीत होती. मी मात्र खुळचटपणे तिच्या नजरेचे वेगळे अर्थ लावून गुंतागुंत करीत तिच्यामागे भरकटलो होतो. तर शेवटी कंटाळून मी घरी परतलो आणि नेहमीप्रमाणे राणी माझ्या पायाशी विसावली. सोनीबाबत मला काहीही करता येणे शक्य नव्हते कारण मी तिचा मालकही नव्हतो. शेवटी हताशपणे मी एखाद्या अंगवस्त्राप्रमाणे फक्त काळजी व चिंताग्रस्त होऊन वेदनेच्या शून्यात बसून राहिलो. दिवसभर मी अजिबात काहीच खाऊपिऊ शकलो नाही. संध्याकाळी राणी घरी परतल्यावर तर आणखीनच एक भयानक पोकळी जाणवू लागली. त्या रात्री मला नीटशी झोपही येईना. तळमळत बिछान्यावर पडलो असता पहाटे कधीतरी ग्लानी आली.


पण सकाळी नेहमीच्याच वेळेस बाहेर त्यांची खडबड ऐकू आली व मी बाहेर आलो... नेहमीच्याच उत्साहाने त्या दोघी माझ्यासाठी आतुर होत्या... त्या दोघीही! फक्त सोनीमध्ये काहीतरी बदल झाला होता. तिच्या अंगावरची लोकर कुणीतरी बारीक केली होती. तिच्या काना, डोक्या व शेपटीवरचे थोडेफार पुंजक्यासारखे तुरे ठेवले होते. ती काहीतरी विचित्रच दिसत होती. दिनक्रमानुसार आम्ही फिरूनही आलो. त्यांचे नेहमीचे माझ्याबद्दल हेतुपुरस्सरं दुर्लक्षही झाले. पण कुठेतरी मला सोनीच्या आजच्या रूपाबद्दल खंत होती. ती जर माझी असती तर तिला असे विद्रूप मी कधीच होऊ दिले नसते... पण ह्या माझ्या नाईलाजाबाबत स्वतःशीच चिडचिड करण्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हतो.


काही दिवसानंतर माझी परतण्याची वेळ झाली. हे त्या दोघींना समजविण्याचा मी बराच प्रयत्न मी आधीपासून करत होतो. परंतु त्याकडेही त्यांनी दुर्लक्षच केले असावे. कारण माझे सामान मी गाडीत भरत असता त्यांचे पूर्ण लक्षं मात्र एका तिसऱ्याच कुत्र्याशी लगट करण्यात होते, नेहमी प्रमाणे माझ्याकडे सहेतुक दुर्लक्ष करीत. साऱ्या प्रवासभर मला त्यांच्या या वागण्याची मात्र टोचणी लागून राहिली होती.


सुमारे दोन महिन्यांनंतर, मी त्या लिखाणावर दुसरा हात फिरवायला त्या सातोलीच्या अतिथिगृहात दाखल झालो. सहजतेने हाक मारून माझ्या त्या श्वानसखींना बोलविणे शक्यच नव्हते. म्हणून आसपास मोठमोठ्याने चित्रविचित्र आवाज करीत थोडावेळ मी भटकलो... की ज्या आवाजांनी कुत्र्यांचे लक्ष नक्कीच वेधले जावे. शेवटी माझा संदेश त्यांच्यापर्यंत कुठेतरी पोहोचला असावा कारण त्या दोघीही तत्परतेने व अधीरपणे धावत आल्या. आल्यावर बराच वेळ त्यांनी आपला आनंद उत्तेजितपणे उड्या मारून - भिंतीवर धडका मारून -माझ्या अंगास चाटून व्यक्त केला. अर्थातच फिरायला बाहेर पडून त्यांना माझ्याकडे सहेतुक दुर्लक्ष करता यावे असा त्यांना साद देणे हे क्रमप्राप्तच होते.


सोनी चालू लागली, राणी तिच्या गळ्याचे चावे घेऊ लागली. त्यांच्या मागोमाग मी. महिन्याभरानंतर मी परतलो, पण एक जाणीव घेऊन की मी ही एक माणूसच आहे. आता कुत्राळलेलो म्हणा हवे तर, पण मलाही ह्या नवीनच संवेदनांची जाणीव होऊ लागली. माझ्या त्या सख्यांना मी एक वचन दिले जे मी पाळणार आहे. काही दिवसांतच कुणातरी श्वानास मी माझ्या स्वमित्वाची वचनबद्धता देणार आहे.