श्री. यशवंत देव यांचा वाढदिवस

'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक श्री. यशवंत देव यांचा आज ८० वा वाढदिवस...


त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!


देव-सरांच्या मार्गदर्शनाखाली 'शारदा संगीत विद्यालय' (वांद्रे) इथे शब्दप्रधान गायकीमधे पदविकेचा अभ्यासक्रम चालवला जातो. त्यांच्याकडून तिथे ज्या गोष्टी शिकलो, त्याच मी शब्दांत बांधायचा प्रयत्न केलाय.... (यात कुठेही उपमा वगैरे नाहीत. शांता शेळके यांनी 'गुरु ईश्वर, तात, माय' म्हटलंय... यापुढे अजून काय उपमा देणार?). एकदा देव सर म्हणाले होते, मी चाल कवितेतूनच शोधतो, निराळी चाल बांधत नाही. त्यांनी शिकवल्याप्रमाणे, त्यांच्या शिकवण्यातूनच मला हे गीत सुचलंय...


सूर आकारले तुझ्यामुळे...
गीत साकारले तुझ्यामुळे...
[गाणं गाण्यासाठी आधी तोंड उघडा, जबडा खाली करा, तोंडाचा 'पॅराबोला' सारखा आकार झाला पाहिजे इ. गोष्टी ते नेहमी सांगतात आणि त्याची प्रात्यक्षिकं करून दाखवतात. त्यामुळे 'सूर 'आ'कारले...]


काल जे अंतरात राहिले,
आज ते सर्व मुक्त जाहले!
श्वास हुंकारले तुझ्यामुळे...
[गाणं येण्यासाठी श्वासानुसंधान महत्त्वाचं. 'श्वसनैवाधिकारस्ते मा स्वरेषु कदाचन' असं त्यांनी लिहिलं आहे. सूर हा श्वासांतून निर्माण व्हावा. म्हणून  श्वास हुंकारले ...]


हास्य ओठांत या फुलायचे
भाव गाण्यातले खुलायचे!
शब्द झंकारले तुझ्यामुळे...
[गाण्याआधी हसायला शिका... हे त्यांचं नेहमीचं वाक्य. हसलं की गाणं खुलतं हा आम्हांला सगळ्यांनाच अनुभव यायचा. त्यातूनच शब्द झंकारले ...]


गोड गाती अनेक कोकिळा
सूर माझा तयांत वेगळा!
स्वत्व स्वीकारले तुझ्यामुळे...
['अनुकरण' आणि 'अनुसरण' यांत फरक आहे. लता मंगेशकरांचा गळा तो त्यांचा आवाज, तुम्ही तुमच्या आवाजातच गा, असं ते नेहमी सांगतात. यामुळेच स्वत्व स्वीकारले
...]


- कुमार जावडेकर