छोटीशी आत्मकथा !

काही वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. आईबापाने मला वाढविले. माझे शिक्षण झाले. बऱ्यापैकी खटपट करून मी नोकरी-व्यवसायात स्थिरावलो. यथावकाश लग्नकर्तव्य केले. संसार सुरु झाला. आम्हाला मुलं झाली. त्यांना वाढवले. लहानाचे मोठे केले. शिक्षण केले. नोकरीतून निवृत्त झालो. दोन तीन खोल्यांचे घर केले. मुलाबाळांची लग्नं झाली. नातवंडे बघितली...जगाचा निरोप घेतला....


या सर्व ओळींच्या मध्ये फक्त जगत होतो. बरे वाईट अनुभव घेऊन जगत होतो. (कदाचित यालाच जीवन म्हणायचे का?) येवढे सत्तर ऐंशी वर्षे जगल्यानंतरची आत्मकथा पुरत्या सत्तर ऐंशी शब्दांचीही झाली नाही.


ही झाली माझी आत्मकथा. तुमची आत्मकथा लिहीताय ना?


लिहा ना मग....


नाही! माझा आत्मकथांचा सर्व्हे नाही चाललाय ! मला एवढंच जाणून घ्यायचेय की मी खरंच सामान्यच आहे ना?