विना वीज सातारी फ्रीज !

काल महाराष्ट्र टाईम्स मध्ये ही बातमी वाचायला मिळाली आणि अनेक पदरी आनंद झाला. मराठी माणसाचे यश म्हणून. भारतीय उत्पादनाला जागतिक मान्यता म्हणून, विजेचा न-वापर म्हणून, पर्यावरण म्हणून ..... सगळ्यांना तो आनंद वाटावा (दोन्ही अर्थांनी) म्हणून ती बातमी येथे उतरवली आहे.


म.टा. तली मूळ बातमी : राष्ट्रपती भवनात 'सातारी' सौरफ्रीज!
(शुक्रवार, ३ नोव्हेंबर २००६)
अतुल देशपांडे, सातारा


डॉ. राजेंद शेंडे यांनी बनविलेले दोन फ्रीज बुधवारी खुद्द राष्ट्रपतींनी विकत घेतले. शेंडे यांच्या या फ्रीजचे वैशिष्ट्य म्हणजे ते चालतात सौरऊजेर्वर. सध्या पॅरिसमध्ये युनायटेड नेशन्ससाठी काम करणारे डॉ. राजेंद शेंडे मूळचे आहेत सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या रहिमतपूरचे. त्यांच्या या फ्रीजमुळे वीजपुरवठा नसणाऱ्या ग्रामीण भागात औषधे टिकवणे सोपे झाले आहे. जगभर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे आणि येत्या काही महिन्यांत हे फ्रीज बाजारातही येतील!


डॉ. शेंडे यांनी तयार केलेले 'सोलर चिलर फ्रीज' बुधवारी राष्ट्रपतीभवनात समारंभपूर्वक बसवण्यात आले. तेव्हा स्वत: शास्त्रज्ञ असणाऱ्या राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी शेंडे यांच्या या तंत्रज्ञानाचे तोंड भरून कौतुक केले.


युनायटेड नेशन्सच्या 'ओझोन ऍक्शन' प्रकल्पाचे प्रमुख म्हणून डॉ. शेंडे सध्या पॅरिसमध्ये काम करतात. सध्याच्या विजेवर चालणाऱ्या फ्रीजमधील क्लोरो-फ्लुरो कार्बनमुळे वातावरणातील ओझोनचा थर पातळ होत चालला आहे. त्यामुळे क्लोरो-फ्लुरो कार्बन नसणारा फ्रीज तयार करण्याचे आव्हान शेंडे यांनी स्वीकारले. त्यानुसार सूर्यप्रकाश वापरून फ्रीजमध्ये थंडावा आणण्याचे तंत्र शोधून काढले.


या अनोख्या पर्यावरणप्रेमी फ्रीजमध्ये तापमान दोन ते आठ अंश इतके कमी राखता येते. यात हायड्रोकार्बन आणि सायक्लोपेंटेनच्या साह्याने इन्शुलेशन फोम तयार केला जातो. या फोमच्या मदतीने वीज न वापरता केवळ सूर्याकडून मिळणाऱ्या ऊजेर्वर थंडावा टिकवता येतो. सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी पाच दिवस हा थंडावा टिकून राहू शकतो. हा फ्रीज सामान्य माणसांना परवडू शकेल; असेही डॉ. शेंडे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या फ्रीजमध्ये किमान ५० हजार लशी सुरक्षित ठेवता येतील आणि हा फ्रीज सहज कुठेही घेऊन जाता येईल!


सूर्यप्रकाशावर फ्रीज चालवण्याची कल्पना राष्ट्रपतींना भलतीच आवडली. त्यामुळे त्यांनी एकदम दोन फ्रीज घेतले. राष्ट्रपतींनी याआधीच पुढाकार घेऊन राष्ट्रपती भवनात सौरऊजेर्वरचे दिवे बसवले आहेत. 'तुमच्या या शोधाचा वापर जगात सर्वत्र लवकरात लवकर व्हावा,' अशा शब्दांत राष्ट्रपतींनी डॉ. शेंडेंना शुभेच्छा दिल्या.


हे तंत्रज्ञान सध्या संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण मोहीम, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना (हू), डॅनिश टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, ग्रीनपीस, जीटीझेड प्रोक्लिमा आणि प्रोग्राम्स फॉर ऍप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीज इन हेल्थ आदी संस्थांनी स्वीकारले आहे. अनेक विकसनशील देशांनीही हे फ्रीज वापरायला सुरुवात केली आहे! या फ्रीजच्या ग्राहकांमध्ये आता भारताचे राष्ट्रपती भवनही सामील झाले आहे!