पत्रमैत्रिण(१)

आम्ही कॉलेजात असताना पत्रमैत्रीचं 'फ्याड' सगळ्या मित्रमैत्रिणीत बरंच बोकाळलं होतं.तेव्हा महाजालाचं मायाजाल इतकं पसरलं नव्हतं,माहितीचा आजच्यासारखा विस्फोट झाला नव्हता,तेव्हा इतर देशातली आपल्या एवढीच मुलंमुली राहतात कशी?त्यांची शाळा,कॉलेजं कशी असतात? त्यांच्या परीक्षा कशा असतात? अशा आणि इतरही अनेक गोष्टींचे कुतुहल असायचं.
"तिथे ना 'earn and learn' असतं आणि १८ पूर्ण झाली ना की सरळ घराच्या बाहेर पडतात आणि एकटं राहतात‌. सर्रास बिअर पितात आणि सिगरेटी ओढतात, मुली सुद्धा!! "आमच्या कळपातला एखादा मित्र/मैत्रिण स्वतः तिथे जाऊन आल्याच्या थाटात आपल्या पाश्चात्य पत्रमित्राच्या पत्रातली माहिती पुरवायचा आणि 'सुरस आणि चमत्कारिक' कथा ऐकल्यासारखे इतर सगळे ऐकायचे. आईबाबांच्या सुरक्षित छत्राखाली असल्या गोष्टी म्हणजे काहीतरी साहस आहे असेच वाटायचे ते दिवस होते.


असल्या कथा आता जवळजवळ सगळेच एकमेकांना ऐकवू लागले.कोणाचे किती देशांमधले पत्रमित्र आहेत? अशा चर्चा होऊ लागल्या. म्हणे युरोपात असं असतं आणि चीन मध्ये तसं असतं.. छे छे.. हे फारच व्हायला लागलं! अजून आपल्याला एकही पत्रमित्र किवा मैत्रिण नाही म्हणजे काय?मी पण मग तो फिनलंडवाला सुप्रसिद्ध पत्रमैत्रीचा अर्ज भरला आणि एकदाचे पत्रमित्र मिळवले.
आईबाबांनी दिलेला 'पॉकेटमनी' (म्हणजे हातखर्चाला पैसे हो! ते तरी कशाला लागत होते? कधीतरी कळपाने जाऊन वडापाव नाहीतर मसाला डोसा किवा पावभाजी  खायची म्हणजे अगदी शिकस्त!पण म्हणायचे पॉकेटमनी!)तर हा पॉकेटमनी आता 'हवाई टपाल सेवेवर' खर्च होऊ लागला. त्या निळ्या पत्रांवर कोरून अक्षर काढून पत्र पाठवणे सुरू झाले.खाडाखोड टाळायला आधी साध्या कागदावर पत्र लिहून मग ते त्या एरोग्रामवर नकलण्याचे उद्योग झाले.मग पुढे पुढे ते पुरेना म्हणून छान,छान ,रंगीत 'लेटरपॅड'आणून त्यावर पत्र लिहायचे उद्योग झाले.लिहायचं काय? तर स्वतःबद्दल, घराबद्दल,शाळा,कॉलेजाबद्दल माहिती! आणि अशीच माहिती तिकडून पण यायची.( 'सांस्कृतिक देवाणघेवाण' म्हणतात ती हीच बहुदा!)पाकिटातून टिकल्या,पिना,फोटो,रुमाल अशी काहीबाही पाठवापाठवी चालायची.


माझी एक पत्रमैत्रिण माझ्याहून १२ मिनिटांनी मोठी, 'एकाच दिवशी जन्मलो' एवढाच समान धागा!बाकी कसलं म्हणजे कसलंच साम्य नाही,पण त्या एकाच नाजूक तरीही चिवट धाग्यावर आमची मैत्री फुलली.दुसरा एक मित्र भारतीय वंशाचा मॉरिशस वासी,त्याचे पूर्वज भारतीय म्हणून भारताबद्दल कुतुहल,तिसरा एक इटालियन होता आणि एक वेस्ट इंडियन,त्याच्याकडे  क्रिकेट व्यतिरिक्त इतर विषयच नसायचा आणि मी मुंबईत( ठाणे म्हणजे त्याच्या लेखी मुंबईच होती!) राहते म्हणजे माझ्या आजूबाजूच्याच गल्लीत गावसकर,वेंगसरकर राहत असतील असा त्याचा गोड गैरसमज होता!(हो,तेव्हा गावसकरचा जमाना होता,सचिन तेव्हा शारदाश्रम शाळेत शिकत होता..)आणि मी तेव्हा नुकतेच जर्मन शिकत होते म्हणून अर्जात 'अवगत भाषा' मध्ये झोकात जर्मन लिहिले होते म्हणून एक जर्मन मैत्रिण मिळाली.बाकीचे सारे म्हणजे 'नेटवर्क वाढवूया चला..' प्रकारातले!


"तुमच्या देशात,आमच्या देशात.." वाली पत्र लिहून किती लिहिणार?कॉलेजची महत्त्वाची वर्ष,परीक्षा,अभ्यास यात हळूहळू पत्रगळतीला सुरुवात झाली. सुरुवातीचे तावचे ताव पत्र लिहून,पोस्टात टाकल्या क्षणापासून आसुसून वाट पाहणे कमी झाले,आलेल्या पत्राला'सबमिशन' बाजूला ठेवून उत्तर लिहिणे कमी झाले,लिहूया नंतर,पाठवू उत्तर पुढच्या आठवड्यात... असं (दोन्ही बाजूनी)सुरू झालं.इटली,मॉरिशस आणि वेस्ट इंडिज हून पत्र येणं आणि साहजिकच पाठवणं दुर्मिळ झालं पण फ्रान्सिस,स्टेफी आणि मी; आमची तिघींची पत्रापत्री मात्र अजून चालू होती.


 


(क्रमशः)