'क्रांतिरत्न' आणि अन्य जवाहिर

दिनांक १६ नोव्हेंबर १९१५, हुतात्मा 'क्रांतिरत्न' विष्णू गणेश पिंगळे आणि त्यांच्या 'गदर' उत्थानातील हौतात्म्य पत्करणाऱ्या सहा सह क्रांतिकारकांचा हौतात्म्यदिन. एकाच वेळी एकाच अभियोगात फाशीची शिक्षा होवून एकाच दिवशी सात क्रांतिकारकांनी फासावर जाण्याचा हा एकमेव प्रसंग! याच अभियोगात एकूण २४ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती मात्र फेरनिर्णयानंतर १७ जणांना फाशी कमी करून जन्मठेपेला पाठविले गेले.


हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म तळेगाव येथे एका सामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच ते महाराष्ट्र विद्यालय या भोपटकर बंधूंनी चालविलेल्या शाळेत दाखल झाले. ही शाळा प्रखर राष्ट्रीय विचारसरणीसाठी प्रसिद्ध होती. पिंगळे गरिबीमुळे स्वतः:च स्वयंपाक करून व वसतिगृहात राहून शिक्षण घेत होते. पिंगळ्यांना येथेच राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाले. पुढे अर्थातच १९०८ साली सरकारने बंद पाडली. त्या सुमारास स्वा. सावरकरांनी ७ ऑक्टोबर १९०५ रोजी विदेशी कपड्यांची होळी पुण्यात सर्वप्रथम केली. अर्थातच कपडे गोळा करण्यापासून ते होळी पटवण्यापर्यंत पिंगळे यांचा सक्रिय सहभाग त्यात होता. पुढे पिंगळे अशाच विचारसरणीच्या समर्थ विद्यालयात दाखल झाले, मात्र १९१० साली ती देखिल सरकारी कृपेने बंद पडली. पिंगळे मग माहीम येथील श्री. गोविंदराव पोतदार यांच्या 'पायोनियर अल्कलि वर्क्स' मध्ये नोकरीस लागले. श्री. पोतदार यांनी बॊंब बनवण्याची कृती असलेली एक ४५ पानी पुस्तिकाही बनविली होती, जी त्यांनी सेनापती बापट यांना पाठवली. इथे पिंगळे यांनीही बॊंब बनविण्याच्या कृतीचा अभ्यास केला.


पिंगळे यांच्या डोक्यात एक नवे वारे आले. जपान प्रमाणे आपणही हातमागावरील कापडाचा व्यवसाय सुरू केल्यास देशहित साधेल या ध्येयाने त्यांनी लातूर जवळील अवशा येथे हातमागाचा व्यवसाय सुरू केला. मात्र इथेच त्यांच्या 'मेकॅनिकल इंजिनियर' व्हायच्या महत्त्वाकांक्षेने उसळी खाल्ली. या काळात पिंगळे यांनी अमेरिका, अमेरिकेचा स्वातंत्र्याचा इतिहास याचे वाचन केले. ते 'यंग अमेरिकन' हे मासिक नियमितपणे वाचत. पिंगळे यांनी अमेरिकेत जाऊन आपले यांत्रिक शाखेतील अभियांत्रिकी शिक्षण (मेकॅनिकल इंजिनियरिंग) घेण्याचे ठरवले. घरून काही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता सुतराम नव्हती. काबाड कष्टाने पै पै जमवून, सर्व सुखाचा त्याग करून तसेच अनेक धनवान व दानशूर व्यक्तीकडून मिळालेल्या साहाय्यातून त्यांनी पैशाची जमवाजमव केली. त्यांना वकील काका पाटलांसारख्यांनी अर्थसाहाय्य दिले तसेच बहुधा 'हिंद एज्युकेशन' फंडातूनही साहाय्य दिले घेले असे म्हटले जात असे. पिंगळे यांनी जमवलेल्या १२०० रुपयांच्या पुंजीसह अमेरिकेस जाण्याचा निश्चय केला.


परदेशी जाण्यापूर्वी ते आपले माता-पिता, बंधू केशवराव व कुटुंबीयास अखेरचे भेटण्यासाठी घरी तळेगाव येथे गेले, मात्र घरी त्यांनी काहीच सांगितले नाही. निघताना वाटेत त्यांनी आपले बंधू केशवराव यांना कल्पना दिली. त्यांना हा मोठाच धक्का होता. पिंगळे तुतीकोरीन मार्गे हॊंग कॊंगला गेले व पुढे तोसा मारू या जपानी नौकेने अमेरिकेत सिऍटल येथे दाखल झाले. इथे ते राष्ट्रवादी वृत्तीचे युवक म्हणून ओळखले जात असले तरी 'अनिष्ट युवक' म्हणून ते सरकारच्या डोळ्यात आले नसल्याने त्यांना लपाछपी न करता उघड रित्या सर्व सोपस्कार पार पाडून जाता आले. अमेरिकेत जाताच सिऍटल येथे प्रथम पात्रता परीक्षा उत्तीर्ण होउन मग ते महाविद्यालयात प्रवेशीत झाले. १९११ व १९१२ च्या सर्व सहामाही परीक्षा ते उत्तीर्ण झाले.


अमेरिकेत शिक्षण घेत असतानाच ते आधुनिक विचारसरणीचे बनले. मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत तर होतीच. इकडे हिंदुस्थानातील हकिकतींचा कानोसा ते घेत होते. त्यांची गाठ लाला हरदयाळ यांच्याशी पडली. पिंगळे आता शिक्षणापेक्षा राष्ट्रकार्याच्या मागे लागले. त्यांची भेट याच काळात डॉ. खानखोजे यांच्याशी झाली. त्यांनी मेक्सिको व अमेरिका येथे असलेल्या हिंदी तरुणांच्या मनात क्रांतिज्योत जागवण्याचे कार्य हाती घेण्याची योजना मांडली. डॉ. खानखोजे हे मेक्सिकोला जाऊन आलेले होते व त्यांना ही योजना मोलाची वाटली.


१ नोव्हेंबर १९१३ रोजी सरदार सोहनसिंग भकना यांच्या अध्यक्षतेखाली 'इंडियन इंडिपेंडन्स लीग' च्या जागी 'गदर' संघटनेची स्थापना झाली. तिच्यात १४ सदस्य होते. 'गदर' हे नाव भाई परमानंद यांनी सुचविले. गदर उत्थानाने जोर धरला. स्फोटकांचा शोध व निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले, ज्यात हरनामसिंग यांनी आपला एक हात गमावला. सैन्य व शस्त्रे यांची जमवाजमव करण्याच्या योजना सुरू झाल्या. सरदार कर्तारसिंग सराबा यांना विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जर्मनीला पाठविण्यात आले. हॊंग काँग येथे तोफखान्यात नोकरी केल्याचा अनुभव असलेल्या उधमसिंग यांनी संतोकसिंग व ज्वालासिंग यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह शेतावरच प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पिंगळे यांनी पॅसिफीक किनाऱ्यावरील हिंदी मजुरांच्या वस्त्यांचे दौरे सुरू केले, हिंदी नवागताविरुद्ध अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांचा कडक निषेध केला.


'गदर' चे प्रचार व प्रहार हे दोन भाग कार्यरत झाले. सेना, सैन्यनिर्मिती, शस्त्रास्त्रे या बरोबरच जागृतीचे काम सुरू झाले. गदर वृत्तपत्राच्या हिंदी, बंगाली, मराठी व उर्दू आवृत्त्या निघू लागल्या.११ ऑगस्ट १९१४ च्या गदर आवृत्तीत प्रकटन केले गेले: पाहिजेत! हिंदुस्थानात बंड पसरवण६यासाठी निर्भय, धैर्यसंपन्न सैनिक पाहिजेत! वेतन - मृत्यू. पारितोषिक - हौतात्म्य आणि स्वातंत्र्य. स्थळ - हिंदुस्थानचे रणक्षेत्र. १९१४ मध्ये हुतात्मा पिंगळे हिंदुथानात प्रत्यक्ष उत्थानासाठी येण्यास निघाले. २० नोव्हेंबर रोजी ते एस.एम. सलामीस या बोटीने कलकत्त्यात उतरले व बंगाली क्रांतिकारकांशी त्यांनी संधान साधले. इथे येताच त्यांची गाठ पडली ती राशबिहारी बोस यांच्याशी. कोमा गाटा मारु व तोसा मारु या जहाजातून येणाऱ्या हिंदी मजुरांबरोबर शस्त्रास्त्रे आधीच रवाना झाली होती. इथे क्रांतीचा वणवा पेटवून दुसरे स्वातंत्र्यसमर घडवण्याची गदर ची योजना होती.


अर्थातच या सर्व घटनांचा सरकारला सुगावा होताच. पिंगळे यांच्यावर २०,००० रु. चे इनाम घोषित झाले. पिंगळे यांना मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, पंजाबी व बंगाली या भाषा उत्तम बोलता येत असत त्यामुळे ते अनेकदा अनेक ठिकाणी पंजाबी वा बंगाली नाव व पेहराव धारण करून वावरले. १९१४ च्या सुमारास पहिले महायुद्ध भडकले व बरेचसे इंग्रजी सैन्य युरोपच्या आघाडीवर गुंतले. इथले सैन्य जे बाहेर गेले त्याचा अचूक तपशील या क्रांतिकारकाने मिळवला होता - सर्वोत्तम सैनिकांच्या ९ डिव्हिजन्स, धोडदळाच्या २ १/२ डिव्हिजन्स व नव्या प्रतीच्या उत्तम ३६२ तोफा बाहेर पाठवल्या गेल्या होत्या व बदली सैन्य हे सुमार दर्जाचे होते आणि त्यांची हत्यारेही जुनाट होती.


उत्तरेतील पलटणींमध्ये उठाव घडवून २१ फेब्रुवारी १९१५ रोजी सार्वत्रिक हला करण्याची धाडसी योजना निश्चित झाली. जीवाचा धोका पत्करून पिंगळे १८ बॉम्ब घेऊन मीरतला गेले. मात्र एका हेराच्या फितुरीने काही काळातच अनेक दिवस सरकारला हुलकवणी देणारे पिंगळे सरकारच्या हाती सापडले. या अभियोगात व अटकेत ओडवायर सक्रिय होता. अनेक क्रांतिकारकांना अटक झाली तर अनेक जण चकमकीत हुतात्मे झाले. अखेर अभियोगात पिंगळे यांनी आपण सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे व देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्याचा निश्चय केल्याचे ठणकावून सांगितले. हे जिवंत दारुगोळे इंग्रजांना हादरवत होते. या अभियोगात २४ जणांना एकरकमी फाशी जाहीर झाली. मात्र फेरविचारा नंतर ७ जणांना फाशी तर १७ जणांना जन्मठेप दिली गेली.


 दि. १६ नोव्हेंबर रोजी ७ हुतात्मे मोठ्या धैर्याने व अभिमानाने फासावर गेले : १) हुतात्मा 'क्रांतिरत्न' विष्णू गणेश पिंगळे २) हुतात्मा सरदार बक्षिससिंग ३) हुतात्मा सरदार जगतसिंग ४) हुतात्मा सुरायनसिंग भुरसिंग ५) हुतात्मा सुरायनसिंग इश्वरसिंग ६) हुतात्मा सरदार हरनामसिंग व ७) हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा.


 हुतात्मा 'क्रांतिरत्न' विष्णू गणेश पिंगळे


pingle


 हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा.

saraba

जन्मठेपेस गेलेले १७ क्रांतिकारकानपैकी १५ जण : १) सरदार बलवंतसिंग २) सरदार हरनामसिंग 'तुंडा' ३) हिरदाराम ४) जगतराम ५) सरदार केसरसिंग ६) सरदार खुशालसिंग ७) सरदार निघनसिंग ८) भाई परमानंद ९) परमानंद (२) १०) सरदार पृथ्विसिंग ११) रामशरणदास १२) सरदार रुल्लियासिंत्ग १३) सरदार सावनसिंग १४) सरदार सोहनसिंग भकना १५) सरदार वसावासिंग.

सरदार सोहनसिंग भकना

 bhakhna


सरदार ज्वालासिंग


jwalasingh


भाई परमानंद


parmanand


सरदार पृथ्विसिंग


pruthvisingh


स्वा. सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन घरादारावर निखारे ठेवून आपल्या देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या या महान क्रांतिकारकांना सादर प्रणाम!


(हा लेख दि. १६ नोव्हेंबर रोजी म्हणजे या ७ हुतात्म्यांच्या हौतात्म्यदिनी लिहायची खूप इच्छा होती पण मनात असूनही लिहू शकलो नाही याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे, क्षमस्व