होम्स कथाः अंतिम लढत-६

यापूर्वी:
होम्स कथाः अंतिम लढत-१
होम्स कथाः अंतिम लढत-२
होम्स कथाः अंतिम लढत-३
होम्स कथाः अंतिम लढत-४
होम्स कथाः अंतिम लढत-५
मला माहिती नव्हतं की माझ्या प्रिय मित्राचं, होम्सचं हे शेवटचं दर्शन होतं.. 


खाली उतरताना मी परत वळून पाहिलं. वाट वेडीवाकडी असल्याने मला धबधबा दिसणं तर शक्यच नव्हतं पण त्या वाटेवर दूर मला एक माणूस घाईघाईने वाट उतरताना दिसला. पुढे माझ्या परतण्याच्या घाईत मी ही घटना विसरुन गेलो. मिरींगनला हॉटेलावर परत आलो तर मालक बाहेर उभा होता.
मी घाईत विचारलं, 'आता ती कशी आहे? मला उशीर झाला का?'
त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या काळजात एकदम धस्स झालं.


मी पत्र दाखवलं. 'म्हणजे हे पत्र तुम्ही नाही लिहिलं? इथे कोणी आजारी इंग्लिश बाई नाही??'
'नाही! पण हा तर हॉटेलाचा कागद आहे. हे त्या उंच माणसाने लिहिलं अ...'
पण मी पुढचं ऐकायला थांबलोच नाही. मी परतीच्या वाटेला ताबडतोब निघालोच. तरी मला राइनबाख ला पोहचायला तीन तास लागले.


राइनबाख चढून मी परत त्या जागी गेलो. पण होम्सचा पत्ता नव्हता आणि त्या स्विस तरुणाचा पण. होम्सची एक वस्तू मात्र तिथे होती. म्हणजे होम्स गेला नव्हता.. तिथेच त्याच्या शत्रूने त्याला गाठला होता. मी होम्सच्या तपासाच्या पद्धतीने डोकं शांत ठेवून काही धागा दिसतो का शोधायला लागलो. अचानक काहीतरी चकाकणाऱ्या वस्तूवर माझी नजर गेली. ती होम्सची सिगारेटची डबी होती. मी ती उचलली तर एक कागदाची घडी खाली पडली. मी ती उलगडली. ती होम्सच्या वहीतून फाडलेल्या तीन कागदांची चिठ्ठी होती आणी माझ्याच नावे होती. अक्षर तेच माझ्या मित्राचं ओळखीचं अक्षर होतं. स्थिर आणि आपल्याच खोलीत बसून शांतपणे लिहिल्यासारखं. पत्रात लिहिलं होतं:


'प्रिय वॅटसन,
मी हे पत्र मॉरीयार्टीच्या परवानगीने लिहितो आहे. आमच्यातल्या संघर्षाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तो माझी वाट पाहतो आहे. त्याने मला त्याच्या युक्त्या आणि पोलिसांना दिलेल्या चकव्यांबद्दल बरंच काही सांगितलं आहे आणि माझा त्याच्या बुद्धिमत्तेबद्दलचा आदर वाढला आहे. समाजातून मॉरीयार्टीसारख्या माणसाला हद्दपार करणं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, पण अर्थातच त्यासाठी जो मार्ग मला अवलंबावा लागणार आहे तो माझ्या प्रिय माणसांना, खास करुन तुझ्या सारख्या जिवलग मित्राला बराच दु:खद ठरणार आहे. मी तुला सांगितलंच होतं की ही माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी असेल आणि आता माझ्याजवळ दुसरा काही पर्यायच नाही. खरं सांगायचं तर मला तो निरोप घेऊन आलेला माणूस आणि त्याचा निरोप बनावट आहे हे माहीत होतं. पण एकदाची या प्रकरणाला काहीतरी निर्णायक दिशा मिळावी म्हणून मी तुला जाऊ दिलं. इन्स्पेक्टर पीयरसनला सांग की त्याला हवी असलेली कागदपत्रे एम तिजोरीत 'मॉरीयार्टी' असं लिहिलेल्या एका लिफाफ्यात आहेत. मी माझ्या इस्टेटीची वासलात इथे येण्या आधीच लावून आलो आहे आणि ती आता माझा भाऊ मायक्रॉफ्टच्या मालकीची असेल.वॅटसन, माझ्या प्रिय मित्रा, सौ. वॅटसनला माझे नमस्कार सांग.
-तुझाच,
शेरलॉक होम्स.'


त्या पत्राने मला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. तज्ज्ञांच्या तपासणीनुसार, होम्स आणी मॉरीयार्टीमधला संघर्ष त्या दोघांनी एकमेकांच्या मिठीत एकत्र दरीत उडी घेण्यात संपला असावा..तो स्विस माणूस परत सापडला नाही आणि तो मॉरीयार्टीचाच माणूस असावा यात शंका नाही. मॉरीयार्टीची सर्व टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली. आणि अत्यंत जड अंत:करणाने मला त्याच्या कामगिऱ्यांचा हा अखेरचा वृत्तांत लिहावा लागतो आहे. यात मात्र शंका नाही की होम्स इतका श्रेष्ठ आणि बुद्धिमान माणूस मी आजतागायत पाहिला नाही.
- वॅटसन.


(समाप्त.)
डॉयलने लिहिलेली/लिहायचं ठरवलेली ही शेवटची होम्स कथा. पण लोकाग्रहास्तव त्याला काही वर्षांनी होम्सला परत आणावे लागले. आणि यापुढे काही वर्षांनी परत होम्स कथा सुरु झाल्या. पण होम्सच्या परतीचा वृत्तांत परत कधीतरी..