सावधान! घर झपाटलेले आहे.....

(खालील लिखाण एक अनुभव मनोगतींशी वाटावा म्हणून केले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा माझा कोणताही मानस नाही. वाचावे आणि विसरून जावे.)


"काहीच्या काही...." समीर जवळ जवळ ओरडलाच. 


"अरे खोटं कशाला बोलू मी." मनीष त्याला पटवून देत होता.             


"अरे आम्हाला काय झुमरीतलैयाहुन आलेले समजतोस काय?" समीर   


"तुझा विश्वास नाही म्हणजे गोष्टी खोट्या असतात का?" मनीष.


मनीष हा आमचा मित्र. इंग्लंड मधल्या शेफिल्ड विद्यापीठात व्यवस्थापनशास्त्रात पदवी घेण्यासाठी इथे आला आहे. दिवाळीचे ४ दिवस एकत्र घालवावेत म्हणून लेस्टरला आमच्याकडे राहायला आला होता. रात्रीच्या जेवणानंतर अचानक दोघांचे चढलेले आवाज मला ऐकू आले.


"काय झाले? एवढे तावातावाने भांडत का आहात?" मी.  


"ए प्लीज आता हिला सांगू नकोस बाबा. आधीच ही घाबरट..मग मला रात्री १० १० वेळा उठवून खिडक्या बंद आहेत का बघायला सांगते." समीर मनिषला सांगत होता.


एव्हाने मला कळून चुकले की काही तरी भयंकर आपल्याला आवड असणारे चालू आहे. मग काय मी सोडते का! सगळे वदवून घेतलेच त्या दोघांकडून...


काय तर म्हणे मनिष शेफिल्ड मध्ये जिथे राहतो ते घर झपाटलेले आहे. त्यांच्या घरमालकाने त्यांना आधीच सांगितले होते. चित्र विचित्र घटना तेथे सारख्या घडत असतात.तो पुढे सांगत होता...


"अगं रात्री बेरात्री संडासातला फ्लश अचानक सुरू होतो. आणि स्वयंपाक घरातला नळ सुद्धा!"


"अरे लेका वॉशर गेलाय तुमच्या नळाचा" समीरने त्याला वेड्यात काढलेच.


"अरे तपासले २-३दा. बदलून सुद्धा पाहिला. तरी हे प्रकार काही थांबत नाहीत. एकदा रविवारी  रात्री सगळे मित्र पब मध्ये पार्टीला गेले होते. माझी दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट सुपूर्तता( सबमिशन) होती म्हणून मी घरीच होतो. रात्री सगळे लिखाण पूर्ण करून १ ला वगैरे झोपलो असेन तर आपला फ्लशचा आवाज येतोय २-३ दा.. मला वाटले मित्र आले की काय लवकर .म्हणून मी आपला शांतपणे झोपुन गेलो. आणि सकाळी ७ ला उठुन आवरतोय तर एक एक जण येताना दिसला. म्हणजे त्यांची पार्टी रात्र भर चालू होती तर मग घरात कोण होते माझ्याबरोबर?"


"अगं, तू घाबरू नकोस बाई, असे काही नसते. अग ही संट्टी पोरं पोरं एकत्र राहतात ना.. त्यांच्या अशा मजा चालू असतात. आम्ही सुद्धा असे करायचो.त्यातल्याच एकाने ह्याला घाबरवण्यासाठी असे केले असेल" समीर आपला बुद्धिवाद  सोडायला तयार नसतोच असा सहजासहजी.


"अरे मग तुम्हाला माहीत आहे तर सोडत का नाही तुम्ही ते घर?" माझा प्रश्न.


"अगं, झपाटलेले घर असल्यामुळे भाडं एकदम कमी आहे. विद्यापीठाच्या एवढ्या जवळ एवढ्या कमी भाड्यात घर मिळत असेल तर आम्ही तयार आहोत ना भुताबरोबर राहायला. आणि तसे ही घर मालक सांगतो घर १५० वर्षे जुने आहे. आधीचे गरजू भाडेकरू पण असेच राहिले आहेत. कोणाच्या जीवाला काही इजा झाली नाहीये. मग काय हरकत आहे? आणि तशी ही मुलांना जरा कमीच भिती वाटते. परत आम्ही असतो कुठे दिवसभर ? प्रत्येक जण नोकरीनिमित्त किंवा अभ्यासानिमित्त बाहेरच असतो. रात्री अंग टाकायला जागा मिळते हेच खूप."परदेशात शिकणाऱ्या एका सर्वसामान्य बॅचलरचा (मराठी शब्द?) युक्तिवाद खरे तर मला पटला.तरी पण झपाटलेल्या घरात "त्यांच्या" सोबतीने राहायचे म्हणजे...जरा फारच होते.


तसा माझाही भुतावर जरा फारच विश्वास आहे. देव आहे असे मी मानते म्हणून भूत आहे असे सहजपणे मान्य करू शकते. तेथे बुद्धीला जोर देऊन तर्क सुसंगत विचार करणे वगैरे मला काही जमत नाही.


मागे एकदा बीबीसीवर "माध्यम" किंवा "मीडियम" ह्या विषयावर एक सुरेख माहितीपट दाखवण्यात आला होता. त्यात माणसात आणी मेलेल्या आत्म्यांमध्ये कसा संवाद साधतात ते दाखवले होते. बीबीसी ही काही अशी वाहिनी नाही की पूर्ण अभ्यास न करता काहीही बकत सुटेल. थोडे का होईना त्यांच्या माहितीपटात तथ्य असतेच. तेव्हापासून तर माझा इंग्लंड मध्ये भुते असतातच ह्यावर दृढ विश्वास आहे. खरे तर आम्ही त्या माहितीपटात दाखवले होते त्या प्रकारचे गिरीजाघर ("स्पिरीच्युयल  चर्च"हे इतर चर्च पेक्षा बऱ्याच प्रमाणात वेगळे असते) शोधून काढले होते. तेथे जाण्याची फार इच्छा होती पण "आपल्या घरातले जे मृत आत्मे येतील त्यांना इथल्या माध्यमांचे इंग्रजी उच्चार कळणार नाहीत आणि त्यांचे मराठी ह्यांना कळणार नाही " असा समीरचा युक्तिवाद आणि एकटीने जाण्याइतकी हिंमत गोळा करू न शकल्याने ते राहूनच गेले आहे अजून.


तसेच इथल्या "झपाटलेली जमिनीखालची (अंडरग्राउंड) रेल्वेस्टेशने" ह्यावर पण बरेच ऐकण्यात आले आहे. त्यामुळे मनिष सांगतो ते खरे असण्याची शक्यता काही कमी नाही. अर्थात  समीर म्हणतो त्या प्रमाणे ते खोटे ही असू शकते.पण भुतावर विश्वास नसणाऱ्या माणसांना ते खरे थोडेच वाटणार आहे?


बरेच दिवस झाले मनिष आम्हाला त्याच्या घरी बोलवत आहे. नाताळच्या सुट्टीत २ दिवस तरी या असा त्याचा सारखा आग्रह चालू आहे. मी अर्थातच अजून काही पक्के केले नाही. तोपर्यंत मानसिक बळ गोळा झाले तर "असाही" एक अनुभव घ्यायला जाईनही कदाचित......