माझी कविता- एक रसग्रहण

माझी कविता- एक रसग्रहण



ईमेलने एक कविता मला एक दोनदा मिळाली. अगदी सामान्य अशी कविता.  त्यात आवडण्यासारखे  काय आहे? आणि न कळण्यासारखे तर काहीच नाही असे माझे पक्के मत झाले. ह्या कवितेचा कवी कोण ह्याचा उल्लेखही नव्हता. ह्यात काय विशेष?
अशी ही कविता ईमेलने एवढी फिरते का बरे? मनोगतावर वाहणारे रसग्रहणाचे वारे सध्या जोरात आहेत. तेव्हा रसग्रहण करावे ह्या हेतूने  मी पुन्हा त्याच ओळी वाचल्या. अहो मला अगदी भरभरून आले.

हासत येते, नाचत येते
विचारांचा हात धरूनी
कविता माझ्या मनात येते


पेटली रे पेटली; काय पेटली असे काय विचारता? ट्यूब पेटली. एकदाची!
ह्या कवितेमुळे दिवसे न दिवस कविता वरून एवढ्या सोप्या वाटतात पण किती गूढ होत आहेत त्याची पुन्हा एकदा प्रचीती आली. खूप ताण देऊन शेवटी ह्या कवितेचा अर्थ लागला. पहा बरे आपल्याला तो कसा वाटतो!

              कविता ही छोटी मुलगी. ती हासत, नाचत आपले चिमुकले हात पसरून येते आणि आपल्या वडिलांच्या कुशीत शिरते. खर आईच्या कुशीत तिने शिरणे अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे पण आता समानतेचा जमाना आहे. आई आपले ऑफिस संपवून अजून घरी आली नाही. आपल्या बाळाची काळजी आज बाबा घेत आहेत. आई घरी नसताना ह्या मुलीचे हट्ट  कसे पुरवायचे ह्या विचारात ते मग्न आहेत आणि बाबाचा कसा मामा बनवायचा ह्या विचारात लाडकी पिलू 'कविता'. म्हणून विचारमग्न कविता! विचारांचा हात धरून येणारी.

बायको ऑफिसात आहे असे पाहून पतीराजांना कविता नामक त्यांची मैत्रीण भेटायला आली की काय असा खोडसाळ विचार मनात डोकावला. आता बायकोला काय कारणे द्यायची ह्याचा पतीराज विचार करत आहेत असे सुद्धा वाटले. पण प्रयत्नांनी त्या वाईट्ट विचारांना मनातून हाकलून लावण्याचे ठरवले आहे.


आपण कविता कशी लिहितो याचे वर्णन कवी ह्या कडव्यात करतो आहे . हा तर खूप सरळ अर्थ आहे त्यावर काय लिहायचे?

सजून येते, नटून येते
कल्पनांचा साज लेवूनी
कविता माझी फुलून येते

ही कविता नवकवितेचे प्रतीक आहे. कारण काय असे विचारता? जरा थांबा. पुढे वाचा तर खर.
              अशी छोटी बाळ कविता आपल्या बाबांच्या कडेवर बसून घरात येते.  आता हे घर कुढून आले असे म्हणू नका बुवा. पहिल्या कडव्यात कवीने घराला पहा काय संबोधले आहे?सांगा पाहू..
  घराला घर म्हणण्याचे पद्धत आता जुनी झाली आहे. अगदी घरात असलेल्या कानाकोपऱ्याप्रमाणे मनाचे अनेक कोपरे असतात. त्यात असतात हव्याशा नकोश्या वस्तूंप्रमाणे कडू गोड स्मृतीच्या हळूवार पाकळ्या!

आता ही कविता विविध बालहट्ट सुरू ठेवते. तिच्या त्या बाललीलांचे बाबा मोठ्या मनाने कौतुक करत आहेत. नटलेली, सजलेली अशी त्यांची कविता किती खूष झाली आहे. फुलून आली आहे. ह्या नाजुक ,हळव्या स्मृती बाबा आपल्या कॅमेऱॅत बंद करत आहेत. शिवाय आईला दाखवायला पुरावे म्हणून त्याचा उपयोग आहे तो वेगळाच. अशा नटलेल्या फुललेल्या कवितेच्या फोटोंनी घर आणि अल्बम कसे फुलले आहेत.

      मैत्रीण 'कविता' सजून पतीराजांना भेटायला आली . कल्पनेचेच दागिने घालून ती आली. पण ती त्यांच्या कल्पनेहूनही खूप देखणी दिसत होती. त्यामुळे पत्नी 'कल्पना' रागवणार की काय असे पतीराजांना वाटले. पण हे असे उथळ विचार करायला मनोगतावर बंदी आहे.

तूर्तास, एखाद्या दागिन्यांच्या जाहीरातीत असणाऱ्या अलंकृत युवतीचे वर्णनही हे कडवे करते आहे असे विचार मनात ठेवला आहे.


कल्पनांनी कविता समृद्ध होते ;पण असा सोपा अर्थ ह्या कडव्यात असेल तर कविता अगदीच सुमार आहे असे वाटून गेले. हे काय चार पाच वर्षाची लहान मुलगीही सांगेल.

भरून येते ,टपटप येते
नैराश्याचे मेघ दाटता
कविता माझी रुसून येते


चिमण्या कवितेने घरभर केलेला पसारा बघून बाबा अखेर चिडले. त्यामुळे कवितेच्या छोट्या निरागस अन टपोऱ्या डोळ्यात अश्रूंचे मोती जमा झाले आणि ते टपटप खाली पडू लागले. 'बाबा आपले ऐकत नाहीत' या विचाराने ती लाडकी बाला खट्टू झाली आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. आपल्या बाबांची त्यांनी आपली समजून काढावी म्हणून वाट पाहू लागली. अगदी नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्याचे म्हणणे तरी काय असे काहीसे एक गाणे आहे ना त्या गाण्याची आवर्जून आठवण झाली.


मैत्रीण कविता सजून घरी आली खरी पण तेवढ्यात कल्पनेचा फोन आला की ती पाच मिनीटात घरी येते आहे. त्यामुळे कविता खूप नाराज आहे. रुसून ती 'येते' म्हणून तणतणत निघून जाते आहे. ह्या विचाराला मी धपकन खाली पाडले.


कवितातून कवी आपल्या निराशेला वाट करून देतो असे जर हे कडवे सुचवत असेल असे कुणी म्हणाले तर  माझ्या मेहनतीवर पाणी फिरेल. त्यामुळे हा अर्थ जरी  कवीला / कवयित्रीस अपेक्षित असेल तरी माझ्या लाडक्या वाचकांनो, ह्या जाळ्यात आपण सापडू नका.
'थिंक आऊट ऑफ द बॉक्स ' असे काहीसे जे आहे ना ते मनात कायम लक्षात असू द्या.


झरझर येते, भरभर येते
आनंदाने मी बागडता
कविता माझी खुलून येते

रात्रीचे साडेआठ वाजत आले आहेत. चिमुकल्या कवितेची आई रिक्षातून उतरून भरभर लिफ्टमधे शिरते आणि आपल्या  फ्लॅटच्या दारासमोर लिफ्टमधून बाहेर पडते. आता नीट लक्ष देऊन वाचा.


येथे कवीने वापरलेले 'झरझर आणि भरभर' हे शब्द केवळ लय यावी अथवा यमक जुळावे म्हणून वापरलेले नाहीत. हा हेतू नाहीच मुळी. हे गतीदर्शक शब्द आजच्या समस्त स्त्रीवर्गाच्या घाईगडबडीच्या आणि घडयाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्याचे प्रतीक आहेत.


पावसाच्या एका सरीने जसे उन्हाने भाजलेल्या जगाला सुखावणारे  तुषार येतात तसेच एका स्त्रीच्या येण्याने घरात चैतन्य येते हे कवीला सुचवायचे आहे. पण आज घरी येणाऱ्या स्त्रीला इतर ऑफिसशिवाय, घरकामाशिवाय अनेक कामे आहेत हयात तिळमात्रही शंका नाही.


घराच्या ओढीएवढीच आपली साडेआठचे सिरीयल चुकवायची नाही म्हणून ती कवितेची आई  भरभर येते आहे. 'तणावमुक्त' होण्याचा एक हा सोपा उपाय तिला सापडला आहे. अल्फा टिव्हीचा किंवा तत्सम चॅनेलांचा विजय असो.


तेवढ्यात एका मैत्रीणीचा तिला मोबाईलवर फोन येतो. तो ध्वनी मोबाईल 'व्हाब्रेट मोडवर आहे' म्हणून 'झरझर भरभर खरखर' असे काही आवाज करतो असे सुद्धा कवीला ठासून सांगायचे आहे.


बायको येताच मुलीला तिच्या हवाली करून बाबा 'सुटलो एकदाचे' म्हणून निश्वास टाकत आहेत; सुटलो म्हणून बागडत आहेत. त्यांच्या मनात कित्येक गोष्टी आता यानंतर करायच्या आहेत.

आता आईकडे  नवे हट्ट करता येतील या विचाराने चिमुकल्या कवितेचा आनंद काय वर्णावा? आईने चॉकलेट देताच ती तिची चर्या पहा कशी खुलून आली आहे शिवाय बाबांच्या कटकटीतून सुटल्याचा आनंद तर आहेच.


आपल्या पत्नीला टाळून मैत्रीणीला भेटण्याची नवी युक्ती एकदाची पतीराजांना सापडली आहे. त्या विचाराने मैत्रीण व पतीराज दोघेही आनंदले आहेत. 
काय करू? हे मन मेले एवढे निर्लज्ज आहे की अमूक विचार करू नकोस असे म्हटले तरी ऐकतच नाही.


कित्येक दिवस कवीला काय लिहावे ते सुचतच नव्हते. अखेर माझ्यासारख्या 'किंचित कवीला' काही सुचले.

ते विचार कवी भरभर झरझर कागदावर खरडून काढू लागला. 'युरेका युरेका' न म्हणता 'कविता कविता' म्हणू लागला. सृजनशीलता नसणाऱ्या माणसाला एकदम काही सुचले तर त्याचा अवर्णनीय आनंद हया ओळी सांगतात. जे सुचले आहे, आठवले आहे ,ते हरवू नये , विसरू नये याआधी कागदावर लिहिण्याच्या खटपटीला तो कवी लागतो.  ह्या प्रयत्नांमधली अगतीकता या शेवटच्या कडव्यात कवीने सांगितले आहे.


हुश्श ! संपले. अखेर ह्या कवितेच्या रसामृतात मी तृप्त झालो.

ह्या महान कवितेचा कवी मनोगतावर असेल तर कृपया तसे सांगा, आपली कविता निदान नावानिशी फिरेल याकरता काय करता येईल ते पाहा.  वाचकांनी ही कविता माहितीजालावरही वाचली आहे याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या कवितेचा मूळ कवी कोण ते समजले तर फारच छान.