नववर्षाचा निर्धार

अन्यायाची चीड येणे हा एक चांगला गुण आहे. दुष्कृत्यांविषयी मनात येणारा संताप अभिव्यक्तीमधून व्यक्त होणे साहजिक आहे. अनेक निरागस बालकांची निर्घृण हत्या करणाऱ्या नोइडामधील नरपिशाचाबद्दल वाटणारी घृणा, असे नरपशु आपल्याच देशात कां निपजावेत असा त्रागा यापासून ते हातात कीबोर्ड मिळाला आहे म्हणून तो मनसोक्त बडवून लेखनप्रदूषण करणाऱ्या चिल्लर लेखकूंविरुद्ध तक्रार आणि  मराठी मायबोली पायदळी तुडवली जात असल्याचा कांगावा इथपर्यंत अनेक प्रकारची गाऱ्हाणी वाचनात येतात.


त्यावर मनात असा विचार आला की अशाने काय होणार आहे? लिहिणाऱ्यांना झालेला मनस्ताप त्यात व्यक्त झालाच आहे. संवेदनशील वाचकांनाही कदाचित तो होईल. त्याविषयी माझी तक्रार नाही. नाही तर ब्रम्हज्ञान सांगत मी सुद्धा तक्रारच करतो आहे अशी तक्रार आणखी कोणी करायचा. मला त्यावर असे विचारायचे आहे की झाले ते वाईट झाले, आता पुढे काय?


मला असे वाटते की अन्यायाचे वा दुष्कृत्याचे परिमार्जन करण्याच्या किंवा त्याची पुनरावृत्ती होणे टाळण्याच्या दृष्टीने कांही विधायक कार्य केल्यास त्यापासून कांही फायदा होईल. पण त्यासाठी 'इतर लोक' काय करीत आहेत किंवा काय करीत नाहीत याबद्दल तक्रारीचा सूर लावण्यापेक्षा आपण काय करू शकतो किंवा करावे इकडे लक्ष दिले तर कसे ? आपण अगदी धुतल्या तांदुळासारखे निष्कलंक असतो कां? आपल्या वागण्यात थोडी सुद्धा सुधारणा करायला जागा नसते कां? दुसऱ्याने आपले दोष दाखवले तर आपल्याला त्याचा राग येणे साहजिक आहे पण प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण केल्यास कांही गोष्टी आपल्याही लक्षात येतील. आपल्या हातून मोठे अक्षम्य अपराध घडत नसतील पण छोट्या चुका तर होतच असतील, त्या टाळता येतील कां? कळत नकळत आपल्या हातून दुसऱ्यावर अन्याय होत असेल तर तो थांबवावा कां?


मला असे वाटते की चुकीच्या वागण्याचा राग येणे ही पहिली पायरी आहे, तो व्यक्त करणे ही दुसरी. पण दिसलेली चूक सुधारण्याचा किंवा टाळण्याचा विधायक प्रयत्न करणे ही तिसरी पायरी सर्वात महत्वाची आहे. जगामध्ये असंख्य चुकीच्या गोष्टी सारख्या घडत असतात. त्याबद्दल दुःख होते तसाच रागही येतो. पण त्यांना आळा घालणे आपल्या आंवाक्याबाहेरचे असते. ज्यांना ते शक्य आहे असे आपल्याला वाटते ते कांही कारणाने ती गोष्ट करीत नसतील. पण म्हणून त्रागा करावा कां निदान आपल्या कार्यक्षेत्रात आपण काय करीत आहोत, आणखी काय करता येईल, कुठल्या प्रकाराने त्याचा विस्तार करता येईल याचा विचार करावा?


कशावर टीका किंवा कोणाला उपदेश वगैरे करायचा माझा हेतू नाही. मी नव्याने कांहीच सांगत नाही आहे. फक्त "उद्धरेत् आत्मनात्मानम्" हा एक प्राचीन काळातील पण कालातीत संदेश या नववर्षाचा एक निर्धार म्हणून मी सुचवीत आहे.