वाळूची वादळं

सौदीला जाईपर्यंत वाळूच्या वादळांबद्दल फ़क्त भूगोलाच्या पुस्तकातच वाचलं होतं आणि जास्तीत जास्त काही काही वाळवंटावर आधारित  सिनेमांमधे बघितलं होतं.  पण जेव्हा आम्ही पहिला अनुभव घेतला ना……. त्यावेळी अक्षरश: देव आठवले.

आम्ही नुकतेच सौदीला पोचलो होतो.  सोबतच week end आला होता त्यामुळे सामानाची आवराआवरी झाली.  सौदीला फ़ार मोठी मोठी घरं असतात आणि ती सुद्धा external airconditioned.  त्यामुळे जोवर तुम्ही Air conditioner लावत नाही तोवर air conditioner च्या जागी भगदाडं असतात.  अगदी दोनच दिवस झाले असल्यामुळे ती भगदाडं लवकरात लवकर सील करायची असतात हे माहीतच नव्हतं.  दोन खोल्यातले A.C. आल्यामुळे त्या दोन खोल्या पॅक होत्या.  पण किचन आणि एक बेडरुम मात्र त्या भगदाडांमुळे उघडीच होती.  आम्ही फ़क्त तात्पुरते पुठ्ठे लावून त्या जागा बंद केल्या होत्या.

शनिवार उजाडला.  सगळं व्यवस्थित होतं.  हे ऑफ़िसमधे गेले.  माझी थोडी आवरासावरी सुरु होती.  मुलं आरामात झोपली होती.  माझं काम जरा आवरेस्तोवर १० वाजले.  मुलं पण सगळं आटोपून घरात खेळत होती. 

आमच्या दोन बेडरुमला लागून मोठी बाल्कनी होती.  कपडे वाळत घालायला मी बाल्कनीत गेले तेव्हा बाहेर थोडंसं धुक्यासारखं दिसत होतं.  मला थोडं आश्चर्यच वाटलं……. म्हटलं इतक्या उन्हात धुकं कसं काय ? पण धुळीचा वास पण यायला लागला.  म्हटलं बहुतेक धूळ उडत असावी कुठेतरी.  कारण तिथे रोज सकाळी रस्ते साफ़ व्हायचे मशीननी पाणी घालून तेव्हा असाच वास यायचा.  मी शांतपणे कपडे वाळत घातले आणि घरात आले.  आम्ही जेवायला बसतच होतो तितक्यात मला पावसासारखा आवाज आला म्हणून मी दार लावायला पुन्हा बाल्कनीत आले. समोर बघते तो काय….. समोर काहीच दिसत नव्हतं ….. सगळीकडे धूळच धूळ !  अक्षरश: नाकातोंडात धूळ जायला लागली.  काही सेकंदातच चक्क बारीक बारीक दगडं….. जाड वाळू असते ना तसे……! रपारप अंगावर  यायला लागले.  काही समजायच्या आतच पावसासारखी रेती अंगावर पडायला लागली.  रेतीचा पाऊस चक्क !

मी लगेच दार बंद करुन मुलांना बंद बेडरुममधे पाठवलं.  तोवर रेतीच्या जोराने आम्ही आतून लावलेले पुठ्ठे उडून जाऊन पूर्ण खोलीत रेतीच रेती झाली.  दार पण बंद होईना….. माझ्या जोरापेक्षा बाहेरच्या वाळूच्या वादळाचा जोर इतका होता ना की मला दारही बंद करता येईना.  तेव्हढ्यात आमचा खाली राहणारा मित्र आला मदतीला.  त्याला वाटलंच होतं की आम्ही घाबरलो असणार म्हणून तो आम्हाला मदतीला आला होता.  त्याच्या मदतीने कसे तरी ते पुठ्ठे खोलीच्या बाहेरुन ठोकले आणि दार बंद केलं तेव्हा कुठे हुश्श झालं.  तोपर्यंत मात्र घरात सगळीकडे वाळूच वाळू झाली होती.  चेहेर्‍यावर रेती आपटून चेहेरा हुळहुळला होता. 

काय होऊन गेलं हे जेव्हा ध्यानात आलं तेव्हा कळलं की हे होतं वाळवंटातलं वाळूचं वादळ ! आई गं……. ! अजूनही आठवलं की काटा येतो अंगावर ! मग हळुहळु ह्याचीही सवय झाली.  सौदीत जेव्हा अशी वादळं होतात तेव्हा जर तुम्ही गाडीने जात असाल तर कठीणच……… आहे त्या स्थितीत गाडी थांबवून वादळ थांबायची वाट बघायची फ़क्त.  बरेच अपघात होतात असे तिथे. 

सध्या कुवेतला आहोत………हे ही वाळवंट.  पण खरंच निसर्ग सुद्धा किती मनस्वी असतो ना ! इथेसुद्धा वादळं होतात वाळूची पण एकदम बोअरींग !  म्हणजे चक्क २-२, ३-३ दिवस असतात ही वादळं पण सौदीसारखी मात्र नाही हं.  इथे रेती अगदी सुपर फ़ाइन डस्ट सारखी असते आणि सगळ्या आसमंतात भरुन राहते धुक्यासारखी. 

इथे घरं सेंट्रली एअर कंडीशन्ड असतात त्यामुळे अगदी पॅक असतात पण तरीसुद्धा सगळ्या घरात धुळीची परत जमते अगदी.  रेती सुद्धा इतकी बारीक असते ना…….अगदी मातीसारखी.  चिकटून बसते कपड्‌यांना सुद्धा.  बाहेर पडता येत नाही अजिबात.  इतकं डिप्रेसिंग वातावरण असतं ना ! जेव्हा जेव्हा जोरात वारं सुरु होतं ना…….. तेव्हा कळतं की आता २-३ दिवस irritating  Sand Storm सुरु होणार म्हणून.  आता इथल्या ह्या फ़क्त रेंगाळत राहणार्‍या धुळीला Storm म्हणतात तरी कसं देव जाणे!   इथे दोन दिवसांपासून हेच बोअरिंग SAND STORM सुरु आहे.  अगदी कंटाळा आलाय.   घराच्या चार भिंतीत डांबून राहण्याची शिक्षा आहे नुसती.

कधी कधी वाटतं की यापेक्षा सौदीचं धसमुसळं वादळ बरं…….. पटकन सगळा राग ओकून तरी टाकतं.  नाहीतर इथली वादळं नुसती धुमसत राहतात.