मन

मन या दोन अक्षरात ब्रह्मांड सामावले आहे.  सर्व प्राणिमात्रांमध्ये माणसाचे मन विशेष असावे. उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर माणसाच्या किंवा त्याआधीच्या मानवासदृश प्राण्याच्या मनात सूत्रबद्ध विचार आले असतील? उत्तर अवघड आहे. पण ७० लाख वर्षांच्या प्रवासात कुठेतरी ही कळी उमलली आणि विविध संवेदना, अनुभव, भावना या सर्वांच्या खतपाण्यामुळे तिचे रूपांतर झाले आजच्या आपल्या मनाच्या टवटवीत पुष्पामध्ये.

आता अडचण ही आहे की आपलेच मन आपल्यालाच कळायला तयार नाही. मनाचा थांगपत्ता लागणे हे डॉन चित्रपटात अमिताभ आपल्या बुलंद आवाजात म्हणतो तसे मुष्किल ही नही नामुमकीन असावे. आधुनिक सायकोथेरेपीचे जनक सिगमंड फ्रॉइड यांनी मनाचे तीन भाग कल्पले. पहिला भाग म्हणजे इड : यात आपल्या सुप्त इच्छा, आकांक्षा दडलेल्या असतात. मुख्य म्हणजे हा भाग अनकॉन्शस असतो. आपण झोपल्यावर जेव्हा आपल्याला स्वप्ने पडतात तेव्हा हा भाग कार्यरत असतो. पण बर्‍याच वेळा जागेपणी आपल्या नकळत अचानक हा भाग क्षणभर डोकावून जातो. बहुचर्चित फ्रॉइडीयन स्लिप ऑफ टंग हे एक उदाहरण. दुसरा सुपरइगो:  यातली शिकवण चुकीची की बरोबर हे संगोपनावर बरेच अवलंबून असते. बंड्या तीस वर्षाचा झाल्यानंतर, आई-बाबा नसतानाही पानात काही टाकून उठत नाही तो सुपरइगोमधल्या संदेशामुळे. तिसरा भाग आहे इगो: हा आपण रोजच्या कामात वापरतो. ब्रेन सर्जरीपासून भाजी कापण्यापर्यंत सर्व कामे हा करतो.

फ्रॉईड यांच्यानंतर मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या सिद्धान्तांच्या आधारे मनाचे वर्णन केले. अलीकडे मेंदूचे कार्य समजू लागल्यानंतर शास्त्रज्ञांनी मेंदूतील रासायनिक प्रक्रियांचा भावनांवर कसा परिणाम होतो यावर बरेच संशोधन केले. उदा. सेरिटोनिन हे रसायन मेंदूत स्रवले तर आपल्याला उल्हसित वाटते. म्हणूनच याचा उपयोग उदासीनता (डिप्रेशन) घालवण्यासाठी दिल्या जाणार्‍या औषधांमध्ये केला जातो.  याचबरोबर आपल्या भावना बर्‍याचदा आपल्या विचारांवर अवलंबून असतात. जर मी नेहमी स्वतःला दोष देत असलो, तर माझ्या भावनाही त्याच प्रकारच्या होतील. विचार करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मनाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपण लहानाचे मोठे होत असताना भोवतालच्या वातावरणाचा, आपल्या संगोपनाचा आपल्या मनाच्या जडणघडणीत मोठा वाटा असतो. बर्‍याच वेळा जाणते किंवा अजाणतेपणी कोवळ्या मनावर आघात होतात आणि मनाची कळी कोमेजते. शारीरिक हिंसा जितकी वाईट तितकीच मानसिक हिंसाही हानिकारक असते. यामुळे स्किझोफ्रेनिया, विविध प्रकारच्या डिसऑर्डर्स असे आजार उद्भवतात. यातून मार्ग काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या अनुभवी मार्गदर्शनाची नितांत गरज असते. दुर्दैवाने आजही आपल्या समाजात मानसोपचार करणे हा एक 'टबू' मानला जातो. जर शरीराला इतक्या वेळा उपचारांची गरज भासू शकते, तर मनाला का नाही हा साधा विचार होत नाही.  

मन संकुचित असते, विखारी असते. पण मन ताजेही असते, मोकळेही असते. अर्थात कुठल्याही मनात पूर्ण काळी किंवा पूर्ण पांढरी छटा नसावी. संवेदनाशील मने कथा, कादंबर्‍या, चित्रपट अशा अनेक माध्यमातून या छटांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपल्याला एखादी कथा भावते तेव्हा त्या कथेशी, त्यातील एखाद्या पात्राशी आपण स्वतःला आयडेंटीफाय करतो. पण बर्‍याच वेळा हे आयडेंटिफिकेशन अनकॉन्शस किंवा प्रिकॉन्शस असते. म्हणूनच काळाचा परिणाम न होता कुठल्याही शतकातील लोक जेव्हा एखाद्या साहित्याशी एकरूप होतात, तेव्हा ते साहित्य आपोआप अभिजात होते.

मनाची किती रूपे आणि किती अवस्था. सार्वभौम राज्य, सुस्वरूप पत्नी, गोंडस मुलगा या सर्वांचा त्याग करून, अनोळखी आणि अनिश्चित अशा सत्याच्या शोधात जाणार्‍या सिद्धार्थाच्या मनात त्या रात्री कुठली आंदोलने उमटली असतील? आणि सत्याचे विश्वरुपदर्शन झाल्यावर त्याच शीतल मनाचे स्वरुप कसे असेल? आपली पत्नी, अपत्ये यांचे मृत्यू आपल्या डोळ्यादेखत बघताना गुरूदेवांच्या संवेदनाशील मनाची काय अवस्था झाली असेल?  अठरा अक्षौहिणी विशाल अशा कौरवसैन्याचे नेतृत्व करणार्‍या आपल्या आप्तजनांना पाहून पार्थ गर्भगळित झाला आहे. तो व्याकुळ होऊन कृष्णाला विचारतो, "हे मन काबूत कसे आणायचे?" त्यावर कृष्ण म्हणतो, "हे पार्था, हे अवघड असले तरी प्रयत्नांती शक्य आहे." प्रियेच्या विरहामुळे वेड्या झालेल्या मनाला उद्देशून ग़ालिब म्हणतो, 'दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है". याच अवस्थेमध्ये महाकवी कालिदास मेघदूत लिहितो.

मन चिंती ते वैरी न चिंती अशी म्हण आहे. पण मनाची झेप सकारात्मक दिशेनेही असते. मानवी इतिहासातील अनेक शोध मनाच्या उत्तुंग भरारीमुळे लागले आहेत. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड फिनमन हे त्यांच्या संशोधनाविषयी म्हणतात, "एखाद्या शीतपेयाच्या बाटलीचे बूच उघडल्यावर पेय जसे सहजतेने बाहेर येते, तशा या कल्पना मला सुचत गेल्या." बेंझीन या रेणूची संरचना मांडणार्‍या केकुलेला ही रचना सर्वप्रथम स्वप्नात दिसली होती. सर्वात सोपे यंत्र मानल्या जाणार्‍या चाकापासून चंद्र, तारे, आकाशगंगा यांचे दर्शन घडवणार्‍या गुंतागुंतीच्या अंतराळयानापर्यंत सर्व शोध हे त्या त्या काळातील अभियंत्यांच्या अद्भुत कल्पनाशक्तीचा चमत्कार आहेत.

अशा या मनाविषयी बोलायला 'मनोगत' सापडावे, हा योगायोगच नव्हे का?

हॅम्लेट