केशवसुमारांची 'चिमण्या-२'-एक समीक्षा

गझल: चिमण्या-२ कवी: केशवसुमार

त्या प्रेमिकाच माझ्या मजला कुटून गेल्या
आधी तश्या चुका ही माझ्या घडून गेल्या

समजायला मला ही झाला उशीर होता
माझ्या उचापती पण त्यांना कळून गेल्या

धरल्या मनात होत्या चिमण्या गृहीत साऱ्या
एका क्षणात मजला दुर्गा दिसून गेल्या

कुरबूर अवयवांची मी एकतोय आता
बुकलून पार मजला साऱ्या निघून गेल्या

केली अशी धुलाई जन्मात ना विसरणे
नक्षाच पार माझा त्या बिघडवून गेल्या

केला हिशोब जेव्हा माझ्याच मी हडांचा
सगळ्याच सापळ्याच्या संख्या चुकून गेल्या

हे शब्द पाहिले अन् सुचलेच "केशवा"ला
पुन्हा विडंबनाच्या चकल्या पडून गेल्या

ह्या गझलेची समिक्षा खाली देत आहे.

समीक्षक (स्वगत) भोगा आपल्या कर्माची फळे!

समीक्षक (प्रकट)
सदर गझल वाचल्यानंतर,एकच ध्येय (धुलाई) असलेल्या सामूहिक महिलाशक्तीचा साक्षात्कारी अविष्कार अनुभवल्याने कविचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे असे जाणवते. अर्थात हा कवीच्या महिलाविषयक 'व्यापक, सर्वसमावेशक' धोरणाचा परिपाक आहे! गेल्या दशकात महिला सबलीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्याची दृश्य प्रचिती आता सर्वत्र -विशेषतः मराठी गझलेत- दिसू लागली आहे. पहा: चिमण्या-दुर्गा (शेर क्र ३) कवी केशवसुमार ह्या सबलीकरणाचे साक्षीदार (वाचा- बळी) आहेत. ही गझल एका शक्तीमान सामाजिक बदलाचा समर्थ पण वेदनामय आढावाच आहे.
ह्या गझलेत कवी पहिल्या-शेरातच (मतल्यातच) स्पष्ट करतात की 'त्यांना कुटणाऱ्या त्यांच्या प्रेमिकाच होत्या'. यावरून कवीचा प्रेमळ स्वभाव अधोरेखीत होतो. पण "आधी तश्या चुका ही माझ्या घडून गेल्या' हे सांगण्याइतपत तो प्रामाणिक आहे व त्या चुका ह्या साध्या नसून 'उचापती' होत्या(पहा: शेर क्र २) व त्यामुळेच प्रेमिकांची कूटनीती योग्यच होती हे तो मान्य करतो!
'हाडे,सापळ्या, बूकलून,कूरबूर...' हे शब्द जसे वेदनांचे चित्रमय वर्णन करतात तसेच प्रेमिकांच्या कुटण्याच्या 'विविध शैली' ही दर्शवितात, नाही कां? या प्रेमिकांच्यापैकी काहींनी जुडो, कराटे आदी कलांचे अध्ययन केले असावे तर कवीला सुचवायचे नाही ना?
शेर क्र ५ मधे 'नक्षा...बिघडविणे' हा जो काही उल्लेख आहे त्यात सुधारणा सुचवाविशी वाटते.'नक्षा...बिघडविणे' हे हिंदी भाषेत 'नक्शा बिगाडना'चे भाषांतर वाटते.मराठीत 'नक्षा उतरविणे' असा वाक-प्रचार आहे.यावरून कवी हिंदी भाषिक प्रदेशातही संचार करून (व तिथेही कूटून घेऊन) आला आहे असे जाणवते.पण तरीही हा चतुर कवि आपले महिलाविषयक धोरण बदलण्याबद्दल चकार शब्दही काढत नाही हे लक्षात घ्यावे ! त्यामुळे भविष्यात या कवीकडून असेच प्रत्ययकारी लिखाण वारंवार वाचायला मिळेल अशी आशा करण्यास बराच वाव आहे. या कवीच्या भाषासंपदेची व सहनशीलतेची मात्र दाद द्यावी लागते.

सदर कविने प्रथमोपचार-पेटी सतत जवळ बाळगावी असा मित्रत्वाचा सल्ला देत आहोत व यापुढे 'विडंबनाच्या चकल्या पाडणे' वगैऱे पाकक्रियाकडे आपले लक्ष वळवावे. इतर 'ना-पाकक्रिया'तून येणारा अनुभव कवीने घेतलाच आहे!
(ह. घ्या)

(जयन्ता५२)