यंदा कर्तव्य आहे !! - भाग २

आत सर्वप्रथम आम्ही व्यवस्थापकांच्या खोलीत गेलो.म्हणजे पहिल्यांदा तिथे येण्याची नोंद करायची व नंतर आपण तिथून हवी असलेली रजिस्टर्स घ्यायची. बाकी सर्व नोंदणीचे सोपस्कार आईने आधीच केल्याने आम्हाला लगेचच उमेदवार मुलांची माहिती असलेले रजिस्टर्स पहायला मिळाले.

रिकामा बेंच पाहून आम्ही (म्हणजे मुख्यतः आईने )आपल्या वरसंशोधन मोहिमेला सुरुवात केली.मला त्या सगळ्या गोष्टीत काही फ़ारसा रस नव्हता पण मध्येच आईबरोबर एखाद्या स्थळाबद्दलची माहिती लिहुन घेणे वगैरे चालु होतं.खरं सांगायचं तर इथे अजुन कितीवेळ बसायला लागेल या विचारात माझी टंगळमंगळ चालु होती.तिथे उपवर मुलगी अशी मी एकटीच होते.बाकी सगळे मुलींचे पालक अथवा घरातल्या मोठ्या व्यक्ती ! त्यामुळे सगळ्यांची माझ्याकडे बघण्याची नजर जरा टिपीकल होती. या सगळ्यामुळे मलाही प्रचंड अवघडल्यासारख़ं वाटत होत. मी सुद्धा शांतपणे खाली मान घालून बसेन तर शप्पथ ...उगीच एकडेतिकडे पहात बसले होते. मध्येच आई म्हणे "अगं,इकडेतिकडे बघत काय बसलीस? मला मदत कर ना !"

उमेदवार मुलं मात्र बरीच दिसली. काही आपल्या पालकांच्याबरोबर तर काही एकटी. आधी सांगितल्याप्रमाणे मुलांना कार्यालया पर्यंत आम्ही बसलेल्या खोलीतुन जावं लागे त्यामुळे मी अर्थातच पहाण्याची एकमेव गोष्ट (अप्रत्यक्षरित्या का असेना ) बनले होते.मीही इतकी काही आरामात सगळ्याचं निरीक्षण करतं होते की नक्कीच एखाद्या मुलांची आई मनात म्हणाली असेल.. "काय बाई आजकालच्या पोरी..छे: छे:.. नशीब  बुवा आमचा मुलगा अशा कुणाच्या प्रेमाबिमात नाही पडला !!"

आमच्यानंतर साधारण तासाभराने एक मुलगी व तिचे वडिल तिथे आले‌.त्यांच्या बोलण्यावरुन त्यांची व्यवस्थापकांशी चांगली ओळख आहे असं जाणवलं.आमच्या शेजारची जागा रिकामी होती तिथे ते येऊन बसले. मला किती छान वाटलं म्हणुन सांगू !अहो,माझ्याशिवाय अजुन एक व्यक्ति तिथे आली होती नजरा शेअर करायला. जान्हवी नावं होतं तिचं. नाकीडोळी निटस आणि अगदी साध्या स्वभावाची वाटली मला.एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर होती̱.तिचे  वडिल नोकरीतुन निवृत्त झाले होते. मोठा मुलगा आणि मुलगी लग्न करुन चांगले सेटल झाले होते. आता हीचं लग्न झालं की चिंता मिटली असं त्यांच होतं.गेले २-३ वर्ष तिच्यासाठी स्थळे बघत होते.पण प्रश्न एकच तिच्या पत्रिकेत मंगळ होता. कित्येक मुलांनी केवळ मंगळदोषामुळे तिला नाकारली होती. एखाद्या ठिकाणी पत्रिका जमलीच तर मग तिच्या अटी आड येतं. म्हणजे असं की ती इतकी शिकलेली आणि कमवती,आपला नवरा जास्तं नाही पण निदान आपल्या इतका शिकलेला असावा ही तिची अपेक्षा‌. शिवाय परदेशी स्थायिक मुलांशी लग्न करून आपली जमं बसलेली नोकरी सोडंणं तिला मान्य नव्हंतं.

जान्हवी सारख्या कित्येक मुली आज हयाच परिस्थितीतुन जात असतील. वाढत्या वयामुळे सहाजिकच घरातले सगळे त्यांच्या लग्नाच्या चिंतेत असतात. कारण आपल्या परंपरेप्रमाणे मुलगी जितकी मोठी तितका पहिला प्रश्न हाच येतो की हिच्यात काही दोष तर नाही? आणि मग अगदी शुल्लक दोषसुद्धा नजरेत येतो‌.  शिकलेल्या अथवा परदेशी स्थायिक मुलांच्या अपेक्षा पण सर्वगुणसंपन्न पत्नीच्या असतात.म्हणजे मुलगी सुंदर,सालस,चारचौघीत उठुन दिसणारी,पाककलेत निपुण,आईवडिल आणि घरच्यांना सांभाळुन घेणारी वगैरे वगैरे. जान्हवी सारख्या मुली या सर्व चौकटीत बसत असतीलही पण मग त्या मुलींच्या अपेक्षांचं काय? आणि याला उपाय काय? केवळ हाच की कोणीतरी आपल्या अपेक्षांना मुरड घालायची?

या सगळ्या गोष्टीनी माझं डोकं इतकं सुन्न झालं की मी पुन्हा तिथे कधीही जाणार नाही अशी शपथ्थ घेउनच बाहेर पडले.

जेव्हा मी जान्हवीला भेटले तेव्हा मी एका उपवर मुलीच्या दृष्टीने या सग़ळ्याकडे पहात होते आणि स्त्री स्वातंत्र्याच्या भन्नाट कल्पना माझ्याही डोक्यात चमकल्या."का म्हणुन नेहमी मुलींनीच बदलायच..." वगैरे वगैरे... पण आज एक विवाहीत  म्हणुन जेव्हा या सगळ्याकडे पहाते तेव्हा वाटत की ह्यात दोघेही आपापल्या दृष्टिने योग्यच आहेत. जर आपल्याला हया समाजात रहायचं असेल तर या सगळ्याचा सामना करावाच लागेलं. नाहितर मग लोकं काय म्हणतील याचा विचार नं करता आपापल्या अपेक्षांना धरुन रहावं आणि तेव्हाच जोडीदार निवडावा जेव्हा तो मनासारखा मिळेल.

नाही का? तुम्हाला काय वाटतं ? मला जरुर कळवा !!