"कुणाची बात"

ऋतू येत होते ऋतू जात होते
वृथा गुंग मी रंग-गंधात होते

कुणा सांगता या कथा श्रावणाच्या
असे आजच्या का जमान्यात होते?

कुठे भूक आहे कुठे घास आहे
मना खात हे प्रश्न ताटात होते

रिकामीच मैफ़िल तरी दाद येते
असे दर्द-गाणे कुणी गात होते

तमा आसरा आज कोठे मिळावा?
कुणी तेल होता कुणी वात होते

जरी शांत आता, पहारे असू द्या -
इथे सर्वकाही अकस्मात होते!

खरी वेळ येता म्हणे "कुंजरोवा"!
असे सत्यवादी समाजात होते

पुढे षंढ गांडीव मागे लपावे?
कधी शुद्ध सामर्थ्य कोणात होते

शहाण्यात ज्यांना कुणी मोजले ना
मला तेच वेडावुनी जात होते

निघा, आवरा जीर्ण पोथ्या पुराणे
इथे 'आमची', 'आज'ची बात होते!

=== पुलस्ति