शेजारी

भाषांबद्दलची एक चर्चा वाचताना मनात विचार आला, हिंदी-उर्दूशी माझी ओळख कधी झाली? उत्तर आले जेव्हा मराठी शिकलो त्याच काळात. आणि याला कारणीभूत होते आमचे शेजारी. मेंदूचे मला नेहमी आश्चर्य वाटते. कुठल्यातरी विचाराने काही न्यूरॉन्स उत्तेजित होतात, मेंदूत झटपट रासायनिक प्रक्रिया होतात, विद्युतप्रवाह वेगाने इकडून तिकडे वाहतात आणि माझे लहानपण झर्रकन माझ्या डोळ्यासमोरून जाते.

आमच्या शेजारी होते अन्सारी कुटुंब. आजी-आजोबा, त्यांची चार मुले, सादिककाका, अफजलकाका, जुबेरकाका आणि तारिककाका. त्यात आमचा विशेष सलोखा होता तो सादिककाका, बिल्किसभाभी आणि त्यांची दोन मुले अझर आणि अथर यांच्याशी. आणि याला कारण म्हणजे आमची घरे शेजारी-शेजारी होती.

तुम्ही एक गोष्ट पाहिली आहे का? भिन्न भाषिक मुलांना एकत्र खेळताना कधीही भाषा, व्याकरण अशा फालतू अडचणी येत नाहीत. मोठेपणीच हा लवचिकपणा कुठे जातो कोण जाणे. मी, अझर आणि अथर, आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा. संध्याकाळी शाळेतून आल्यावर यष्ट्या ठोकायच्या. चेंडू कुंपणाला लागला तर चौकार, कुंपणावरून गेला तर षटकार (पण चेंडू फलंदाजाने जाऊन आणायचा) आणि दोन्हीपैकी कुठल्याही घरात गेला तर फलंदाज बाद असे आमचे परिस्थितीनुसार उत्क्रांत होत गेलेले नियम होते. यापैकी तिसर्‍या गोष्टीमुळे मालमत्तेची हानी झाल्यास काही वेळा घरातील 'थर्ड अंपायर' सामना रद्द करण्याचा निर्णय घेत असत. एकदा आमचे क्रिकेट खेळणे सुरू झाले की अंधार पडून घरातून हाका येईपर्यंत थांबायचे नाही. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळताना हिंदी कधी शिकलो, कधी बोलायला लागलो माझे मलाही कळले नाही. आणि गंमत म्हणजे सादिककाकांना मराठी बोलायची आवड होती. आमच्याशी ते मराठी बोलत असत. "अंकल, तुम्हाला सांगते, आज-काल ते साला पोलिटिक्स एकदम बेकार झालाय!" असे त्यांचे थॊडेफार पारशी ढंगाचे मराठी होते. आमच्याकडून 'सकाळ' घेऊन ते आवडीने वाचत असत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांचे मुंबईचे पाहुणे येत असत. खेळाडू वाढल्यामुळे आम्ही दुसर्‍या संघाला बोलावणे करून मोठ्या मैदानावर सामना ठरवत असू. मग कुणाची बॅट, कुणाच्या यष्ट्या अशी साहित्याची जुळवणी करायला लागत असे. चेंडू मात्र वर्गणी करून नवीन आणलेला असायचा. आठवडाभर आधीपासून कोण जिंकणार, कोण किती धावा करणार याचे अंदाज बांधले जात असत. याव्यतिरिक्त भर उन्हात बोरे, चिंचा पाडायला जाणे, नंतर खोकला येणे, त्याबद्दल घरातून समज मिळणे, हे प्रकार नित्यनेमाने होत असत.

प्रत्येक वर्षी ईद आली की आम्हाला आग्रहाचे निमंत्रण असे. आमचे आई-दादा थोडे जुन्या वळणाचे, त्यामुळे ते जायचे नाहीत. पण आम्हा मुलांना जाण्यासाठी मज्जाव नव्हता. बिल्कीसभाभी मला आणि माझ्या बहिणीला अगत्याने घेऊन जात असत. आईची परवानगी घेताना विश्वासाने सांगितले जात असे, "आंटी, ह्यात मांस-मच्छी काही नाही बरं का. अगदी भांडीसुद्धा वेगळी घेतली आहेत स्वैपाकाची." आजही ईद म्हटले की मला काजू-बदाम-पिस्ते घातलेली ती खीर आठवते. आमच्या बाजूने दिवाळीला फराळाच्या रूपात याची परतफेड होई. याशिवाय कोथिंबिरीच्या वड्यांपासून इडलीपर्यंत कुठल्याही चविष्ट पदार्थाचा नमुना शेजारी पोचवला जात असे.

आठवणी यायला लागल्या की लोंढाच येतो. त्या काळी दूरचित्रवाणी संच म्हणजे नवलविशेष होते. आमच्याकडे आला तेव्हा तारिककाकांनी स्वतः जातीने ऐंटेनाची जोडणी करून चालू केला. मग पुढच्या रविवारचा दूरदर्शनवरचा हिंदी चित्रपट आम्ही सगळ्यांनी एकत्र पाहिला. तारिककाका तेव्हा कॉलेजात शिकत होते. दुपारी कॉलेजातून आल्यावर ते जगजित सिंगच्या गझला ऐकत असत, 'आहिस्ता-आहिस्ता' त्यांच्या विशेष आवडीची. आम्हा मुलांबरोबर क्रिकेट खेळताना मूल होऊन जात. लेग-ब्रेक आणि गुगली यांतील फरक त्यांनीच आम्हाला सांगितला.

सुपरमॅन चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आम्ही मुलांनी बघायचा घाट घातला. आम्ही आमचे आमचे जाऊन, चित्रपट बघून, सुखरूप परत येऊ शकतो हे आपापल्या आई-बाबांना पटवून देण्यात काही वेळ गेला. शेवटी एकदाची परवानगी मिळाली. आम्हां चौघांमध्ये अझर जास्त धडपड्या. त्याने पुढे जाऊन तिकिटे काढली आणि आमची वाट बघत थांबला. आम्ही तिघे एकमेकांना धीर देत, बसचा क्रमांक बरोबर आहे ना याची खात्री करीत, कुठे चुकत नाही ना ह्या दडपणात चित्रपटगृहावर पोचलो. हे सगळे करून शेवटी पडद्यावर एकदाचा तो सुपरमॅन उडताना पाहिला आणि याची देही याची डोळा ब्रह्म भेटले. नंतर कित्येक दिवस आम्हाला सुपरमॅनच्या करामतींशिवाय बोलायला दुसरा विषय नव्हता.

रोज संध्याकाळी अन्सारी आजोबा आणि काका लोक मुलांसकट अंगणात सतरंजी टाकून नमाज अदा करत असत. मला गणपतीची आरती आणि नमाजाची बांग या दोन्हींची सवय एकाच वेळी झाली. अन्सारी आजींच्या हातातील उलट्या दिशेने जाणार्‍या जपमाळेचे मला नवल वाटत असे. गणपतीचे दिवस आले की मोदक, रोषणाई, मिरवणूक यांच्या आठवणीने अझर, अथर खूश होत असत. दिवाळीत आमच्याबरोबर त्यांच्या बागेतही किल्ला करत असत.

शाळा संपून आम्ही कॉलेजात जाईपर्यंत अन्सारी कुटुंबाने घर बदलले. मी नवीन मित्रमंडळात रमलो. संपर्क कमी झाला. पण हिंदी-उर्दूशी मैत्री झाली ती मात्र आयुष्यभरासाठी.

हॅम्लेट