आठवणीतल खाणं

माणसाला जगायला काय लागतय? दोन वेळेला गोळाभर अन्न! म्हणताना आपण भले असे म्हणत असलो तरी प्रत्यक्षात मात्र आपण चवी-परीने खात असतो. आता प्रत्येकाच्या आवडीचे असे खास पदार्थ असतात, घरी केलेले वा बाहेर मिळणारे. एखादा पदार्थ म्हणजे कधी कुणाची खासियत असते तर कधी कुठल्या ठेल्याचे वा उपहारगृहाचे वैशिष्ठ्य असते. प्रत्येकाची अशी काही ना काही चविष्ट ठिकाणे असतातच. मात्र याही पलिकडचे असतं ते आठवणीतलं खाणं. तो पदार्थ कायम आठवत राहतो, त्याच्या चविपेक्षा त्याची आठवण आयुष्यभर साथ देते. अशाच काही आठवणी - खाण्याच्या आणि न खाण्याच्याही! 

 साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. परळ नाक्यावर के. ई. एम. रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी कोपऱ्यावरच एक पंजाबी भोजनगृह होत. त्याच नांव बहुधा अमृत पंजाब किंवा अजंठा पंजाब अस काहीतरी होत. दुपारची वेळ होती. मी आत शिरलो आणि कसलीतरी भाजी व रोट्या मागवल्या. काय झाल कुणास ठाउक, पण जेवण येइपर्यंत एकदम जेवायची इच्छाच गेली, घास देखिल नकोसा झाला. मी जेमतेम रोटीचा तुकडा मोडला असेल इतकच. मी सेवकाला पैसे किती झाले ते विचारले. विचित्र नजरनं माझ्याकडे पाहत त्याने काय झाले असे विचारले व माझे उत्तर ऐकून काही न बोलता देयक बडिशेपेच्या ताटलीतून घेउन आला. मी खिशातल पाकीट काढून पैसे ठेवत असतानाच गल्ल्यावरचा सरदरजी; बहुधा तो मालक असावा, तो माझ्या जवळ येउन उभारा राहीला. जवळ पास सहा फूट उंच, रुपेरी झालरीच्या कोरीव दाढी मिशा, साठीच्या आस-पास वय व तरीही दणकट अंगयष्टी, खाली निळी लुंगी व वर बाह्या अर्ध्या दुमडलेला पांढरा तलम सदरा, डोक्याला गडद निळा फेटा. तो माझ्या भरल्या ताटाकडे पाहत म्हणाला, की असे अन्न सोडून का जाता? जेवण ठीक नाही? जास्त तिखट वगरे झालय की रोट्या वातड आहेत? मी त्याच्या जेवणाचा काही दोष नसल्याचे स्पष्ट करत त्याला अचानक भूक नाहीशी झाल्याचे व जेवणे शक्य नसल्याचे सांगितले. त्याने मला न विचारता एक लस्सी मागवली. नको म्हणत असता त्याने आग्रहाने मला मला पेलाभर लस्सी घ्यायला लावली. कुणी गिऱ्हाईक जायला निघाल, तसा तो गल्ल्याकडे निघून गेला. खरेतर तीही घेण्याची इच्छा नव्हती पण त्याला नाही म्हणणे अवघड वाटले. कशीबशी मी लस्सी संपवली. मी लस्सी संपवून उठलो व हातात देयक व पैसे घेउन गल्ल्याकडे गेलो.

तिथे जाताच, सरदारजीने हात पुढे करत देयक व पैसे घेतले. हसतच त्याने ते देयक फाडून टाकले व पैसे माझ्या सदऱ्याच्या खिशात कोंबले. 'बेटा, न जेवलेल्या जेवणाचे कसले पैसे घ्यायचे? मला फारच अवघडल्या सारखे झाले. मी त्याला सांगायचा प्रयत्न केला की चूक माझी होती, उगाच त्याला भुर्दंड का? तो ऐकत नाही म्हणताना मग मी निदान लस्सीचे पैसे तरी घ्या असे सुचवले. दिलखुलासपणे हसत त्याने आपले दोन्ही हात माझ्या खांद्यांवर ठेवले व म्हणाला, बेटा तू लस्सी घेतलीस, मला माझे पैसे मिळाले! तू भरल्या पानवरून न जेवता रणरणत्या उन्हात निघून गेला असतास तर मला वाईट वाटल असत, दिवसभर चैन पडल नसत. पुन्हा कधीतरी चांगली भूक असेल तेव्हा ये, मी नक्की पैसे घेइन. आज ते भोजनगृह तिथून जाऊन अनेक वर्षे झाली, पण अजूनही त्या बाजूला गेलो तर नजर त्या वळणावर जाते आणि सरदरजीचा चेहरा डोळ्यापुढे येतो.

चीनमधील एक संकष्टी. मुक्काम चावज्झौ ला होता. दिवस कामात कसा गेला समजलेच नाही, दुपारी भोजना ऐवजी फळांवरच हात मारला होता. संध्याकाळी खोलीवर परत आलो, की आपला पाकिट्बंद सांबारभात आणि हीने भाजून, प्लस्टिकच्या चपट्या हवाबंद डब्यात रचून दिलेले पापड खाउन व वर बेसनाचा लाडु हाणून चतुर्थी सोडायची असा विचार होता. खरेतर अस एकट्याने आपल आपण करून घ्यायची सवय नाही, पण आता बाहेर पडल्यावर हे सगळ आलच. हवेत मस्त गारवा होता. अवेळी आलेल्या पावसाच्या सरीन गारेगार करून टाकल होत. आम्ही निघालो. मात्र मंडळींनी जेवायला जायचा आग्रह धरला. आता चतुर्थी म्हणजे काय, ती सोडणे म्हणजे काय, ती का करतात हे सगळ भाषेची मर्यादा सांभाळून त्यांना सांगण शक्य नव्हत. शिवाय केनिस च्या कारखान्याचे मालक व त्यांची पत्नी स्वत: आग्रह करताहेत म्हणताना नाही म्हणणं शक्यच नव्हत.

आम्ही यु. बी. सी. कॊफी मध्ये दाखल झालो. उपहारगृह प्रशस्त व सुंदर सजवलेल होत. श्री. शू यांनी वरच्या मजल्यावर जाउ असे सुचवले व आम्ही वर गेलो. लाकडी तळ, लाकडी खांब, लाकडी छत व रस्त्याच्या बाजूला असलेल्या संपूर्ण भागात दोन दोन जण समोरासमोर बसतील असे झोपाळे टांगलेले. बरोबर मध्यावर जेवायला मेज. हलकेच झोके घेता घेता गप्पा मारत खायची कल्पना मला फारच आवडली. अर्थात संकष्टी सोडायची असल्याने तिथे काहीतरी कारणाने फळांचा रस वा फलाहार करून सटकायच व खोलीवर जाउन जेवायच असा माझा बेत होता. उगाच संकष्टीच्या दिवशी उपास सोडताना चुकुन पानात काही भलत पडायला नको:) सुरुवातीला फळांचे तुकडे, शेंगदाणे, रस वगरे झाल्यावर मंडळींनी भोजनाचे पदार्थ मागवायचा आग्रह धरला. अगदी ऐकेचनात. भूक नसली तर काहीतरी हलकसं मागवा म्हणाले. आता आली का पंचाईत? मी उगाच पदार्थसूची हाती घेतली व चाळू लागलो.

चीनमध्ये अनेकदा चीनी व इंग्रजी अशा दोन्ही भाषात सूची केलेली असते; व तिही सचित्र! बरे आहे, निदान चित्र पाहून साधारण कल्पना येऊ शकते. सूची चाळता चाळता शेवटून दुसऱ्या पानावर नजर थबकली - 'इंडियन करी वीथ राईस'. हे प्रकरण नक्की काय असेल असा विचार करत असतानाच शेजारी बसलेल्या याओछीनने मनकवडेपणाने माझ्या मनात्तला संभ्रम ओळखून व्यवस्थापकाला साद दिली. या चीनी ठक्या मोठ्या हुशार. व्यवस्थापकाशी प्रदिर्घ चर्चा झाल्यावर परस्पर त्याला त्या पदार्थाची मागणी करत तिने मला सांगीतले की तो पदार्थ शुद्ध शाकाहारी होता व माझ्यासाठी तिने नेहेमीप्रमाणेच तेला ऐवजी लोण्यावर बनवायला सांगीतला होता. थोड्याच वेळात जेवण आले. सर्वांना त्यांचे पदार्थ व्यवस्थित रचून दिले गेले. चीनमध्ये अनेक उपहारगृहांत भात-भाजी-मासे-मांस वा तत्सम 'संच' या सदरात मोडणारे पदार्थ विशिष्ठ आकाराच्या खोक्यातून वाढायची पद्धत आहे. हे खोके साधारण आपल्याकडे दिवाळीला सुकामेवा भेट द्यायला वापरतात तसे अनेक खणी असतात. बाहेरून बांबूचे व कागदी वेष्टन असलेल्या खोक्याला आत मधून अनेक खळगे असलेला कचकड्याचा साचा बसवलेला असतो, प्रत्येक खळग्यात एक एक पदार्थ असतो. हे पदार्थ एकत्र खायचे असले तरी मिसळलेले नसतात व खाणाऱ्याला चवीनुसार मिसळून वा कालवून घेता येतात.

माझ्या पुढ्यातला खोका मी देवाचे नाव घेत उघडला आणि 'आ' वासून पाहतच राहीलो. मुख्य म्हणजे मोठ्या खणात चीनी गचक्या ऐवजी मस्त मोकळ्या पण मऊसूत भाताची मोठी मूद, डाव्या कोपऱ्यातल्या वरच्या खणांत बटाट्याचे सळयांसारखे उभे, सडसडीत काप व डोक्यावर लाल मिरची, उजव्या कोपऱ्यात वांग व बटाट्याची रसभाजी! वास तर बऱ्यापैकी परिचित वाटला. आता थांबणे शक्यच नव्हते. बांबूच्या काड्यां ऐवजी माझ्या साठी मागवलेल्या 'फ़न छा' म्हणजे काट्याने मी आक्रमण केले आणि पहिल्याच घासाला पसंतिची दाद दिली. चीनमध्ये संकष्टी सोडायला गरमागरम भात, वांग-गाजर-बटाटा रस्सा व बटाट्याचा मिरपूड घातलेला खमंग खीस असे सुग्रास भोजन मिळेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. ते आश्चर्य भोजन मी भरपेट हाणले आणि तृप्त झालो. ते जेवण केवळ अविस्मरणीय.

मुंबईकरांचे हाल होण्याचे काही ठरलेले मार्ग आहेत. पाऊस, त्यामुळे पाणी भरुन लोहमार्ग वा रस्त्यावरची वाहतूक बंद पडणे; लोहमार्गावरील विजेच्या तारा तुटुन वाहतूक साफ कोलमडणे; अचानक कसला तरी उद्रेक होऊन सगळे 'बंद' होणे. तर अशाच एका प्रकाराने मी दादरला अडकलो होतो. संध्याकाळची वेळ होती. मुंबईची जीवनरेखा समजली जाणारी उपनगरी वाहतूक कोलमडली की घरी परतणाऱ्या मुंबईकराचा सर्व मार्गांचा शोध सुरु होतो. आता उपनगरी गाड्या बंद पडल्यावर जादा बस सोडल्या तरी ते करवंटीने समुद्र उपसण्यासारखे असते. शिवाय सगळी वाहतूक रस्त्यावर येताच रस्तेही वाहनांनी तुंबतात आणि हालाला सीमा राहात नाही. आता मी आपला तरणा बाप्या माणूस, पण बायकांचे अतोनात हाल. मुलांच्या व घराच्या ओढीने घरी जायचा निकराचा प्रयत्न करत असतात बिचाऱ्या.

मी जितके जाता येइल तितके जाउ म्हणत सायन आगारापर्यंत जाणाऱ्या बसला लटकलो. सायन तर सायन. चला तितके तर जाऊ, पुढचे पुढे. अखेर आठच्या सुमारास सायनला पोचलो. पुढे काही फारसे आशादायक दृश्य नव्हते. टॅक्सीवाले लांबची भाडी घेउन अवाच्या सवा पैसे मागत होते. गाड्या सुरु होण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. आता तेव्हा मी लग्नही न झालेला एकटा जीव होतो, शिवाय नोकरीतही फर मोठ्या पदावर नसल्याने दुसऱ्या दिवशी दांडी मारणे चालण्यासारखे होते, सर्व गणित जमल्यावर मग मी आत्याच्या घराकडे चालू लागलो. स्थानकापासून अगदी हाकेवर, किल्य्याच्या दिशेने चालू लागलो तर दोन मिनिटांचा रस्ता.

आत्याच्या घरी पोचताच सगळ्यांना आनंद झाला. घरी आत्या, तिचे यजमान - अण्णा, माझे दोन आतेभाउ, व आतेबहीण असे सर्वजण घरी होते. सगळा प्रकार सांगितल्यावर आत्या म्हणाली, बरे झाले गाड्या बंद पडल्या! एरवी बोलावून तू येत नाहीस आज बरा आला आहेस, तर आरामात राहा, गप्पा मारत झोप आणि सकाळी घरी जा. घरी दूरध्वनीद्वारे निरोप दिल्याने घरच्यानाही चिंता नव्हती. आत्या म्हणाली, चल तुला आवडतात तर आज मस्त कांदाभजी करून घालते. "आई, तो एक आचरट आणि तूही त्याच्या नादी लागून भजी कसली कसली करतेस? चांगली जेवायची वेळ आहे, व्यवस्थित जेवायला काय झाल?" माझ्या रोखाने पाहत माझी शिस्तप्रिय ताई डाफरली. आता आत्या मला लहानपणापसून ओळखत होती. मला सरळ पानावर बसून जेवण्यापेक्षा इकडे तिकडे खायला अधिक आवडत हे तिला बरोबर माहित होत. माझ्या तोंडातून फक्त लाळ ट्पकायची बाकी होती. आत्याच्या घरी शीतकपाटांत घट्ट दह्याच पातेल असणारच हे मला पक्क ठाऊक होत. गरम गरम कांदाभजी, मधेच रुचिपालटाला एक मिरचीच भजं आणि बरोबर दही. खलास! या पलिकडे सुख म्हणजे ते काय? आत्याने ताइला ठणकावून सांगितले, 'तो आता एक दिवस कधी नाही तो आलाय, त्याला शिस्त वगरे भाषण देउ नकोस, ती त्याचे आई-बाबा घरी लावतील, आपण फक्त लाड करायचे'.

मी विजयी मुद्रेने आत्याच्या मागोमाग स्वयंपाक घरात गेलो. बघता बघता आत्याने गरमागरम भज्यांचा घाणा काढला. मग काय? ती तळत्ये नी आम्ही खातोय. मग मात्र आत्याने तंबी दिली, 'खायची तितकी खा पण एक घास भाताला पोटात जागा ठेव. घासभर दहिभात खा नाहीतर नुसत्या भज्यांनी पोटात आग पडेल. गप्पा, भावंड आणि भजी अशी जी काही मैफल जमली की खाणं संपून कधी आडवे झालो ते समजलेच नाही.

आत्याला जाउन आज बराच काळ लोटलाय. भजी आधीही खाल्ली होती, आताही अनेकदा खातो, पण त्या कांदाभज्यांची आठवण आजही ताजी आहे. अशी भजी कधी झाली नव्हती आणि होणारही नाहीत.