टोर्टिया वापरून सामोसे

  • ५-७ बटाटे
  • गाजर, शावणघेवडा, मटार, काजु, बेदाणे
  • धने, जिरे, मिरे पुडी, तिखट, मीठ, साखर ई.
  • तेल
  • चटण्या
४५ मिनिटे
१०

अनुताईंच्या पूर्वीच्या उत्तेजनाने इकडे (अमेरिकेमध्ये, विशेषतः पश्चिम भागात) मिळणार्‍या टोर्टिया वापरून करता येणार्‍या सामोशांची कृती देत आहे.  माझी सुगरण पत्नी करते ते मी पाहतो तशी देत आहे.

प्रथम टोर्टिया हा काय प्रकार आहे ते (माझ्यापरीने) सांगतो. इथे अन्न/खाद्य पदार्थामध्ये मेक्सिकन प्रकार खूप प्रचलीत आहेत. त्यातले उपहारगृहा मध्ये मिळणारे मुख्य प्रकार म्हणजे बरीटो, टाको, फहिटा, टोस्ताडा आणि एनशिलाडा. याबद्दल माहिती कोणाला हवी असेल तर ती नंतर वेगळी देईन.

[वेदश्रीसारखं फटाफट लिहिता आलं असतं तर इथेच ह्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या खाण्यावरच जाम लिहिता आले असते]

टोर्टिया ह्या मक्याच्या आणि मैद्याच्या अशा दोन प्रकारच्या असतात.  त्या इथे प्लास्टिकच्या पिशवीत तयार मिळतात.  आपल्या हिशोबाने त्या कच्च्या असतात.  पण त्यामुळेच त्या सामोसे, आणि द.ब.पुरीसाठी वापरता येतात.  नुसत्या पोळ्या म्हणूनसुद्धा आम्ही वापरतो क्वचित, पण आणखी भाजून घ्याव्या लागतात.  शिवाय गरम केल्याबरोबर त्या खायला लागतात नाहीतर अतिशय चिवट होतात. असो इति टोर्टिया पुराण !

बटाटे उकडून घ्यावेत.  सोलून ते कुस्करावे.  किसलेले गाजर, श्रावणघेवड्याच्या शेंगाचे बारिक तुकडे आणि मटार हे अतिसूक्ष्म लहरीवर मध्यम शिजवून घ्यावे. बटाटे व बाकिच्या भाज्या एकत्र कराव्या त्यांत तिखट, मीठ, (हवी असल्यास साखर घालावी. त्यात हवे असतील काजू आणि बेदाणे पण घालावे. धने, जिरे, मिरपूड आवडी प्रमाणे घालावे.  आम्ही इथल्या भारतीय दुकानात मिळणारा "मंगल" छापाचा सामोसे/कचोरी मसाला वापरतो, त्याने फार चविष्ट होतात ते सामोसे.

वर वर्णन केलेल्या टोर्टिया वापरायची कृति: एका वेळेला एक टोर्टिया अतिसूक्ष्म लहरीवर फक्त २० सेकंद गरम करायची.  तिचे मधोमध दोन तुकडे करायचे.  एका वाटीमध्ये थोडा मैदा पाण्यात भिजवून पातळ पेस्ट करायची.   अर्धगोल टोर्टिया हातात घेऊन नरसाळ्यासारखा आकार करून त्यात बटाटा/भाजीचे सारण भरायचे.त्याच्या कडांना मैद्याच्या पेस्टचा हात लावून त्रिकोणी सामोसे बंद करायचे.  असे सर्व तयार करून झाल्यावर ते कढईमध्ये खरपूस तळायचे.

याच्या बरोबर टोमॅटोची तयार चटणी (केचप), पुदिन्याचि चटणी किंवा चिंच गुळाची गोड चटणी यापैकि जी किंवा जितक्या आवडतील त्या सामोषाची लज्जत आणखी वाढवतात.

मनोगतींनो पहा करून आणि सांगा कसे वाटते ते.

(खादाड) सुभाष

नाहीत.