मी कवी नाही

मी कवी नाही जरी, हे सुंदरी, सांगू तुला?
पाहिले तुजला नि येऊ लागली कविता मला
मी नसे अनुरक्त; परि हे सुंदरी, सांगू तुला?
पाहता तुजला मला अनुराग येऊ लागला
मी कवी नाही ...

प्रेम हा जरि शब्द होता खूप वेळा ऐकला;
प्रेम असते काय त्याचा थांग लागेना मला
पार गुंतत चाललो होतो जणू गुंत्यामधे
राहिलो वैऱ्यापरी फटकून मी मित्रांमधे
मी नसे वैरी जरी, हे सुंदरी, सांगू तुला?
पाहिले तुजला नि येऊ लागली मैत्री मला
मी कवी नाही ...

वाटते, मागायचे म्हटले जरी देवाकडे,
हात जोडुन मागणे ते काय मागू त्याकडे?
हे तुझ्यावर प्रेम मी करतोय जेव्हापासुनी
वाटते की अर्चना करतोय तेव्हापासुनी
मी नसे अश्रद्ध; परि हे सुंदरी, सांगू तुला?
पाहिले तुजला नि येऊ लागली श्रद्धा मला
मी कवी नाही ...

---------------

१ : येणे ह्याचा अर्थ जमणे किंवा करता येणे असा न घेता, निर्माण होणे, जन्म घेणे, सुरवात होणे असा घ्यावा. (उदा. वेलीला फुले येणे, बायकोला राग येणे, नळाला पाणी येणे वगैरे)

विनंती:

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखावे.

२. उत्तरे व्यनि ने न पाठवता येथेच लिहावीत.

३. प्रशासकांना विनंती: कृपया बरीच उत्तरे जमली की प्रसिद्ध करावीत. (नाहीतर एकमेकांची बघून लिहितील )