गुढीपाडवा आणि चिंगीची दोस्त मंडळी
"विनी द पू, चल ना, लवकर ऊठ "
घाईघाईने पिगलेटने विनी द पू च्या दारावर थापा मारत म्हटले .
"काय आहे? कशाकरता मला उठवतो आहेस रे?"' पू ने नेहमीप्रमाणे झोपाळल्या आवाजात उत्तर दिले. लगेच त्याने अंगावर मऊ दुलई ओढून घेतली"
"आपल्याला छोट्या चिंगीकडे जायचे आहे ना?" पिगलेटने आणखीनच मोठ्याने विचारले.
"टिगर पण येईलच" पिगलेट असे म्हणत होता तोवर टिगर उड्या मारत आलाच.
चिंगी! विसरलोच की मी!
पू आता खडबडून जागा झाला होता. त्याला अणि त्याच्या काही मित्रांना आज गुढीपाडव्या निमित्त्य चिंगीकडे जायचे होते.
($$)विनी द पू, कांगारू रू, वाघोबा टिगर आणि पिगलेट सगळेजण मग चिंगीकडे निघाले.
विनी द पू नेहमी प्रमाणे हातात मधाची मोठी बरणी घेऊन निघाला होता.
"मला भूक लागली आहे" असे म्हणून विनि द पू ने मध खाण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्वजण हसू लागले. " विनी द पू, चिंगीकडे जेवायच आहे ना? मग पोटात थोडी जागा ठेव बर का" वाघोबाने उड्या मारत मारत विनी द पू ला सांगितले.
सर्वजण चिंगीच्या दारात आले.
टिगर वाघोबाने दारावरची घंटी वाजवली. चिंगीच्या दारावर एक छान तोरण लावले होते. घरापुढील अंगणात रंगबेरंगी चित्र काढले होते.
चिंगीने दार उघडले तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघतच राहिले. कारण तिने नेहमीचा फ्रॉक न घालता आज वेगळाच ड्रेस घातला होता.
"चिंगी तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा" सगळ्यांनी एका सुरात चिंगीला शुभेच्छा दिल्या.
विनी द पू पुढे होऊन चिंगीच्या ड्रेसला हात लावू लागला.
" ह्या ड्रेसला परकर पोलके म्हणतात" चिंगीने सांगितले. सगळ्यांना आपला ड्रेस आवडला आहे याचा तिला आनंद झाला होता.
"माझ्याकडे पण अशाप्रकारचा छान छान लाल रंगाचा ड्रेस आहे"चिंगीची मैत्रीण युलीन म्हणाली.
त्यादरम्यान टिगरचे लक्ष दाराजवळ उभारलेल्या गुढीकडे आणि अंगणातील रंगीत चित्राकडे गेले होते. उड्या मारून तो त्याभोवतीच्या गाठ्यांची माळ काढण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्यापाठोपाठ चिमुकला रू सुद्धा होताच.
" ते काय आहे? " चिमुकल्या कांगारूने विचारले. तेवढ्यात सगळ्यांचेच लक्ष दारातल्या गुढीने वेधले होते.
" तिला गुढी म्हणतात" चिंगीच्या आईने गुढीकडे बघत सांगितले. सगळेजण गुढीभोवती असणारी फुलांची माळ, पाने, कलश व नवीन कापड ह्याकडे उत्सुकतेने पाहत होते. चिंगीची आई त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती.
"गुढीपाडवा हा आमचा नव्या वर्षाचा पहिला दिवस" आईने सांगितले.
"म्हणजे एक जानेवारीसारखा?" रूने चटकन विचारले.
" हो, अगदी बरोबर" चिंगी म्हणाली.
" आमच्या वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते" आईने पुढे सांगितले.
"आम्ही आज सकाळी लवकर उठलो, तयार झालो. " चिंगी सांगू लागली.
"आईने अंगणात जे रंगीत चित्र काढले आहे ना, त्याला रांगोळी म्हणतात"
"टिगर आणि रू तुम्ही उड्या मारतांना त्यापासून जरा दूर राहा बर का, नाही तर सगळी रांगोळी पुसून जाईल"
चिंगीने आपल्या मित्रांना आधीच कल्पना दिली. त्याबरोबर टिगर आणि रू जरा सावरून आणि रांगोळीपासून दूरच उभे राहिले.
चिंगीच्या आईने त्यांना गाठ्या दिल्या. कांगारू रू, विनी द पू आणि युलीन आनंदाने गाठ्या खाऊ लागले. दारावरची घंटी पुन्हा वाजली. चिंगीने दार उघडले. तिच्या आई वडीलांचे मित्र दूरच्या गावाहून आले होते. त्यांचा मुलगा चिंटू हा चिंगीच्याच वयाचा होता. त्या सर्वांनी सुद्धा चिंगीला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
काही दिवसापूर्वी असेच एकत्र जमून दोस्त मंडळींनी युलीनच्या घरी 'चिनी नवीन वर्ष' साजरे केले होते त्याची त्या सर्वांना आठवण झाली.
तेवढ्यात चिंगीची शेजारच्या घरात राहणारी मैत्रीण ऍलिसन आली. जेवणाची वेळ झाली होती. सर्वांनी मग श्रीखंड आणि पुरी खाल्ली. वेगळ्याच फ्लेवरचे योगर्ट आणि फुगलेला टॉर्टिया मुलांना आवडला. हाताने जेवायला पू आणि रू ला गंमत वाटत होती. चिंगी त्यांना पुरी कशी धरायची आणि श्रीखंड लावून कशी खायची ते दाखवत होती.
जेवता जेवता छोट्या रूने बोटाने नुसते श्रीखंड खायला सुरुवात केली होती. त्याच्या गालावर बऱ्याच ठिकाणी श्रीखंड लागले होते. ते पाहून सगळ्यांना आणखीनच गंमत वाटली.
चिंटूच्या आईने पुरणपोळी करून आणली होती. ती विनी द पू ला खूप आवडली. साखर मध आणि तसेच आणखी काही गोड पदार्थ पाहून तो खूप खूष दिसत होता.
त्याशिवाय चिंगीच्या आईने त्यांच्या करता पिझ्झा सुद्धा केला होता. त्यामुळे मुले आणखीनच खूष झाली.
दुपारी सर्वजण चेंडू खेळले. बाहेर अजूनही थोडी थंडी होती त्यामुळे ते सर्व थोड्यावेळातच घरात आले. त्यानंतर छोट्या रू ला लपाछपी खेळायची होती. तळघरात लपाछपीचा खेळ खेळताना त्या सर्वांना खूपच मजा आली. बाहेर अजूनही थोडी थंडी होती त्यामुळे ते सर्व बराच वेळ घरातच होते.
खेळून सर्वजण दमले होते. विनी द पू आणि कांगारू रू ने भूक लागली असे म्हणून उड्या मारायला सुरुवात केली. "आम्हाला भूक लागली आहे" असे म्हणत सगळेजण स्वयंपाकघरात गोळा झाले.
चिंगीच्या आईला याची कल्पना होतीच, त्यामुळे ती तयारीतच होती. तिने मुलांकरता चिवडा केला होता. चिंगीने टीव्हीवर हनुमान नावाचा सिनेमा लावला. सगळ्यांना हनुमान बघून गंमत वाटत होती, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता चिंगीला वेळ कसा गेला समजले नाही. चिवडा आणि भारतीय पार्ले जी बिस्किटे खाऊन पू, टिगर आणि रू आपल्या घरी गेले. पिगलेटला आणखी बराच वेळ थांबायचे होते.
"मी इथेच राहणार आहे" पिगलेटने रडक्या आवजात सांगितले.
" आपण पुन्हा पुढच्या रविवारी खेळायला भेटूया" चिंगीच्या बाबांनी त्याची समजूत काढली, पुन्हा यायचे ठरवून तो मग आपल्या घरी परत गेला.
आलिसन, चिंटू आणि त्याचे आई बाबा संध्याकाळी परत गेले. चिंगीला घरात आता एकटे वाटू लागले होते. दिवसभर खूप दंगामस्ती करून ती दमली होती. जेवत असतांना आईने "उद्या शाळेत जायचे आहे "याची तिला आठवण करून दिली.
"आई आता केव्हा येतील सर्वजण आपल्याकडे?" झोपताना चिंगीचे प्रश्न सुरुच होते. पुढच्या रविवारी पुन्हा सगळ्यांनी खेळायला जमायचे ह्या विचाराने तिला थोडे बरे वाटले.
गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय काय केले ते रात्री झोपतांना चिंगी आठवत होती. शाळेतल्या सर्व मित्र मैत्रिणींना नव्या वर्षाचे स्वागत कसे केले ते कधी सांगतो असे तिला झाले होते. त्या विचारात ती गाढ झोपली.
($$)या कथेतील बरीच दोस्त मंडळी त्यांच्या मूळ कथेतील आहेत, भारताबाहेर राहणाऱ्या मराठी मुलांना आपले सण अशाप्रकारे त्यांना ओळखीच्या चित्रातून व गोष्टीतून चटकन समजतात असा अनुभव आहे त्यामुळे मुद्दाम तीच दोस्त मंडळी घेतली आहेत.