आमची प्रेरणा अदितीताईंची कविता पिंगा
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे 
वाटेवर घालतेय पिंगा जसे
चिंचेच्या झाडावर पिंपळाच्या पारी
उलट्या पायाच्या भुताची स्वारी
रानात चालला सावल्यांचा खेळ
भुताच्या मिशीला लावलय तेल
फेंदारल्या मिशांनी भुतोबा हसे...
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
पल्याडच्या झाडावर समंध खुळा
माडांच्या पोरीला घालतोय डोळा
चांदणं रातीला सांभाळा जरा
अडव्या वाटेचा अडवा वारा
झावळ्याच्या झोक्यात भामटा बसे
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
माडांनी वाऱ्याशी धरला फेर
लाटांनी काठाला मांडले थेर
अवस रातीला भरती भारी
झिंगून रंगून मातली स्वारी 
उलट्या पायचे उलटे ठसे
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
--केशवसुमार
(२२.३.२००७
चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९२९)