मृत्युशय्येवर होम्स- भाग २

यापूर्वी वाचा: मृत्यूशय्येवर होम्स- भाग १
'एक मित्र म्हणून माझा तुझ्यावर विश्वास नक्की आहे वॅटसन, पण कटू सत्य सांगायचं झालं तर तू एक अतिसामान्य आणि अननुभवी डॉक्टर आहेस.'
मी या वाक्याने जबरदस्त दुखावला गेलो. होम्स आता खरोखरच पूर्वीचा होम्स राहिला नव्हता..
(पुढे वाचा.)

'तुझ्याकडून या अशा विधानाची अपेक्षा नव्हती, होम्स.आतातर माझी खात्री झाली आहे की तू शुद्धीवर नाहीस. असो. तुला इच्छा नसेल तर मी स्वत:ला तुझ्यावर लादणार नाही. मी नको असेन तर मी डॉक्टर जास्पर मीक किंवा पेनरोझ किंग किंवा एखाद्या लंडनमधल्या नामांकित डॉक्टरला आणतो.पण तुला कोणाकडून तरी उपचार घ्यावेच लागतील. तुला काय वाटतं, मी इथे गप्प उभा राहून कोणालाही न आणता माझ्या प्रिय मित्राला असा मरू देईन?' मी म्हणालो.
होम्स कण्हत म्हणाला, 'मला माहीत आहे वॅटसन, तुझा हेतू चांगला आहे. पण तुझ्या सीमित ज्ञानाबद्दल मला का बोलायला लावतोयस?तुला काहीच माहिती नाही. सांग बरं, 'तापानुली फिव्हर' म्हणजे काय?'ब्लॅक फॉर्मोसा करप्शन' कशाने होते?'

'ही नावं मी पहिल्यांदाच ऐकतो आहे.' मी कबूल केलं.
'पौर्वात्य देशांमध्ये असे अनेक अगम्य आजार आहेत.' होम्सला बोलवत नव्हते तरी तो थांबत थांबत बोलत होता, 'मी गेल्या केसमध्ये या रोगांच्या संदर्भात बरंच काही शिकलो आहे. आणि याच्यादरम्यान मला या रोगाची लागण झाली आहे.आता सगळं हाताबाहेर गेलं आहे.'
'ठीक आहे. माझ्या हाताबाहेर असेल. पण मग मी डॉक्टर आइन्स्ट्रींना आणतो.उष्ण कटीबंधीय आजारांबाबत त्यांच्याइतका माहितगार डॉक्टर दुसरा कोणीच नाही.' मी दाराकडे वळलो. 
क्षमस्व. अडचण तांत्रिक असल्याने चित्र दिसत नाही.तत्क्षणी होम्सने सर्व शक्ती एकवटून दाराकडे झेप घेतली आणि दाराला आतून कुलूप लावलं.मी इतका आश्चर्यचकित कधीच झालो नव्हतो. होम्समध्ये इतकं बळ कसं आलं काय माहिती! दुसऱ्याच क्षणी तो धापा टाकत आणि अतिथकव्याने पलंगावर जाऊन पडला. 
'वॅटसन, खोलीची चावी माझ्याकडे आहे.आणि तू ती माझ्याकडून घेऊ शकत नाहीस. माझ्या मर्जीशिवाय तू आता इथून बाहेर जाऊ शकत नाहीस!' होम्सला खूप धाप लागत होती तरी तो बोलतच होता. 'मला माहीत आहे तू चांगल्या हेतूनेच हे सर्व करतोयस, मी तुला जाऊ देईन पण मला आधी थोडं स्थिरस्थावर होऊ दे. तुला मी जाऊ देईन, पण अजून दोन तासांनी.आता चार वाजले आहेत. सहाला तू जाऊ शकतोस.'
'होम्स, हा शुद्ध वेडेपणा आहे.'
'फक्त दोन तास, वॅटसन.तू वाट पाहशील ना?'
'मला दुसरा पर्यायच नाही.' मी वैतागून म्हणालो.
'पर्याय नाहीच! थांब, जवळ येऊ नकोस. चादर माझी मी व्यवस्थित करतो. आणि हो, माझी अजून एक अट आहे. तू डॉक्टरला आणशील, पण तुझ्या मताने नाही. मी सांगेन त्याच माणसाला तू आणलं पाहिजेस.'
'ठीक आहे.' मी म्हणालो.

'आता कसं शहाण्यासारखं बोललास!ती तिथे पुस्तकं आहेत, तुला मागली तर वाच.मी खूप दमलो आहे.एखाद्या बॅटरीतून लाकडात वीज वाहताना बॅटरीला असंच वाटत असेल.ठीक आहे वॅटसन, आपण सहा वाजता बोलू.'
पण सहा वाजेपर्यंत संभाषण थांबवण्याची वेळच आली नाही. मी पलंगावर पडलेल्या माझ्या असहाय मित्राकडे बघत होतो. बहुधा त्याला झोप लागली असावी. अशावेळी वाचनात माझं कसं मन लागणार? म्हणून मी खोलीत फिरत होतो. फिरता फिरता तंद्रीतच मी शेकोटीपाशी आलो. शेकोटीच्या चौकटीवर  बऱ्याच वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. होम्सचा पाइप, पिस्तुलाच्या गोळ्यांची आवरणं,तंबाखू,इंजेक्शनच्या सुया आणि अशा अनेक असंबद्ध वस्तू तिथे विखुरल्या होत्या. अचानक मला ती छोटी डबी दिसली. सुबक,पांढऱ्या काळ्या नक्षीची आणि सरकत्या झाकणाची. मी हात पुढे करून ती डबी उचलली आणि..

क्षमस्व.अडचण तांत्रिक असल्याने हे चित्र दिसू शकत नाही.'त्या डबीला हात लावू नकोस!आत्ताच्या आत्ता खाली ठेव ती!'
होम्स जोरात ओरडला.तो इतक्या जोरात ओरडला की माझ्या अंगावर शहारे आले.मी वळलो आणि होम्सचा चेहरा आणि डोळ्यातले भाव पाहून दचकलो. मी ती डबी खाली ठेवलेली पाहून होम्सने सुटकेचा निःश्वास सोडला.
'मला माझ्या वस्तूंना कोणी हात लावलेला आवडत नाही.तुला माहीत आहे तरी तू असं करतोस.तुझ्यासारखा असह्य माणूस मी आजवर पाहिला नाही.आता स्वस्थ बस आणि मला विश्रांती घेऊ दे!'

त्याची ती वाक्यं आणि आविर्भाव मी कधीच विसरणार नाही. त्याचे ते हिंस्र भाव, क्रूर बोलणं.. होम्स खरंच पूर्वीचा होम्स राहिला नव्हता. हा त्याच्यातला भयंकर बदल मला बघवत नव्हता. मी सहा वाजायची वाट पाहत स्वस्थ बसून राहिलो. होम्सचंही घड्याळाकडे लक्ष असावं बहुतेक, सहा वाजायच्या थोडं आधी तो परत धापा टाकत बोलायला लागला.
'वॅटसन, तुझ्या खिशात सुट्टे पैसे आहेत का?'
'हो.का?'
'आठ आणे आहेत?'
'हो.'
'एक रुपया आहे?किती नाणी आहेत?'
'पाच.'
'अरेरे!!फारच कमी आहेत. जाऊदे. वॅटसन, ती सर्व नाणी तुझ्या शर्टाच्या खिशात ठेव.आणि बाकी सर्व सुट्टे पॅण्टच्या डाव्या खिशात. हं, आत्ता कसं?आता चांगला समतोल झाला.'

होम्स खरंच भ्रमिष्ट झाला होता. तो परत खोकत खोकत म्हणाला,
'आता गॅसबत्ती पेटव, पण पूर्ण नाही. बरोब्बर अर्धी पेटव. नाही,पडदे लावू नकोस.आता त्या साखरेच्या चिमट्याने ती डबी उचल आणि इथे माझ्याजवळ कागदपत्रांत ठेव. हं, आता तू जाऊन १३ ब्युर्क स्ट्रीटला राहणाऱ्या श्री कल्व्हर्टन स्मिथना बोलावू शकतोस.'
खरं तर माझा डॉक्टरना बोलावून आणण्याचा उत्साह बऱ्यापैकी गळून पडला होता. होम्स भ्रमिष्ट झाला होता आणि मला त्याचा शेवटचा क्षण जवळ आलेला दिसत होता.या अवस्थेत त्याला सोडून जाणं मला पटत नव्हतं. पण आता होम्स ऐकायला तयार नव्हता.

यानंतर:      मृत्यूशय्येवर होम्स- भाग ३