मृत्युशय्येवर होम्स- भाग ४

यापूर्वी: मृत्यूशय्येवर होम्स: भाग ३
'दुसरा काही पर्याय नाही, मित्रा. आणि या खोलीत लपायला जास्त जागाच नसल्याने त्याला संशयाला विशेष जागा नाही.पण एक लक्षात ठेव वॅटसन, काहीही झालं, नीट ऐक, अगदी काहीही झालं तरी तू तिथून बाहेर येणार नाहीस. लवकर लप! तो बघ, गाडीचा आवाज येतो आहे.'

मी नाईलाजाने पलंगामागे लपलो.. होम्सची अवस्था आता परत भ्रमिष्टासारखी झाली होती. तो काहीतरी बरळत होता..(पुढे वाचा..)

माझ्या लपण्याच्या जागेवरून मी काही पाहू शकत नव्हतो, पण मला दार उघडल्याचा आणि बंद केल्याचा आवाज आला. बऱ्याच वेळ सर्व शांत होतं. मला वाटलं की आलेला मनुष्य नुसता उभा राहून होम्सचे निरीक्षण करत होता.
आता स्मिथ झोपलेल्याला जबरदस्ती जागे करावे तसा होम्सशी बोलत होता. 'होम्स, होम्स! तुला ऐकू येतंय का?' कपड्यांची सळसळ ऐकू आली. बहुतेक तो आजारी होम्सला खांदे धरून धसमुसळेपणाने गदागदा हालवत होता. 'होम्स! ऊठ होम्स!'

'कोण स्मिथ का?मला वाटलं नव्हतं की तुम्ही याल.' होम्स क्षीण आवाजात पुटपुटला.
स्मिथ हसायला लागला.
'मलापण वाटलं नव्हतं मी येईन, पण बघ, मी आलो आहे!!'
'मी तुमचा आभारी आहे..तुमचेच या विषयात चांगले ज्ञान आहे.' होम्स म्हणाला.
स्मिथ हसू दाबत होता.
'खरंच. तू एकटाच आहेस पूर्ण लंडनमध्ये, ज्याला माझ्या ज्ञानाबद्दल इतकी माहिती आहे. तुला माहिती आहे का होम्स, तुला काय झालंय?'
'तेच.' होम्स म्हणाला.
'म्हणजे तुला त्या आजाराची लक्षणं ओळखू आली म्हणायचं तर?'
'चांगलीच.'
'भले! अर्थातच मला याचं आश्चर्य वाटणार नाही. खरंच तुझं आता कठीण आहे. बिच्चारा व्हिक्टर आजारी पडल्याच्या चौथ्या दिवशी मेलेला होता..व्हिक्टरसारखा धडधाकट तगडा जवान. म्हणजे बघ. कमाल आहे ना, एक विचित्र आजार, तोही आपल्या पाश्चिमात्य देशात पाहायला न मिळणारा, तो बरोबर व्हिक्टरलाच व्हावा? आणि तो पण असा रोग, ज्याच्यावर माझं संशोधन चालू आहे? खरंच दुर्मिळ योगायोग आहे. पण तू मला त्याच्या मृत्यूचं कारण मानायला नको होतं होम्स.'
'मला माहिती होतं तूच त्याच्या मृत्यूचं कारण आहेस ते.'
'ह्म्म..बरोबर. पण तुझ्याकडे त्याचा काहीच पुरावा नाही. तेव्हा मारे माझ्याबद्दल तशा अफवा पसरवल्यास की मी माझ्या पुतण्याचा खून केला, आणि आता मात्र माझ्याकडेच मदतीची भीक मागतोस? हे असं वागणं शोभतं का तुला?' स्मिथ म्हणाला.

मी होम्सचं तडफडणं, धापा टाकणं ऐकलं. 'पाणी! पाणी!' तो पुटपुटत होता.
'माझं बोलणं पूर्ण ऐकून घेत नाहीस तोपर्यंत तुला मरूपण देणार नाही मी! हे घे पाणी. तुला कळतं आहे का मी काय म्हणतोय ते?' स्मिथ बोलत होता.
होम्स कण्हला.
'आता झाल्यागेल्या गोष्टी विसरून जाऊया. मला बरं कर..मी वचन देतो की मी सगळं विसरून जाईन. काहीच बोलणार नाही.मला बरं कर!' होम्स म्हणाला.
'काय विसरशील म्हणालास?' स्मिथने विचारलं.
'व्हिक्टरच्या मृत्यूबद्दल. तू तुझ्या तोंडाने जवळजवळ कबूल केलंस आता की ते तुझं काम आहे. मला बरं कर, मी ते विसरून जाईन.'
'हाहा! तुला जे करायचं ते कर. लक्षात ठेव किंवा विसर. मला नाही वाटत तू कधी साक्ष द्यायला विटनेस बॉक्समध्ये येऊ शकशील! हां, शवपेटीत निश्चित जाशील! माझ्या पुतण्याचा मृत्यू कसा झाला हे तुला कळलं काय, न कळलं काय, आता मला काहीच फरक पडत नाही!'
'ह्म्म..'
'तो कोण तो तुझा माणूस माझ्याकडे आला होता..तो म्हणाला की तुला इस्ट एंडला खलाश्यांच्या संपर्कात आल्याने हा रोग झाला.' स्मिथ म्हणाला.
'हो. दुसरं काही कारण मलातरी दिसत नाही.'
'तू स्वतःला मोठा हुशार समजतोस ना होम्स? तुला तुझ्या हुशारीचा खूप अभिमान आहे म्हणे..इथे मात्र तुला तुझ्यापेक्षा सवाई माणूस  भेटलाय. नीट विचार कर, आठवून सांग होम्स, तुला खरंच दुसरं काहीच कारण दिसत नाही??'
'मला माहिती नाही..मला.मला काहीच सुचत नाही! मला मदत कर!'
'ठीक आहे. मी तुला आठवायला मदत करतो. तू मरण्याआधी तू का आणि कसा मेलास ते तुला कळायलाच हवं!!'
'मला खूप वेदना होतायत!! मला काहीतरी दे!!'
'हेच, अगदी हेच वाक्य बोलायचे हा रोग झालेले हमाल मरताना! तुला अंगातून चमका येत असतील ना आता?' स्मिथ म्हणाला.
'हो..माझ्या अंगातून चमक येते.'
'ऐक!! ही सर्व लक्षणं सुरू होण्याआधी काही वेगळी घटना तुला जाणवली का?'
'काहीच नाही..'
'नीट विचार कर.'
'मी..मी विचार करायच्या स्थितीत नाही..' होम्स म्हणाला.
'नीट आठव! पोस्टाने काहीतरी आलं होतं का?
'पोस्टाने??'
'एखादी छोटी डबी आली होती का?'
'माझी शुद्ध जाते आहे..मी मरणार..'
'होम्स! नीट ऐक!!' स्मिथ बहुधा परत माझ्या मरणोन्मुख मित्राला गदागदा हालवत होता. पण मी गप्प लपून पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो.
'नीट ऐक!!तुला ऐकावंच लागेल! आठव, एक काळीपांढरी डबी तुझ्याकडे बुधवारी पोस्टाने आली होती.'

'हो! बरोबर. त्या डबीला अणकुचीदार स्प्रिंग होती. डबी उघडल्यावर हातातून रक्त आलं..कोणीतरी थट्टा...' होम्स पुटपुटला.
'ह्म्म..थट्टा..आणि या थट्टेची किंमत तुझं आयुष्य! तुला माझ्या वाटेला जायला सांगितलं होतं कोणी?तू गप्प बसला असतास तर तुला हे सर्व झालं नसतं!'
'हो, मला आठवलं. हीच ती टेबलावरची डबी!' होम्स म्हणाला. 
'हो हो, हीच ती! आणि आता हा एकमेव पुरावा माझ्या खिशातून या खोलीबाहेर जाईल! ऐक होम्स! मरता मरता ऐकून जा की मीच तुला मारलं! माझ्या पुतण्याच्या मृत्यूबद्दल तू बरीच माहिती मिळवली होतीस, म्हणून मी तुलापण त्याच्याच वाटे पाठवलं! आणि आता मी असा इथे बसून तुला मरताना पाहणार आहे..' स्मिथ म्हणाला.

होम्स अगदी क्षीण आवाजात काहीतरी पुटपुटला. 'काय? गॅसबत्ती वाढवू? ठीक आहे. वाढवतो. म्हणजे मीपण तुला मरताना व्यवस्थित पाहू शकेन. आणखी काही सेवा करू शकतो तुझी?' स्मिथ पलीकडे जाऊन गॅसबत्ती मोठी करून आला..
'सिगरेट आणि काडेपेटी दे.' होम्स म्हणाला.
मी आनंदाने जवळजवळ किंचाळणारच होतो. होम्सचा पूर्वीचा आवाज परत आला होता. थोडा क्षीण, पण हा माझ्या प्रिय मित्राचाच नेहमीचा आवाज होता! स्मिथ जरा आश्चर्यानेच होम्सकडे पाहू लागला.
'याचा अर्थ काय, होम्स?' त्याने कोरड्या आवाजात विचारलं.

'उत्कृष्ट अभिनय! तुला सांगतो, तीन दिवस मी अन्नाचा किंवा पाण्याचा एक कण पोटात जाऊ दिला नाही. पण सिगरेटीची मात्र मला नितांत उणीव भासली.' होम्सने सिगरेट शिलगावली. 'ह्म्म! आता बरं वाटतंय! अरेच्च्या, हा पायांचा आवाज कुठला? मित्रा, तू आहेस का?' 
दार उघडलं आणि इन्स्पेक्टर मॉर्टन आत आला.
'हा तुमचा माणूस. ताब्यात घ्या याला.'
मॉर्टनने स्मिथला नेहमीच्या कैद्यांना अटकपूर्व देतात त्या सूचना दिल्या.
'मी तुम्हाला व्हिक्टर सॅव्हेजच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करत आहे.' मॉर्टन म्हणाला.
'अरे हो! 'शेरलॉक होम्सच्या खुनाचा प्रयत्न' हा आरोप पण घ्या बरं, मॉर्टन!' होम्स म्हणाला. 'आपल्याला स्मिथचे आभार मानले पाहिजेत. त्याने गॅसबत्ती मोठी करून तुम्हाला आपला ठरलेला इशारा दिला. आणि हो, त्याच्या उजव्या खिशात एक डबी आहे ती काढा‍. जपून! हां, आता ती इथे ठेवा. तो एक महत्त्वाचा पुरावा आहे.'

अडचण तांत्रिक असल्याने हे चित्र दिसू  शकत नाही.स्मिथने पळून जायचा प्रयत्न केला पण त्याला लगेच बेडी घातली गेली. 'जास्त धडपड करशील तर स्वतःलाच इजा करून घेशील! गप्प बस!' मॉर्टन म्हणाला.
स्मिथ गुरगुरला. 'हा माणूस खोटं बोलतो आहे. याने मला इथे त्याचा आजार बरा करण्यासाठी बोलावलं. याच्यावर दया म्हणून मी आलो. आणि आता हा त्याच्या बिघडलेल्या डोक्यातून काहीतरी कल्पना काढून मला अडकवायला बघतो आहे! होम्स, कोर्टात माझ्या शब्दालाही किंमत असेल,लक्षात ठेव.'
'अरे हो! वॅटसन, माफ कर, मी विसरलोच होतो! आता तू तुझ्या लपण्याच्या जागेतून बाहेर येऊ शकतोस! आपल्या पोलीस चौकीत जावं लागेल.'

होम्स कपडे करता करता दूध आणि बिस्किटे खात होता. 'मला याची खूप गरज होती..पण तुला तर माहितीच आहे माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी किती अनियमित आहेत ते. त्याच्यामुळे मला खूप त्रास नाही झाला. मला हडसनला माझ्या आजारपणाचं गांभीर्य पटवणं आणि तिने तुला आणि तू स्मिथला ते पटवणं आवश्यकच होतं. तुला राग नाही ना आला, वॅटसन? कारण मला माहिती होतं, तू नीट खोटं बोलू शकणार नाहीस. तो तुझा स्वभावच नाही. तुला जर आधीच या कटाबद्दल सांगितलं असतं तर तू स्मिथला इतकं चांगलं पटवून आणूच शकला नसतास. त्याला लगेच संशय आला असता. म्हणून मला ही वातावरणनिर्मिती करावीच लागली.'

'पण मग तुझा तो भयंकर आजारी चेहरा?'
'तीन दिवसाचा उपास कोणाचाही चेहरा सुंदर बनवत नाही, वॅटसन. आणि बाकी म्हणशील तर सगळी रंगरंगोटी आहे. डोळ्यात बेलाडोना, कपाळावर व्हॅसलीन आणि ओठांवर मेण यांनी अत्यंत सुंदर मरणोन्मुख माणसाचं सोंग वठवता येतं. वेषांतर या विषयावर माझा बराच अभ्यास आहे. आणि थोडंफार शिंपल्यांवर आणि नाण्यांवर बडबडून भ्रमिष्टाचं सोंग पण चांगलं बनलं.'

'पण मग तू मला जवळ का येऊ देत नव्हतास, होम्स?'
'प्रिय मित्रा, तुला काय वाटतं, तुझ्यासारख्या अनुभवी डॉक्टरला मी फसवू शकलो असतो? चार हात अंतरावरून माझं रूप बघून तू फसला असतास, पण इतक्या वाईट आजारी पडूनही माझ्या नाडीचे ठोके वाढले नाहीत, मला साधा तापही नाही, ही काय तुझ्यापासून लपलं असतं? नाही, थांब, त्या डबीला हात लावू नकोस. बाजूने नीट पाहिलंस तर डबी उघडल्यावर एक तीक्ष्ण स्प्रिंग बाहेर येऊन हाताला लागते आणि रक्त येतं. या सुईतूनच रोगाच्या जिवाणूंची लागण होते. आणि व्हिक्टरचा मृत्यू अशा एखाद्या कॢप्तीने झालेला आहे. पण मी माझ्या पत्र आणि पार्सलांना काळजीपूर्वक उघडतो. त्यामुळे वाचलो. पण तो त्याच्या बेतात यशस्वी झाला असं दाखवूनच मला खरं काय ते कळलं असतं, आणि त्याने तर कबुली पण दिली! तुझे आभार मानायलाच पाहिजेत वॅटसन. चल आता पोलीसातलं काम उरकल्यावर आपल्याला सिम्सनमध्ये जाऊन काहीतरी खायला हरकत नाही.'

(अनुराधा कुलकर्णी)