मृत्युशय्येवर होम्स- भाग ३

यापूर्वी: मृत्यूशय्येवर होम्स- भाग २
खरं तर माझा डॉक्टरांना बोलावून आणण्याचा उत्साह बऱ्यापैकी गळून पडला होता. होम्स भ्रमिष्ट झाला होता आणि मला त्याचा शेवटचा क्षण जवळ आलेला दिसत होता.या अवस्थेत त्याला सोडून जाणं मला पटत नव्हतं. पण आता होम्स ऐकायला तयार नव्हता.(पुढे वाचा..)

'कदाचित तू हे नाव ऐकलं नसशील, वॅटसन. पण तुला आश्चर्य वाटेल, या रोगाबद्दल सर्वात जास्त माहिती असलेला हा इसम एक डॉक्टर नाही, तर एक माळी आहे‌. स्मिथ या सुमात्रातील एक प्रख्यात असामी आहे, आणि आता लंडनमध्ये राहतो. त्याच्या रोपांवर आलेल्या एका रोगाच्या तपासातून त्याला ही माहिती मिळाली, आणि त्याला ही माहिती मिळाल्याचे परिणाम मात्र खूप वाईट झाले.माझी इच्छा होती की तू सहानंतर जावंस, कारण मला माहीत आहे की स्मिथ हा अत्यंत वक्तशीर आणि पद्धतशीर माणूस आहे आणि सहाच्या आधी तो तुला त्याच्या घरी भेटलाच नसता. अर्थातच तू जर त्याला इथे आणू शकलास तर तो आपल्याला या रोगाबाबत चांगली मदत करू शकेल.'
मी हे पाच वाक्यात सांगतो आहे, पण होम्सला हे बोलायला पुष्कळ वेळ आणि श्रम पडले. धापा टाकत आणि चेहरा मधूनमधून वेदनेने पिळवटून तो बोलत होता. त्याचा चेहरा आता आणखी जास्तच आजाऱ्यासारखा दिसत होता. डोळे खोल गेले होते आणि कपाळावर घाम होता. अर्थात अजूनही त्याच्या बोलण्यातली जिगर अजून तीच होती.

'तो त्याला माझी खरी अवस्था जशीच्या तशी सांगशील. एक मरायला टेकलेला,भ्रमिष्ट माणूस. खरंच, सगळा समुद्र शिंपल्यांनी बनला आहे! आणि मेंदू मेंदूवर हुकुमत गाजवतो आहे! अरे, मी काय सांगत होतो वॅटसन?'
'स्मिथला आणण्याबद्दल.'
'अरे हो! स्मिथला विनवण्या करून,भीक मागून, गयावया करून, कसाही इथे आण पण नक्की आण.माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. खरंतर त्याच्यामाझ्यात चांगले संबंध नाहीत. त्याच्या पुतण्याच्या मृत्यूबद्दल माझा त्याच्यावर संशय आहे आणि त्याला हे माहीत आहे. पण तू त्याला कसंही करून इथे आण. आता फक्त तोच माझे प्राण वाचवू शकतो.'
'मी त्याला घोडागाडीतून इथे नक्की आणीन, मग भले मला त्याला खेचून आणावं लागलं तरी बेहत्तर!' मी म्हणालो.
'नाही वॅटसन, तू असं करणार नाहीस.तू त्याला समजावून यायला प्रवृत्त करशील. आणि तू त्याच्या आधी इथे पोहचशील. काहीही बहाणा बनव, पण त्याच्याआधी इथे ये.तू याची अंमलबजावणी करण्यात चुकणार नाहीस ना? तू नाही चुकणार. तू कधीच चुकला नाहीस. बापरे, सगळं जगच शिंपल्यांनी भरून जाणार आहे. कसं होणार?'

मी तिथून निघालो तेव्हा माझ्या डोळ्यासमोरून वेड्यासारखा बरळणारा होम्स हालतच नव्हता. पडवीत आलो तर हडसनबाई मूकपणे रडत होत्या. बाहेर आलो तेव्हापण होम्सचा चिरका आवाज येत होता. तो काहीतरी असंबद्ध बरळत होता. मी घोडागाडी बोलावणार तितक्यात अचानक धुक्यातून इन्स्पेक्टर मॉर्टन साध्या पोशाखात सामोरा आला.
'होम्स कसे आहेत?' त्याने विचारलं.
'ते खूपच आजारी आहेत.' मी म्हणालो.
मॉर्टनने माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं. मला त्याचा एकंदर आविर्भाव जरा निर्दय वाटला.
'हो, मी अशा अफवा ऐकल्या होत्या.' तो म्हणाला.
तेवढ्यात गाडी आली आणि मी तिच्यात बसून स्मिथकडे निघालो. 

ब्युर्क रस्त्यावर सुंदर बंगले होते. आमची गाडी एका बंगल्यासमोर थांबली. बंगला जुन्या बांधणीचा पण भव्य वाटत होता. एका गंभीर चेहऱ्याच्या खानसाम्याने दरवाजा उघडला.
'हो, स्मिथसाहेब आत आहेत. मी त्यांना बोलावतो.'
चिठ्ठीवर लिहिलेली माझी पदवी आणि नाव यांचा स्मिथ या इसमावर विशेष प्रभाव पडलेला दिसला नाही. किलकिल्या दरवाज्या आडून मी त्या दोघांचं संभाषण ऐकत होतो. स्मिथचा उंच किनरा आवाज ऐकू येत होता.
'कोण आहे तो माणूस? काय पाहिजे आहे त्याला? स्टेपल, मी तुला कितीदा सांगितलं की माझ्या कामाच्या वेळेत मला व्यत्यय नको आहे?'
खानसामा हळूच काहीतरी म्हणाला.
'नाही, मी त्याला भेटणार नाही. मला माझं काम करू दे. स्टेपल, त्याला सांग की मी घरात नाही. त्याला एवढी नड असली तर येईल सकाळी.' स्मिथ म्हणाला.
खानसामा परत काही तरी हळू आवाजात म्हणाला.
'नाही म्हटलं ना! त्याला यायचं असेल तार सकाळी येऊदे नाहीतर नको भेटूदे! माझ्या कामात अडथळा नकोय!' स्मिथ म्हणाला.

माझ्या डोळ्यासमोर असहाय पडलेला आणि शेवटचे क्षण मोजत माझ्या येण्याची वाट पाहणारा होम्स आला. आता औपचारिकतेत वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. होम्सच्या आयुष्याचा प्रश्न होता. मी बाहेर खानसाम्याला ढकलून आत घुसलो.
आत शेकोटीपाशी आरामखुर्चीत बसलेला स्मिथ उठला. पिवळट निस्तेज त्वचा, मोठा चेहरा आणि धूर्त डोळे. त्याचं डोकं एकंदर शरीराच्या मानाने इतकं मोठं होतं की मला मुडदूस झालेल्या मुलांची आठवण झाली.
'ही काय पद्धत आहे? याचा अर्थ काय? मी त्याला सांगितलं ना की मी तुम्हाला उद्या सकाळी भेटेन?' तो चिडून ओरडला.
'माफ करा, पण मामला अत्यंत गंभीर आहे. श्री शेरलॉक होम्स.....'
होम्सचं नाव ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले.
'तुम्ही होम्सकडून आलात का?'
'हो.'
'काय झालं? होम्स कसे आहेत?' 
'ते खूप आजारी आहेत. म्हणूनच मी आलो.'

स्मिथने मला खुर्ची दिली आणि तो स्वतःच्या खुर्ची कडे वळला.मला योगायोगाने त्याच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब समोर आरशात दिसलं. खरं सांगतो, त्याच्या चेहऱ्यावर दुष्ट आणि औपरोधिक हास्य चमकून गेल्यासारखं मला वाटलं. पण तो जेव्हा माझ्याकडे तोंड करून खुर्चीवर बसला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आस्था आणि काळजी होती.
'ते इतके आजारी आहेत हे ऐकून वाईट वाटलं. होम्सचा आणि माझा संपर्क काही काळच आला असला तरी त्यांच्या कौशल्याबद्दल एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. तसं म्हटलं तर आमच्यात एक साम्य आहे. ते गुन्ह्यांचा नायनाट करतात आणि मी रोगांचा. फक्त फरक इतकाच की ते खलनायकांशी लढतात आणि मी रोगांच्या जिवाणूंशी. त्या बरण्या बघताय ना तिथे , त्यांच्यात जगात साथींचा हाहा:कार माजवणारे बरेचसे जिवाणू सध्या विश्रांती घेत आहेत.'  
'तुमच्या याच विषयातल्या व्यासंगामुळे होम्सची इच्छा आहे की तुम्ही त्यांना भेटावं. त्यांचं असं मत आहे की पूर्ण लंडन शहरात एकटे तुम्हीच त्यांना या परिस्थितीत मदत करू शकता.' मी म्हणालो.
'का बरं? त्यांना माझ्याचबाबतीत असं का वाटतं?' स्मिथ म्हणाला.
'कारण तुमचं पौर्वात्य देशांतील रोगांबद्दलचं ज्ञान.'
'पण होम्सना असं का वाटतं की त्यांना झालेला रोग पौर्वात्य देशातील आहे?'
'कारण काही केससंदर्भात त्यांचा काही चिनी खलाशांशी संपर्क झाला आणि तेव्हापासूनच हा आजार जडला.' मी म्हणालो.
'अरे बापरे! पण कदाचित तो आजार इतका गंभीर नसेलही.किती दिवसापासून आजारी आहेत होम्स?' स्मिथने विचारलं.
'तीन दिवस.'
'ते मध्येमध्ये भ्रमात असल्यासारखी बडबड करतात का?'
'हो.कधीकधी.'
'ह्म्म..मामला गंभीर आहे खरा. खरं सांगायचं तर मला माझ्या कामात व्यत्यय आलेला आवडत नाही, पण हा प्रसंग खरोखर बाका आहे. मी लगेच तुमच्याबरोबर येतो.' स्मिथ म्हणाला.

मला अचानक स्मिथच्या आधी घरी येण्याची होम्सची सूचना आठवली.
'अं..मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे.' मी म्हणालो.
'बरं ठीक आहे. मी एकटा जाईन. माझ्याकडे होम्सचा पत्ता आहे. अर्ध्या तासात तिथे पोहचेन.' स्मिथ म्हणाला.

होम्सपाशी पोहचलो तेव्हा मला जरा धाकधूक वाटत होती की तो कसा असेल. पण सुदैवाने तो जरा सुधारला होता. म्हणजे अर्थात त्याचे खोल गेले डोळे वगैरे तसेच होते, पण निदान त्याचं भ्रमिष्टासारखं बोलणं तरी थांबलं होतं. आवाज क्षीण असला तरी त्याच्या बोलण्यातला पूर्वीचा मिश्किलपणा काही प्रमाणात परत आला होता. 
'तुला स्मिथ भेटला का, वॅटसन?'
'हो. तो येतो आहे इथे.'
'वा! अत्युत्तम! तू आपलं दूताचं काम चोख केलंस.'
'तो माझ्याबरोबरच परत येणार होता.'
'नाही! तसं कसं? ते चाललंच नसतं.बरं,  त्याने विचारलं का, मला हा रोग कशामुळे झाला?'
'मी त्याला बंदरातल्या चिनी लोकांकडून झाला असं सांगितलं.'
'वा! तू आपलं मित्राचं कर्तव्य चोख बजावलं आहेस यात शंकाच नाही.आता तू या सर्व प्रसंगात नाहीस असं तू समजू शकतोस.'
'म्हणजे काय, होम्स? मी इथे थांबणार आहे आणि या रोगाबद्दल त्याचं निदान ऐकणार आहे.'
'हो. अर्थातच. पण मला हे चांगलं माहिती आहे की या खोलीत आम्हा दोघांशिवाय तिसरं कोणी नसेल तरच त्याचं मत जास्त मनमोकळं असेल. तू माझ्या पलंगाच्या पाठीमागे लपणार आहेस.'
'होम्स!असं का पण?'
'दुसरा काही पर्याय नाही, मित्रा. आणि या खोलीत लपायला जास्त जागाच नसल्याने त्याला संशयाला विशेष जागा नाही.पण एक लक्षात ठेव वॅटसन, काहीही झालं, नीट ऐक, अगदी काहीही झालं तरी तू तिथून बाहेर येणार नाहीस. लवकर लप! तो बघ, गाडीचा आवाज येतो आहे.'

मी नाईलाजाने पलंगामागे लपलो.. होम्सची अवस्था आता परत भ्रमिष्टासारखी झाली होती. तो काहीतरी बरळत होता..

यानंतर:  मृत्यूशय्येवर होम्स: भाग ४