मृत्युशय्येवर होम्स-भाग १

माझ्या मते होम्सची घरमालकीण सौ. हडसन बऱ्यापैकी त्रस्त स्त्री होती. होम्सच्या घरी वेळीअवेळी येणाऱ्या अनाहूत व्यक्ती आणि खुद्द होम्सचा विक्षिप्त स्वभाव हे कोणाही घरमालकाच्या सहनशक्तीचा अंत पाहणारंच मिश्रण होतं. शिवाय होम्सचा अव्यवस्थितपणा,रात्री अपरात्री व्हायोलिन वाजवणं,कधीकधी दरवाज्यांवर पिस्तुलाची नेमबाजी, त्याचे चित्रविचित्र वासांचे शास्त्रीय प्रयोग आणि त्याच्या भोवती सतत रेंगाळणारा धोका यामुळे तसं म्हटलं तर कोणीही घरमालकासाठी तो नकोसा भाडेकरू ठरला असता. पण हेही खरं, की तो जागेसाठी मोजत असलेली भाड्याची रक्कम बरीच जास्त होती. मी जेव्हा बेकार स्ट्रीटला होम्सबरोबर राहत होतो त्या काळात होम्सने दिलेल्या घरभाड्यात ते पूर्ण घर आरामात विकत घेता आलं असतं.

त्याचं वागणं कितीही विक्षिप्त वाटलं तरी सौ. हडसनने त्याच्या मामल्यांत कधी ढवळाढवळ मात्र केली नाही. तिच्या मनात होम्सबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती होती. त्याच्या स्वभावातलं विलक्षण स्त्रीदाक्षिण्य तिला आवडतही असे. होम्स कितीही स्त्रीद्वेष्टा असला तरी स्त्रियांबरोबर त्याची वागणूक मोठी अदबीची आणि सभ्य असे. आज सौ. हडसन माझ्याकडे येऊन होम्सच्या आजाराबद्दल कळकळीने सांगत होती. हडसनचा होम्ससंबंधीचा जिव्हाळा माहिती असल्याने मला तिचे बोलणे गंभीरतेने घ्यावेसे वाटले.

'होम्स अत्यवस्थ आहेत, श्री. वॅटसन. गेले तीन दिवस मी त्यांना पाहते आहे,त्यांची तब्येत ढासळतच चालली आहे. ते आजचा दिवस ढळलेला पाहू शकतील असं मला वाटत नाही. त्यांची हाडं बाहेर आलीयत आणि डोळे खोल गेले आहेत.ते डॉक्टरलापण बोलावू देत नव्हते.आज मी त्यांना म्हणालेच की तुमची परवानगी असो वा नसो, मी डॉक्टरला बोलावणार.तेव्हा कुठे ते म्हणाले की ठीक आहे, जर डॉक्टरला बोलावण्याचा तुमचा आग्रहच असला तर वॅटसनला बोलवा.मला वाटतं तुम्ही अजिबात वेळ न दवडता चलावं,नाहीतर वेळ निघून गेलेली असेल.' 

होम्सच्या या आजाराबद्दल मला काहीच कल्पना नव्हती.मी कोटटोपी उचलली आणि ताबडतोब निघालो.वाटेत हडसनकडून थोडी तपशिलात माहिती मिळाली.
'मला जास्त माहिती नाही.' हडसनबाई म्हणाली. 'रोथरहिथ मध्ये ते एका केसवर काम करत होते, आणि तिथेच हा आजार जडला. आल्यापासून त्यांनी अंथरूण धरले आहे. अन्नपाण्याचा एक कणही त्यांच्या पोटात गेलेला नाही.'
'सौ हडसन, इतकं झालं तरी तुम्ही अद्याप डॉक्टरला बोलावलं कसं नाही?'
'होम्स मला डॉक्टरला बोलावू देत नव्हते.तुम्हाला तर माहितीच आहे त्यांचा शब्द टाळण्याची हिंमत मी करू शकत नाही.पण ते आता जास्त काळ या जगात नाहीत,मला वाटतं.'

आणि खरोखर होम्सची अवस्था दारुण होती. नोव्हेंबरचा महिना असल्याने धुकं होतं आणि खोलीत उजेड अंधुक होता. पण त्याचा चेहरा पाहून मी चरकलोच. त्याच्या डोळे तापाच्या धुंदीत असल्यासारखे दिसत होते. ओठ पूर्ण सुकले होते, ओठावर काळपट सालं निघालेली दिसत होती.त्याचे हात अस्वस्थपणे चाळवाचाळव करत होते. तो बिछान्यावर मलूल पडून होता, पण मला पाहून त्याच्या डोळ्यात ओळखीची चमक आली.
'वॅटसन, सध्या माझे वाईट दिवस चालू दिसतायत.' तो क्षीण आवाजात म्हणाला. पण त्याच्या स्वरातील बेफिकिरी मात्र पूर्वीचीच होती. 

'होम्स! हे काय झालं?' मी त्याच्याजवळ जाऊ लागलो.
'नाही! तिथेच उभा राहा!जवळ येऊ नकोस.' होम्स निर्वाणीच्या सुरात म्हणाला. 'जर तू जवळ आलास तर मला नाईलाजाने तुला घराबाहेर काढावं लागेल.'
'पण का होम्स?काय झालं?'
'माझी मर्जी! अजून स्पष्टीकरण देत बसायची गरज आहे का?' होम्स म्हणाला.
सौ. हडसनचे म्हणणे बरोबर होते. त्याच्या आवाजात वचक होता. पण मी माझ्या मित्राला असा असहाय पडलेला पाहू शकत नव्हतो.  

क्षमस्व.अडचण तांत्रिक असल्याने चित्र दिसत नाही. 'मला फक्त तुझी मदत करायची आहे,बाकी काही नाही.' मी म्हणालो.
'बरोब्बर!आणि म्हणूनच सांगतो वॅटसन, तुला मला खरंच मदत करायची असेल तर माझ्यापासून दूर राहा.'
'ठीक आहे! जशी तुझी इच्छा.'मी म्हणालो. होम्स जरा सैलावला.
'तू माझ्यावर नाराज नाहीस ना?' तो धापा टाकत म्हणाला.
माझा मित्र हा असा पडलेला असताना मी त्याच्यावर नाराज कसा होऊ शकलो असतो?
'वॅटसन, मी तुझ्या भल्यासाठीच म्हणतो, माझ्यापासून दूर राहा.' तो चिरक्या आवाजात म्हणाला.
'माझ्या भल्यासाठी?म्हणजे?'

'मला माहीत आहे मला काय झालंय ते‌. सुमात्रा मध्ये हमालांमध्ये पसरलेला हा एक रोग आहे.यावर जास्त काही संशोधन झालेलं नाही, पण इतकं नक्की, की आजार प्राणघातक आहे.आणि संसर्गजन्य सुद्धा.'
होम्स उसनं बळ आणून बोलत होता. त्याने परत मला हाताच्या इशाऱ्याने दूर जायला सांगितले.
'हा रोग स्पर्शाने पसरतो, वॅटसन. दूर राहिलास तर तुला काहीच धोका नाही.'

'होम्स, तुला काय वाटतं, संसर्गजन्य रोग आहे म्हणून मी माझ्या मित्राला दूर ठेवेन?मला त्याची पर्वा नाही. चल, मला बघू दे बरं.'
मी परत पुढे सरसावलो, पण होम्सच्या जळजळीत कटाक्षाने जागीच थांबलो.
'वॅटसन, तू जर तिथे दूर उभा राहणार असलास तरच मी तुझ्याशी बोलणार. नाहीतर तुला बाहेर काढणं मला भाग आहे.'
होम्सबद्दल मला नितांत आदर होता आणि त्याच्या सूचना मी आजवर मला पटल्या नसल्या तरी पाळत आलो होतो, पण आज माझ्यातला डॉक्टर मला माझ्या मित्राला मरताना असं निष्क्रियपणे पाहत गप्प बसू शकणार नव्हता.
'होम्स, तू भानावर नाहीस. आजारी माणसाला तो काय करतो आहे याचं विशेष तारतम्य नसतं. तुला आवडो वा न आवडो, मी एक डॉक्टर या नात्याने तुला तपासून माझं कर्तव्य करणार.'
होम्सने विखारी नजरेने माझ्याकडे पाहिलं.

'जर मला जबरदस्तीने डॉक्टरला भेटावं लागणारच असेल तर मी एक विश्वासू  डॉक्टर जास्त पसंत करेन.' होम्सने वार केला.
'म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझा माझ्यावर विश्वास नाही?' 
'एक मित्र म्हणून माझा तुझ्यावर विश्वास नक्की आहे वॅटसन, पण कटू सत्य सांगायचं झालं तर तू एक अतिसामान्य आणि अननुभवी डॉक्टर आहेस.'
मी या वाक्याने जबरदस्त दुखावला गेलो. होम्स आता खरोखरच पूर्वीचा होम्स राहिला नव्हता..

यानंतर वाचा: मृत्यूशय्येवर होम्स-भाग २