हातघाई चालली आहे...

आमची प्रेरणा प्रसाद यांची गझल लढाई चालली आहे...

प्रेमिकांची बघ धिटाई वाढली आहे
बाकड्यांवर हातघाई चालली आहे...

छापण्या नाकारती ते लेखना माझ्या
(विश्वजाली मोगलाई माजली आहे... )

हिंडण्या रस्ता अता उरला कुठे आहे?
पालिकेची पण खुदाई चालली आहे!

डोंगराच्या पायथ्याशी चालल्या पार्ट्या
ती जुनी कोठे 'पुण्या'ई राहिली आहे !

जायचे तेथे स्वतःची बाटली नेते
येव्हढी ही काय बाई बेवडी आहे...

बंद झाले बार सारे बारबालांचे
पोलिसांची बघ कमाई थांबली आहे!...

"केशवा"चे काव्य वाचुन हे म्हणाली ती
आज ही माझी धुलाई चालली आहे