पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य - १

पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य

वसंत ऋतू नुकताच सुरु झालेला होता. झाडांना नवी पालवी फुटायला लागली होती. अशा वेळी एक दिवस दुपारी मी आणि होम्स चक्कर मारायला बाहेर गेलो होतो. चांगले दोन तास निवांत भटकून घरी येतो तो आमच्या नोकराने होम्सला सांगितले की एक सदगृहस्थ तुम्हाला भेटायला आले होते पण तुमची वाट पाहून ते निघून गेले.
"अरेरे!" असं म्हणून होम्सने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, "बघ आपल्या फिरायला जाण्यामुळे काय झालं!" आणि नोकराला विचारले "तू त्यांना बसायला सांगितलं नाहीस?"
"सांगितलं न? त्यांनी थोडा वेळ तुमची वाट पाहिली."
"किती वेळ थांबले होते ते?"
"साधारण अर्धा तास, साहेब. ते खूप बेचैन दिसत होते. ते जेवढा वेळ आत होते तेवढा वेळ ते नुसतेच अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. शेवटी  कंटाळून ते बाहेर आले आणि चिडून म्हणाले ’हा माणूस घरी येणार आहे ही नाही?’ मी म्हटलं ’साहेब थोडं थांबा, एवढ्यात येतीलच ते!’ त्यावर ते म्हणाले ’इथे गुदमरत बसण्यापेक्षा मी बाहेर मोकळ्या हवेत त्यांची वाट पाहतो. मी थोड्याच वेळात परत येईन.’ मी त्यांना थांबण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काहीच ऐकायला तयार नव्हते."
"बरं, बरं. तुला शक्य होतं तेवढं तू केलंस." असे नोकराला म्हणून होम्स आत आला. "वॉटसन, हे काहीतरीच झालं. मला आता एखादी केस हवीच होती आणि त्या माणसाची बेचैनी आणि अस्वस्थपणा पाहून ही केस इंटरेस्टिंग असेल असं वाटतंय. अरेच्चा, पण हे काय आहे! वॉटसन, हा पाईप तुझा तर नाही न? हा त्या माणसाचाच असणार. वॉटसन, त्याला अत्यंत मोलाचा वाटणारा पाईप तो इथे विसरून गेलाय म्हणजे त्याची मनःस्थिती तेव्हा फारच वाईट असली पाहिजे."
मी म्हटलं, "हे तू कशावरून म्हणतोस की त्याच्या दृष्टीनं हा पाईप फार मौल्यवान आहे?"
होम्स म्हणाला, "हे बघ, ह्या पाईपची किंमत सात शिलिंगांपेक्षा जास्त असणार नाही. पण तो दोन वेळा दुरुस्त केलेला आहे. त्यासाठी चांदीच्या तारा वापरल्या आहेत. म्हणजे मूळ किंमतीपेक्षा दुरुस्तीवर जास्त खर्च केलेला आहे! असं केव्हा होतं? जेव्हा एखादी वस्तू आपल्याला फार प्रिय असते तेव्हाच!"
"आणखी काही?" मी विचारलं.
"आहे न! पाईप, घड्याळं आणि बुटांच्या लेसेस ह्यांच्याकडून ते वापरणाऱ्यांविषयी बरीच माहिती मिळते. आता हा पाईपच घे. हा वापरणारा माणूस डावखुरा, चांगले मजबूत दात असलेला, थोडासा निष्काळजी आणि पैशाच्या दृष्टीने सुस्थितीत असावा."           
"म्हणजे तुझ्या मते सात शिलिंगांचा पाईप वापरणारा माणून श्रीमंत?" मी थोडं चेष्टेच्या सुरात म्हटलं.
होम्सने पाईपमधील तंबाखू थोडा तळहातावर घेतला आणि म्हणाला, "ह्या  तंबाखूचा भाव काय आहे माहीत आहे? एका औंसाला आठ पेन्स द्यावे लागतात. हा तंबाखू उत्तम आहे हे खरे, पण ह्याच्या निम्म्या किमतीत सुद्धा धूम्रपानाचा तितकाच आनंद मिळतो. ह्याचाच अर्थ ह्या माणसाला काटकसर करण्याची आवश्यकता नाही."
"आणखी काही?"
"हा माणूस नेहेमी दिव्याने पाईप शिलगावतो. पाईपची एक बाजू बघ कशी काळी झाली आहे. काडीने पाईप शिलगावला तर एवढी जागा काळी होणार नाही. आणखी एक. काळी झालेली बाजू उजवी आहे. म्हणजे तो डाव्या हातात पाईप धरून दिव्याला लावत असणार. शिवाय पाईपचा दांडा थोडा चावलेला दिसत आहेत. उत्तम आणि चांगले मजबूत दात असल्याशिवाय हे घडणार नाही. पण ते बघ, जिन्यात पावलं वाजतायत. बहुतेक पाईपच्या परीक्षणापेक्षाही जास्त मनोरंजक काही तरी आपल्याला मिळणार असावं!"

दुसऱ्याच क्षणाला एक तिशीचा आसपासच्या माणूस आत आला आणि म्हणाला, "माफ करा हं. मी खरं तर दार वाजवून आत यायला हवं होतं. पण काय करू? मी अगदी सैरभैर झालो आहे. त्यामुळं असं होतंय." असं म्हणून तो खुर्चीत धपकन बसला.
होम्स मृदूपणे म्हणाला, "तुम्हाला एक दोन दिवस नीट झोप मिळालेली दिसत नाही. त्यामुळे माणसाची अवस्था अशी होते. बरं. मी आपल्याला काय मदत करू शकतो?"    
"मला तुमचा सल्ला हवा आहे. माझ्या सगळ्या आयुष्याची वाट लागणार आहे असं मला वाटतंय आणि ते होऊ नये म्हणून मी काय करावं ते मला कळत नाही."
"मी डिटेक्टिव ह्या नात्यानं तुमची केस बघावी असं तुम्हाला म्हणायचंय का?"
"तेवढंच नाही. तुम्ही बरंच जग पाहिलं आहे, एक अनुभवी व्यक्ती म्हणून एका विषयाच्या बाबतीत मला तुमचं मत हवं आहे. मला ते सांगणं सुद्धा अवघड जाणार आहे. पण मी प्रयत्न करतो."

तुटक तुटक वाक्यात त्याने आपली कथा सांगायला सुरुवात केली. ते सांगणं त्याला अत्यंत क्लेशदायक होत होतं हे स्पष्ट कळत होतं. तो म्हणाला," ही गोष्ट अत्यंत नाजुक आहे. आपल्या पत्नीच्या वर्तनाबद्दल कोणी दोन अनोळखी माणसांसमोर चर्चा करत नाही. पण माझा नाईलाज आहे. मला आता कोणाच्या तरी सल्ल्याची अत्यंत आवश्यकता आहे."
"मि.ग्रँट मन्रो..." होम्स म्हणाला.
आमचा पाहुणा एकदम खुर्चीत उडालाच! म्हणाला," तुम्हाला माझं नाव माहिती आहे?"
होम्स हसत म्हणाला, "तुम्हाला आपलं नाव कळू द्यायचं नसेल तर तुमच्या टोपीच्या अस्तरावर ते लिहीत जाऊ नका बुवा! नाही तर टोपी तरी उलटी फिरवा. म्हणजे समोरच्याला ते दिसणार नाही. तर ते असो. मी असं म्हणत होतो की मी आणि माझ्या ह्या मित्राने ह्याच खोलीत अतिशय विलक्षण गुपितं आणि विश्वास बसणार नाही अशा गोष्टी  ऐकलेल्या आहेत आणि संकटात सापडलेल्या अनेकांची त्यातून सुटका केली आहे. तुमच्यासाठीही आम्ही तेच करू असा विश्वास बाळगा आणि आता अधिक विलंब न लावता निःसंकोचपणे तुमची काय समस्या आहे ते सांगा."
त्याच्या मनाची थोडी चलबिचल झाल्यासारखी वाटली. तो अबोल माणूस वाटत होता आणि आपल्या वैयक्तिक अडचणी दुसऱ्यांना सांगण्याचा त्याचा स्वभाव नसावा. म्हणूनच त्याला बोलणं जड जात होतं. शेवटी काही तरी निश्चय केल्यासारखं तो म्हणाला,
"मि.होम्स. सगळंच तुम्हाला सांगतो. माझं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. आमच्या दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे.  आमचं भांडण, किंवा तीव्र मतभेद असं कधीच झालं नाही. दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. पण गेल्या सोमवारपासून आमच्या दोघांमध्ये जणु काही एक भिंतच उभी राहिली आहे. माझ्या पत्नीच्या आयुष्यात असं काही घडलेलं आहे ज्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. असं काही झालंय की त्यामुळे मला ती एकदम परकी स्त्रीच वाटते.

"पुढे जाण्याआधी एक गोष्ट मला स्पष्ट करू द्या. एफीचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. त्याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका किंवा किंतू नाही. पण ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. आणि ते काय याचा उलगडा झाल्याशिवाय आमच्यात निर्माण झालेली ही दरी भरून येणार नाही."  
होम्स म्हणाला,"मि. मन्रो, इतर गोष्टींपेक्षा तुमची केस काय ते सांगा."

"एफीच्या पूर्वायुष्याबद्दल मला जेवढं माहीत आहे तेवढं सांगतो. माझी-तिची भेट झाली तेव्हा ती जेमतेम पंचविशीत होती. पण दुर्दैवाने तिच्या पतीचे निधन झालेले होते. तेव्हा तिचे नाव मिसेस हेब्रन असे होते. ती लहान असतानाच अमेरिकेला गेली होती व तिथे अटलांटामध्ये रहात होती. तिथेच तिचा मि.हेब्रन यांच्याशी विवाह झाला. हेब्रन हे एक यशस्वी वकील होते. एफी आणि हेब्रनना एक मूलही झालं होतं. पण तिथे कसल्याश्या पिवळ्या तापाची साथ आली आणि त्यात मि.हेब्रन आणि ते मूल मृत्युमुखी पडले. मी मि. हेब्रन यांच्या मृत्यूचे दाखलापत्रही पाहिले आहे. झाल्या प्रकारामुळे एफीला अमेरिकेत आणखी रहाण्याची इच्छाच उरली  नाही आणि ती इंग्लंडला परत येऊन मिडलसेक्समधील आपल्या एका मावशीकडे राहू लागली. एफीच्या पतीने बऱ्यापैकी पैसा मिळवला होता व त्याची व्यवस्थित गुंतवणूक केली होती. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या एफीला काहीच काळजी नव्हती. एफीला इंग्लंडमध्ये येऊन सहाएक महिने झाले असतील तेव्हा तिची माझी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर लवकरच प्रेमात झालं. त्यानंतर काही आठवड्यातच आम्ही विवाहबद्ध झालो.

"माझ्या व्यवसायात माझं व्यवस्थित चाललेलं होतं. त्यामुळे अल्पावधीतच आम्ही  नॉर्बरीमध्ये एक बंगला घेतला. आमच्या जवळपास अगदी दोन चारच घरं होती. त्यानंतर मात्र स्टेशनला जाण्याऱ्या रस्त्यावर अर्धी वाट जाईपर्यंत एकही घर दिसत नसे. एकूण अतिशय शांत अशी ती जागा होती. मी आणि एफी अगदी आनंदात, समाधानात रहात होतो.  

"पुढे जाण्याआधी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आमचं लग्न झालं तेव्हाच एफीने आपली सगळी इस्टेट माझ्या नावावर केली! मी खूप विरोध केला पण तिने माझे काहीही ऐकून घेतले नाही. त्यानंतर सहा आठवड्यापूर्वीची गोष्ट. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ’जॅक, मी माझी इस्टेट तुझ्या नावावर केली तेव्हा तू म्हणाला होतास की मी तुला केव्हाही ती मागू शकते.’
"मी म्हटलं, ’हो, ते सगळं तुझंच आहे.’
"ती म्हणाली, ’मग मला एक शंभर पौंड दे.’
"मला जरा आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं तिला नवीन ड्रेस वगैरे घ्यायचा असेल. पण त्यामानाने हे पैसे खूपच होते.
"मी म्हटलं, ’इतके पैसे कशाला हवेत?’ त्यावर ती हसत म्हणाली, ’तू म्हणाला होतास की तू फक्त माझा बँकर  आहेस! आणि बँकर्स असले प्रश्न विचारत नाहीत!’
" 'म्हणजे तू मला हे सांगणार नाहीस तर! ठीक आहे.'
" ’कधीतरी मी तुला ते सांगीन पण आता मात्र मी नाही सांगू शकत.’
"मी तिला चेक लिहून दिला आणि ते तेवढ्यावरच थांबलं. माझ्या मुख्य समस्येशी ह्याचा काही संबंध असेल किंवा नसेल पण मला वाटलं की हेही तुम्हाला सांगावं.

"आता पुन्हा माझ्या मुख्य समस्येकडे येऊ. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आमच्या घराच्या जवळ काही छोटी  घरं होती. त्यातील एक छोटंसं टुमदार दुमजली घर आणि आमचं घर यांच्यामध्ये फक्त एक मोकळं मैदान होतं. आजूबाजूला बरीच झाडं पण होती. मला तिथे हिंडायला फार  आवडायचं. गेल्या सोमवारी मी असाच तिथे हिंडत होतो तेव्हा मी पाहिलं की त्या घरासमोर एक व्हॅन उभी आहे आणि तिच्यातून सामान उतरवलं जात आहे. कोण लोक आपले शेजारी होणार ह्या स्वाभाविक उत्सुकतेपोटी मी घराच्या आणखी जवळ गेलो. तेवढ्यात माझं लक्ष वर गेलं. खिडकीत एक चेहरा होता आणि तो माझ्याकडेच पहात होता!

क्रमशः   

भूमिका: मनोगतावर बऱ्याच होम्सकथांचे अनुवाद आले आहेत. त्यापैकी बरेचसे अनु आणि अदिती यांनी केलेले आहेत. सर्वच होम्सकथांना चांगले प्रतिसाद मिळाले आहेत. पण सन्जोप रावांनी प्रतिसादात दोन वेळा हेही लिहिलं आहे की ’यलो फेस’ चा अनुवाद कुणीतरी करा रे!
अजूनपर्यंत कुणीच तो केलेला नसल्याने मी आज तो जमेल तसा करत आहे. गोड मानून घ्या.