पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य - २

पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य - २

"मि.होम्स, त्या चेहऱ्यात काय वेगळं होतं मला सांगता येणार नाही. पण तो चेहरा पाहून माझ्या अंगावर एकदम भीतीने शहाराच आला. त्या चेहऱ्यात काहीतरी अमानवी आणि अनैसर्गिक असं होतं. जरा जवळून बघू या हा प्रकार तरी काय आहे, असे मनाशी म्हणत मी पुढे गेलो पण त्याच क्षणाला तो चेहरा एकदम कुठल्यातरी शक्तीने खेचल्यासारखा अदृश्य  झाला. मी थोडा वेळ तिथेच विचार करत थांबलो. तो चेहरा स्त्रीचा होता की पुरुषाचा ह्याबद्दल मला काहीच सांगता येणार नाही. पण त्याचा रंग मात्र मी कधीच विसरणार नाही. तो रंग पिवळसर पांढुरका होता आणि त्यात निश्चितपणे काही तरी अनैसर्गिक होतं.  ही काय भानगड आहे ते बघूच या असे मनाशी म्हणत मी सरळ त्या घरासमोर गेलो आणि दार वाजवलं. एका जराशा खाष्ट दिसणाऱ्या बाईने दार उघडले आणि जरा तुटकपणेच विचारले, ’काय पाहिजे तुम्हाला?’
"मी म्हटलं, ’काही नाही. मी इथे जवळच राहतो. काही मदत वगैरे लागली तर सांगा. कसलाही संकोच... ’
" ’आम्हाला लागेल तेव्हा आम्ही बघू’ असं म्हणून तिने धाडकन दार लावून घेतलं. मला त्या बाईच्या वागण्याचा खूपच राग आला. घरी आलो तरी झाला प्रकार माझ्या डोक्यातून जाईना. मी बायकोला ह्याबद्दल काहीच बोललो नाही कारण ती जरा भित्री आहे. मी फक्त तिला सांगितलं की मैदानापलीकडच्या घरात कुणीतरी रहायला आलेत. त्यावर ती काहीच बोलली नाही.

"मि.होम्स, मी अगदी डाराडूर झोपणारा माणूस आहे. माझी त्यावरून चेष्टामस्करीही केली जाते. पण त्या दिवशी घडलेल्या घटनांमुळे मला नेहमीसारखी शांत झोप लागली नाही. खोलीत काही तरी हालचाल चालली आहे असं मला वाटलं. मी अर्धवट झोपेत होतो. माझी बायको बाहेर जाण्याचे कपडे घालून तयार होती. मी जागा झालोय असं तिला वाटलं आणि तिच्या चेहऱ्यावर एकदम भीती उमटली. मी काहीच बोललो नाही कारण मी अर्धवट झोपेत होतो. मग ती हळूच बेडरूमच्या बाहेर गेली. काही सेकंदातच मुख्य दरवाजा उघडल्याचा आणि बंद केल्याचा आवाज झाला. आता मात्र मी पूर्णपणे जागा झालो. घड्याळात पाहिलं तर ३ वाजले होते. ह्यावेळी माझी बायको बाहेर कुठे गेली असेल मला काही कळेना. मी तसाच बिछान्यावर बसून राहिलो, उलटसुलट विचार करत. अशीच वीसपंचवीस मिनिटे गेली असतील. तेवढ्यात बाहेर पावलं वाजली आणि क्षणार्धात एफी बेडरूममध्ये आली.
" ’ह्यावेळी कुठे गेली होतीस एफी?’ असं मी विचारताच ती दचकली आणि वरकरणी हसत म्हणाली ’अरे, तू जागा आहेस? मला वाटत होतं तुला कशानेच जाग येत नाही!’
"मी जरा करड्या आवाजात, एकेका शब्दावर जोर देत विचारलं ’एफी, तू कुठे गेली होतीस?’      
"’तुला आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. मला घरात जरा कोंडल्यासारखं वाटत होतं म्हणून मी बाहेर जरा मोकळ्या हवेत गेले होते. थोडा वेळ बाहेर थांबल्यावर आता मला बरं वाटतंय.’
"हे सर्व बोलताना तिने माझ्या डोळ्याला डोळा दिला नाही आणि बोलताना तिचा आवाजच नव्हे तर तिचं सगळं शरीर कापत होतं. ती खोटं बोलत होती हे उघडच होतं. मी त्यावर काही बोललो नाही. पण माझ्या मनाला असंख्य प्रश्नांनी आणि शंकाकुशंकांनी घेरून टाकलं. रात्रभर मी त्याचाच विचार करत होतो.

"सकाळ झाली. आम्ही दोघे एकमेकांशी काहीच बोललो नाही. माझी बायको माझी नजर टाळत होती हे मला स्पष्ट दिसत होतं. नाश्ता झाल्यावर मी एकटाच फिरायला बाहेर पडलो. साधारण एकच्या सुमाराला मी घरी परत आलो. परत येताना त्या घराकडे माझी नजर गेली आणि तो चेहरा पुन्हा दिसतोय का ते पाहू लागलो. आणि मि.होम्स मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या घराचं दार अचानकपणे उघडलं आणि त्यातून माझी बायको बाहेर पडली!
"मी स्तंभितच झालो. माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. पण माझ्या बायकोची अवस्था माझ्यापेक्षाही वाईट होती. तिची पहिली प्रतिक्रिया होती चटकन घरात परत जायची. पण त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर ती घराच्या बाहेर आली. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. डोळ्यात तर मूर्तिमंत भीती उभी होती. उसनं अवसान आणून ती खेळीमेळीच्या स्वरात म्हणाली, ’जॅक, मी आपल्या नव्या शेजाऱ्यांना काही हवंय का ते बघायला आले होते. तू असा काय बघतोयस? तू माझ्यावर रागावला तर नाहीस न?’
"मी त्याला काहीच उत्तर न देता म्हटलं, ’म्हणजे तू काल रात्री इथेच आली होतीस तर?’
" ’तू काय म्हणतोयस ते मला कळतच नाही’
" ’तू रात्री इथेच आली होतीस याबद्दल माझी आता खात्रीच झाली आहे. ही कोण माणसं आहेत ज्यांना तू अशी वेळीअवेळी भेटायला जातेस?’
" ’मी काल रात्री इथे आले नव्हते.’
" ’एफी, तुझा आवाजच सांगतोय की तू खोटं बोलत आहेस. तुझ्यापासून मी कधीही काहीही लपवलं नाही. तेव्हा आता मी पण ह्या घरात जाऊन ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे.’
"ती दरवाजा अडवून म्हणाली, ’नको जॅक, कृपा करून आत जाऊ नकोस. मी तुला शपथेवर सांगते की एक दिवस मी तुला सगळं सांगीन. पण आता तू त्या घरात गेलास तर मात्र आपल्या दोघांची आयुष्यं बरबाद होतील. एक लक्षात ठेव. तू जबरदस्ती करून घरात गेलास तर तुझे माझे संबंध संपले.’
"ती ज्या कळकळीने हे सांगत होती त्यामुळे मी विरघळलो. मी तिला म्हटलं, ’ठीक आहे. तुझं गुपित तुझ्याजवळ. झालं ते होऊन गेलं पण यापुढे मात्र मला ह्या रात्रीअपरात्रीच्या भेटी अजिबात खपणार नाहीत.’
"तिने सुटकेचा निःश्वास टाकलेला मला स्पष्ट दिसला. आम्ही घरी जायला निघालो. जाता जाता मी मागे वळून त्या घराकडे पाहिलं तर वरच्या खिडकीतून तो पिवळा चेहरा आमच्याकडेच पहात होता. पुन्हा प्रश्नांच्या भुंगा माझा मेंदू पोखरायला लागला.

"त्यानंतर दोन दिवस मी घरीच होतो आणि माझ्या बायकोने पण मला दिलेले वचन पाळले होते. तिसऱ्या दिवशी मात्र माझ्या लक्षात आलं की मला दिलेल्या वचनापेक्षाही तिच्या दृष्टीने जास्त महत्वाचे असे दुसरे काही तरी  आहे.   
"म्हणजे त्याचं असं झालं, मी काही कामासाठी शहरात गेलो होतो आणि माझ्या नेहमीच्या ३:३६ च्या गाडीऐवजी २:४० च्या गाडीने परत आलो. मला घरात शिरताना पाहून आमच्या नोकराणीचा चेहरा एकदम भीतीग्रस्त झाला!
"मी तिला विचारलं, ’बाईसाहेब कुठेत?’ तर ती म्हणाली, ’त्या बहुतेक फिरायला गेल्या असाव्यात.’
"माझ्या डोक्यात लगेच संशय आला. ती घरात नाही याची खात्री करून घेण्यासाठी मी वर आमच्या बेडरूममध्ये गेलो. तिथे ती नव्हती. पण मी सहज खिडकीतून बाहेर पाहिलं तर आमची ती नोकराणी मैदानातून त्या घराकडे घावत चालली होती. माझा अगदी संताप झाला. एकदा ह्या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावून टाकू असा विचार करून मीही त्या घराकडे निघालो. वाटेत एफी आणि ती नोकराणी घाईघाईने घरी परत येताना दिसल्या पण मी त्यांच्याशी काहीही न बोलता पुढे गेलो. कारण रहस्य तर घरातच दडलेलं होतं! मी घराचं दार ढकलून सरळ आत शिरलो. सगळीकडे शांत होतं. मी सगळ्या खोल्या पाहिल्या. वरच्या मजल्यावरची एक खोली सोडली तर कुठेच कुणी रहात असल्याची खूण नव्हती. घरातलं सामानसुमानही साधंच होतं पण त्या एका खोलीच्या सजावटीत मात्र उच्च अभिरुची दिसत होती. मात्र, मि.होम्स, तिथे टेबलावर माझ्या बायकोचा फोटो पाहून माझा संताप शिगेला पोहोचला. तो फोटोसुद्धा मीच एफीला आग्रह करकरून काढायला लावला होता! मला काय होतंय तेच कळेना. कसाबसा मी घरी पोहोचलो आणि सरळ माझ्या अभ्यासिकेत गेलो. माझी बायको तिथे आली आणि म्हणाली, "जॅक, मला माफ कर. मी तुला दिलेलं वचन मोडलं पण माझा अगदी नाईलाज झाला. आता नाही पण नंतर तुला कळेल की माझ्यापुढे दुसरा काही पर्यायच नव्हता.’
" ’पण तू मला मोकळेपणानं सगळं सांगत का नाहीस?’
" ’जॅक, ते शक्य नाही, सध्या तरी शक्य नाही.’
" ’जोपर्यंत त्या घरात कोण रहातंय आणि तुझा तो फोटो तू कुणाला दिला आहेस हे तू मला सांगत नाहीस तोपर्यंत माझा तुझ्यावर पूर्वीसारखा विश्वास असणार नाही हे पक्कं ध्यानात ठेव.’ असं म्हणून मी घरातून बाहेर पडलो. आज सकाळी मला तुमचं नाव आठवलं. तुमच्याबद्दल मी खूप ऐकलं आहे. म्हणून तडक मी तुमच्याकडे आलो. मि.होम्स, कृपा करून ह्या रहस्याचा उलगडा करा आणि जे करायचंय ते लवकर करा कारण आता माझ्या सहनशक्तीचा अंत होत आला आहे."

काही क्षणांनंतर होम्स म्हणाला, "तुम्ही हे निश्चितपणे सांगू शकाल का की तो चेहरा पुरुषाचाच होता?"
"तसं काही सांगता येणार नाही कारण मला तो कधीच जवळून पहाता आला नाही."
"पण त्या चेहऱ्याबद्दल तुमचं जरासं प्रतिकूल मत झालेलं दिसतंय."
"हो. त्या चेहऱ्यात मला काही तरी अमानवी वाटलं. इतका भावशून्य  चेहरा मी आजपर्यंत कधीच पाहिलेला नाही. शिवाय तो खिडकीतून एकदम झटक्यासरशी अदृश्य झाला होता."
"तुमच्या पत्नीने तुम्हाला शंभर पौंड मागितले ह्या घटनेला किती दिवस झाले?"
"साधारण दोन महिने."
"तुम्ही तुमच्या पत्नीच्या पहिल्या पतीचा फोटो पाहिला आहे?"
"नाही. माझी बायको म्हणाली की अटलांटामध्ये असताना पतिनिधनानंतर काही दिवसांनी अचानक घरात आग लागली आणि त्यात बहुतेक कागदपत्रे भस्मसात झाली."
"तरीही पतीच्या मृत्यूचा दाखला तिच्याजवळ आहे? आश्चर्य आहे!"
"ती म्हणाली की आगीच्या घटनेनंतर तिने मृत्यूच्या दाखल्याची प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवली."
"अमेरिकेतील तिच्या कोणा परिचितांशी तुमची कधी भेट झाली आहे का?"
"नाही."
"पुन्हा अमेरिकेला जाण्याची इच्छा तिने कधी बोलून दाखवली?"
"कधीच नाही."
"अमेरिकेहून तिला कधी पत्र वगैरे आलं होतं का?"
"नाही."

"ठीक आहे. मी तुमची केस घेतो.  जर त्या घरातील माणसे घर सोडून गेली असतील तर जरा कठीण आहे. पण जर तिथे असतील तर आपल्याला आशा करायला हरकत नाही. आता तुम्ही असं करा. नॉर्बरीला परत जा आणि त्या घरात अजून कोणी रहात आहे का ते पहा. घरात कोणी रहात असलं तरी भावनेच्या भरात त्या घरात घुसण्याचा अविचार करू नका. फक्त एकच करा. मला तशी तार करा. तार मिळाल्यापासून तासाभरात मी आणि माझा मित्र तिथे पोहोचू."
"आणि घर रिकामं असेल तर?"
"तर आम्ही उद्या नॉर्बरीला येऊ आणि पुढील पावले टाकू. आणखी एक. तुम्ही उगीच नुसते तर्क करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. बरंय. या."

मि. मन्रो यांना निरोप दिल्यावर होम्स म्हणाला, "वॉटसन, हे जरा भानगडीचंच दिसतंय. ब्लॅकमेलचं प्रकरण असावं असं वाटतंय."     
"पण ब्लॅकमेलर कोण?"
"दुसरं कोण? त्या घरात रहाणारा आणि मिसेस मन्रोचा फोटो जवळ बाळगणारा माणूस!"  
"तुझा काय अंदाज आहे?"
"माझा अंदाज तसा जुजबीच आहे, पण पुरावे मिळाले की तो खरा ठरेल याची मला खात्री आहे. वॉटसन, मिसेस मन्रोचा पहिला नवरा त्या घरात रहात आहे असं मला वाटतं."
"असं तुला का वाटतं?"
"सांगतो."

क्रमशः